वारकरी पत्रकारांचा पुणे येथे
||ज्ञानबातुकाराम||तर्फे सन्मान
पुणे : एकात्मतेचा मंत्र म्हणजे ज्ञानबा-तुकाराम. त्यात सकल संत सामावले आहेत. संतानी सांगितलेला सेवा धर्म अंगिकारण्याची सध्याच्या काळात गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डाॅ. सदानंद माेरे यांनी व्यक्त केले.
संत साहित्याला वाहिलेल्या ||ज्ञानबातुकाराम|| या वार्षिक अंकातर्फे वारीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा येथील पत्रकार भवनात आज (दि. १६) आयोजित करण्यात आला होता. या वेळी dnyanbatukaram.com या वेब पाेर्टलचे लोकार्पणही करण्यात आले. या सोहळ्यात डॉ. मोरे बोलत होते.
या प्रसंगी देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज माेरे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज माेरे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी साेहळा प्रमुख ॲड. विकास ढगे, आळंदी संस्थानचे विश्वस्त अभय टिळक, राजाभाऊ चाेपदार, प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे, तुकोबारायांची तपोभूमी भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, साेपानदेव पालखी साेहळ्याचे अभय जगताप, ‘लाेकमत’चे संपादक संजय आवटे, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर आदी मान्यवर उपस्थित हाेते.
।।ज्ञानबातुकाराम।। या विशेषांकाचे संपादक डाॅ. श्रीरंग गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. तत्पूर्वी दत्तात्रय महाराज दोन्हे यांनी अभंग सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. पालखी म्हणजे समाजोत्सव आहे, असे सांगून विश्वस्त अभय टिळक यांनी वारीत यंदा १५ लाख वारकरी येण्याची शक्यता व्यक्त केली. माणिक महाराज माेरे म्हणाले की, वारी म्हणजे विचार-आचाराची पालखी हाेय. त्यानुसार निर्मळ, हरीत, प्लास्टिक मुक्त वारी करण्याचा आमचा संकल्प आहे. संतांचे विचार सोईनुसार मांडू नये, असे मत ॲड. ढगे यांनी व्यक्त केले.
अनवधानाने, अज्ञानातून वारीचे चुकीचे वार्तांकन झाल्यानंतर काय हाेते, याची उदाहरणे देत राजाभाऊ चोपदार म्हणाले की, वारीला आम्ही आनंद सोहळा म्हणतो. वारी व्यवस्थापनाचे उत्तम धडे देते. वारी कमीत कमी साधनांत जगायला शिकवते. त्यामुळे पत्रकारांनी वारीतील समस्या जरूर मांडाव्यात, त्याचबराेबर उपाय सुचवावेत.
संपादक संजय आवटे म्हणाले की, ‘ज्ञानबातुकामराम’चं बोट आपण सोडलं म्हणून भयंकराच्या दरवाज्यात उभे राहाण्याची वेळ आपल्यावर आली आहे. आपल्यासोबत, अगदी आत ज्ञानेश्वर होते. तुकाराम होते. चोखामेळा होते. कान्होपात्रा आणि जनाबाई होत्या. त्यांचं बोट आपण सोडलं. मुख्य म्हणजे, नव्या पिढीशी त्यांची गाठभेटच आपण होऊ दिली नाही.
सगळ्यात मोठी चूक म्हणजे, परिवर्तनवाद्यांनी परंपरेचा हा अवकाश गमावला. म्हणून, तुकारामाचं अपहरण करेपर्यंत मंबाजींची मजल गेली. आणि, एवढं होऊनही ‘ब्र’ नाही उच्चारला आपण.
कारण, ‘कठीण वज्रासी भेदणारा’ तुकाराम ना आपल्याला समजला, ना ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणणारा ज्ञानबा समजला. पण आता तरी जागे व्हायला हवे.॥ ज्ञानबातुकाराम॥कडे पुन्हा जायला हवे.”
प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे म्हणाले, ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ सारखी लोकप्रिय वारीची गाणी गाणारे माझे आजोबा प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत. पंढरी आणि वारी यांच्याशी आम्ही नेहमीच जोडलेले राहू. यावेळी त्यांनी कोरोना काळात ताटातूट झालेल्या देव आणि भक्ताचा विरह व्यक्त करणारे गाणे गायले. उपस्थितांकडून त्याला मोठी दाद मिळाली.
dnyanbatukaram.com या वेबसाईटचे संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड म्हणाले, नव्या पिढीपर्यंत संतांचे मानवतेचे विचार पोहोचविण्यासाठी या वेबपोर्टलसारख्या आधुनिक माध्यमाचा आम्ही अवलंब केला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून वारी आणि वारकऱ्यांचे विविध कार्यक्रम, धार्मिक घटना, घडामोडी यांच्या बातम्या दिल्या जातील. याशिवाय मान्यवरांचे लेख, मुलाखती वाचता येतील. व्हिडिओच्या माध्यमातून पाहता, ऐकता येतील. या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यासाठी आपल्याला धार्मिक क्षेत्रातील बातम्या द्यायच्या असतील तर त्या dnyanabatukaram@gmail.com या मेलवर किंवा 9833661443 या व्हॉट्सअप नंबरवर पाठवाव्यात.
गाैरवमूर्ती :
१९८२पासून वारीचे वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार आनंद चिटणीस, पालखी सोहळा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यांचा सूर्यकांत भिसे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध फोटोग्राफर संदेश भंडारे, माऊली वैद्य, राजाभाऊ आणि रामभाऊ हे माऊलींचे चाेपदार, संत ज्ञानेश्वर संस्थानचे माजी विश्वस्त रा. ना. गोहाड, अमृता मोरे, पंकज इंगोले, श्रीकांत बोरावके, फेसबुक दिंडीकार स्वप्नील मोरे, शंकर टेमघरे, आरजे बंड्या, हलीमा कुरेश, अजय कौटीकवार, विशाल सवने, संजय तांबट, संदीप पवार, अमोल धर्माधिकारी, विनोद राऊत, समीर चवरकर, मिकी घई, सिद्धेश सावंत, शिवराज तलवार, राजेंद्रकृष्ण कापसे, प्रशांत अनासपुरे, दशरथ यादव, सुरेश धावडे, संतोष धायबर, सचिन पवार, बाबा फुंदे आणि अन्नदाते सिद्धेश्वर चव्हाण.