पालखीसोबतच्या माणसांचा किराणा,

डागडुजीचे साहित्य न् बरंच काही… 

माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत सुमारे १० लाख वारकरी असतात. त्यांचे वाटेवरचे व्यवस्थापन हा एक अभ्यासाचा विषय आहे. परंतु या मोठ्या सोहळ्याच्या पोटात अजून एक छोटे व्यवस्थापन असते. जे असते खुद्द संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत असणाऱ्या लोकांचे. त्यांना जेवणासाठी लागणाऱ्या मीठ, मिरची, हळद, हिंगापासून ते तंबूच्या खुंट्या दोऱ्या, बैलांच्या चाऱ्यापर्यंत अत्यंत बारकाईने तयारी करावी लागते. जेणेकरून वाटेत कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. पालखी सोहळ्याचे प्रभारी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक हे गेली ३६ वर्षे हे बारकाव्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करत असतात. ते त्यांच्याच शब्दांत…

मी गेले ३६ वर्षे प्रभारी व्यवस्थापक म्हणून ज्ञानेश्वर माउलींच्या सेवेमध्ये आहे. या वर्षीचा पालखी सोहळा विशेष आहे. कारण दोन वर्षे कोरोनामुळे पायी पालखी सोहळा झालाच नाही. त्यामुळे यंदा सोहळ्यात गर्दी वाढणार आहे. पालखी सोहळ्याची जी तयारी असते, त्यात संस्थानची स्वत:ची म्हणून जी तयारी असते ज्यात रथ दुरुस्ती, पालखी दुरुस्ती आदी कामे महिनाभर अगोदरच सुरू होतात. मुख्य म्हणजे संस्थानाचे जे दोनअडीचशे लोक, येणारे पाहुणे यांच्याकरिता जेवण वगैरेचे साहित्य आम्ही अगोदरच महिनाभर खरेदीस सुरुवात करतो. यामध्ये पूजेआर्चेचे साहित्य, रोजच्या नैवद्याचे पाच पक्वान्न आदींचा समावेश असतो. हा नैवद्य बनविण्यासाठी दोन महिला असतात. त्या सोवळे नेसून रोज हा पाच पक्वान्नाचा नैवैद्य बनवितात.

हळद, कंकू, अष्टगंध, तेल, वात, तूप…

याशिवाय पूजेचे साहित्य हळद-कंकू, अष्टगंध, गुलाब पाणी, देवाची वस्त्रे, तेल, वात, तूप हे सगळे आपण सोबत घेतो. उटणे, मध, पिठीसाखर, खारीक, खोबरे, बदाम इत्यादी वस्तूंचाही यात समावेश असतो. नैवेद्याकरिता लागणाऱ्या तीन मोठ्या गॅस शेगड्या दुरुस्त करून घेतो. त्यांचे लायटर, पोळपाट, मिक्सर, सुरी, भांडी ही सगळी तयार असतात. कपबश्या, चमचे, डिश या सगळ्या वस्तू तयार ठेवतो. देवापुढे जी देणगी जमा होते ती ठेवण्यासाठी तांब्याच्या कळशा आहेत. वेळ पाहण्यासाठी रथामध्ये लावमे जाणारे घड्याळ सोबत घेतो. सोहळ्यात कोणी व्हिआयपी आले, तर त्यांचा सत्कार करण्यासाठी शाल, नारळ आदी सोबत घेतो. चौरंग, पाट, डेस्क, स्टीलच्या पेट्या, विश्वस्तांच्या गाडीवरचे बोर्ड तयार करून घेतो. वीणा, पखवाज, पंखा, चिल्लर भरण्यासाठी लागणार्‍या प्लॅस्टिकच्या पिशव्या तयार ठेवतो. इलेक्ट्रिकचे सामान तयार ठेवतो. वैशिष्ट म्हणजे देवासाठी नवीन गादी, पादुकांसाठी नवीन नॅपकीन, चादरी आदींची खरेदी करतो. जेवणाच्या साहित्यात कढई, पातेली, पोळपाट, लाटणे ते सुई दोर्‍यापासून सर्व वस्तू अद्यायावत करून घेतो. मोठा ग्राईंडर, विळ्या, किसण्या, चहाची भांडी, पिण्याच्या पाण्याचा पिंप इत्यादी वस्तू तयारे ठेवतो.

पावसापासून माऊलींच्या तंबूचे संरक्षण

पालखीला पाऊस लागू नये म्हणून पिंजरी अर्थात लेदरचा कव्हर आम्ही यंदा नवीन करून घेतला आहे. शिवाय माउलींच्या तंबूवर टाकण्यासाठी निळा प्लॅस्टिकचा कागद, तंबू उभारण्यासाठी टिकाव, फावडी, खुंट्या, कनाती, काथ्या, सुतळ्या कनाती, पालखीच्या आधाराच्या गुढ्या, आतमध्ये बसणाऱ्या सेवकऱ्यांसाठी चादरी घेतो. देवाच्या अब्दागिरी, छत्र्या, कर्णा, नौबत सोबत घ्यावीच लागते.
देवाची गादी, उश्या, देवाच्या तंबूवर लावण्यासाठी गेरू भगव्या पताका घेतो. पालखी ठेवण्याचे लोखंडी स्टँड, रथाचे चारी बाजूचे पडदे, अग्निशमनचे सिलेंडर्स, स्वयंपाकाचे ५० सिलेंडर, तीन ट्रक, पाण्याच्या दोन जीपगाड्या, तीन रिक्षा आणि सुमारे अडीचशे ते तीनशे लोक आमच्या सोबत असतात. देवाच्या अब्दागिरी, छत्र, चामरे, जेव्हा पालखी थांबवायची असेल तेव्हा खांदेकऱ्यांना द्यावयाच्या गुढ्या, घण, नगरखाना, रथाचे पान्हे, चाकांत हवा भरण्याचा पंप, रथात चढण्याठीची स्टीलची मोठी शिडी, पखवाजाच्या घोड्या, देवाची चांदीची भांडी ठेवम्याच्या १० मोठ्या लाकडी पेट्या सोबत असतात. प्रवासात लोंणद, फलटणला चांदीची उपकरणी पॉलीश करून देणारे कारागीर येतात. अडचणीचे प्रसंग येतात, नाही असे नाही, पण माऊलींच्या कृपेने त्याचे निरसन होते. अडीअडचणीला एखाद्या दिंडीला आम्हाला मदत करावी लागते. अगदी एखादा ट्रक बंद पडला, तरी पोलिसाना सांगून क्रेन मागवतो. पाण्याचे टँकर सोबत असतातच.

दररोज ३०० लोकांचा स्वयंपाक

दररोज सुमारे अडीचशे, तीनशे लोकांचा स्वयंपाक केला जातो. त्यात पोळी भाजी, आमटी, भात असतो. सगळ्या प्रकारची लोणची, चटण्या आम्ही सोबत घेतो. वाटेने शक्यतो काही खरेदी नसते. पॅकिंगमधील प्रत्येक वस्तूवर ते किती किलो वगैरे आहे, हे लिहिले जाते. अडीचशे-तीनशे लोकांमध्ये सेवक असतात. कुणी तंबू ठोकणारे, कुणी पालखीत बसणारे असतात.
वैशिष्ट्य म्हणजे आळंदी गावातील रथाची समिती आहे. ही समिती माऊलींच्या रथासाठी बैलजोडी पुरविते. आम्ही संस्थानतर्फे प्रकाशित ज्ञानेश्वरीच्या प्रतीही सोबत घेतो. ती अल्प किंमतीत म्हणजे ५० रुपयांना देतो. ही ज्ञानेश्वरी घरोघरी पोचावी म्हणून १० रुपयांपासून ते अगदी एक लाखापर्यंत देणग्या मिळतात. देणगीदारांना प्रसाद म्हणून साखरफुटाणे, शाल, श्रीफळ देतो.

पूर्वी पालखीसोबत बैलगाड्या होत्या. एक ट्रक होता. आता पाच हजार गाड्या आहेत. पूर्वी रॉकेलच्या बत्त्या होत्या. आता इलेक्ट्रिकचे दिवे आले. शासनाकडून आम्हाला त्याचा पुरवठा होतो. पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी पुणे, सातारा, सोलापूर या तीनही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी मीटिंग घेतात. त्यात सोहळ्याचे विश्वस्त सहभागी होतात.


अचानक लाईट जाणे, मग जनरेटर चालू करणे वगैरे हे सरावाचे झाले आहे. ३६ वर्षांपूर्वी आम्हाला २५ हजारांचा किराणा माल लागत होता. आता दोन लखांचा किराणा पुरत नाही. आता माणसं वाढली. मी १९८६ सालापासून सेवेला सुरुवात केली तेव्हा पालखीसोबत ५०-६० माणसं असायची. एक ट्रक असायचा. विश्वस्तांसाठी एक गाडी असायची. आता जाणे येणे सुरूच असते. प्रत्येक तळावर बैठका होतात. सासवड, लोणंद हे मोठे मुक्काम असतात. या ठिकाणी अडीअडचणी सोडवल्या जातात.

वाटेवर १८ ठिकाणी मुक्काम

हा सोहळा पंढरपूरला जाताना १८ ठिकाणी मुक्काम करतो. ट्रकमधून सकाळी सामान उतरवायचं, दुपारचं जेवण झालं की, परत चढवायचं, असे रोजचे काम असते. आमच्याकडे महिला आचारी आहेत. मुक्कामाच्या ठिकामी १० ते १५ महिला चपात्या करतात. एकाच शेगडीवर आठ चपात्या होतात. एवढ्या लोकांना भात, चपाती, भाजी काही तरी शिरा, लापशी असा गोड पदार्थ असतो. वाटेवर लोक काही पदार्थ आणून देतात ते लगेच प्रसाद म्हणून वाढतो. नैवेद्याच्या पाच पक्वान्नामध्ये पुरण पोळी रोजच असते. कराडच्या दोन महिला पुरण पोळी बनवतात. रोज वेगळी भाजी, चपाती, आमटी असते. एखाद्या मुक्कामाच्या ठिकाणी गोड खाऊन कंटाळलेल्या लोकांना भाकरी, पिठलं, खरडा बनवतो. लोक तो आवडीने खातात. मग एखाद्या वेळी वरण फळ, मुगाच्या डाळीची खिचडी, अमसुलाचं सार, टोमॅटोचा सार बनवतो. संध्याकाळी साडेसात आठला स्वयंपाक तयार होतो. साडेआठला लगेच पंगती बसतात. मुक्कामाच्या ठिकाणी देवापुढे कीर्तन होते. हे कीर्तन जागर मानाचे असतात. त्यांच्या नोंदी रजिस्ट्ररमध्ये केल्या जातात. ही सर्व तयारी दोन महिने अगोदर केली जाते. प्रवासात शासनाची आम्हाला पूर्ण मदत असते. आमच्या देवस्थान समितीचे सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष असते.
कोरोनामुळे वारीत दोन वर्षे खंड पडल्यामुळे लोक अस्वस्थ आहेत. आता निर्बंध उठल्याने गर्दी वाढेल, असा अंदाज आहे. एरवी वाटेवर ५ ते ७ लाख, आणि पंढरपुरात ८ लाखांची गर्दी असते. यावेळी ही गर्दी १२ सलाखांच्या वर जाण्याचा अंदाज आहे.

कोरोनाच्या काळातही नियोजन

कोरोनाच्या काळातही माऊलींच्या पादुका एसटी बसमधून पंढरपूरला गेल्या. त्यासोबतही आमचा सगळा हा संच होताच. सोबत २५ ते ५० लोक होते. त्यांच्या जेवणाची सुविधा वगैरे आम्ही केली. माउलींच्या पालखीच्या रथाबाबत बोलायचं झालं, तर १५ दिवस अगोदर आम्ही बैल लावून रथाची चाचणी करतो. त्याचे ब्रेक, ऑईलींग, चाकं, लाईट, जनरेटर तपासून घेतो. चांदीच्या रथाला पॉलिश करून घेतो. वाटेत अंधार असतो म्हणून रथावर मागे, पुडे दोन हॅलोजनचे दिवे बसविलेले असतात. रथाला दोन बैल असतात. ज्याचा मान आहे ते रथावर बसतात. त्यात आमचे विश्वस्त, चार सेवक, चवरीवाले पाटील माऊलींना वारा घालण्यासाठी रथात बसतात. माऊली ऐश्वर्यात पंढरीला जाते. ऐश्वर्याच्या पुढे दोन घोडे, असतात. ते रोज खाली वाकून माऊलींचे दर्शन घेतात. निघण्यापूर्वी समाधीपुढे अश्वांची पूजा केली जाते. पालखी पुढे २७ दिंड्या आहेत आणि पाठीमागे 250 ते 300 दिंड्या आहेत. पालखीला गावातील विद्यार्थी, स्वयंसेवक, गावकरी खांदेकरी म्हूणून असतात. पालखीत नवे वस्त्र, गादी असते. त्यामध्ये पादुका ठेवल्या जातात. त्याला मागे पांढरा कव्हर घातलेली उशी ठेवली जाते.

पालखीला देवस्थानचे १० खांदेकरी असतात. रथाच्या बैलांना गावातील लोकही चारा-पाणी देतात. बैलाच्या मानेला तेल लावण्याची वगैरे व्यवस्था देवस्थान करते.
प्रस्थानाच्या दिवशी माऊलींची विधीवत पोशाख करून पूजा केली जाते. पुढे पादुका ठेवल्या जातात. त्यानंतर शितोळे सरकार, शिंदे सरकार, मान्यवर, गावातील गावतील मानकरी यांन देवस्थानतर्फे मानाचे पागोटे बांधले जाते. शितोळे सरकारांना पागोटे देतात. देवस्थान तर्फे प्रत्येक दिंडीवाल्याला श्रीफळ दिले जाते. मानाचा नारळ घेऊन ते पुढे गेल्यानंतर सोहळा सुरू होतो. आरती झाल्यानंतर देव बाहेर येतात. मग ते पालखीत ठेवले जातात आणि मंदिराला प्रदक्षिणा होते. नगर प्रदक्षिणेसाठी महाद्वारातून बाहेर पडून गावातच आजोळ घरी माऊलींचा मुक्काम होतो. पालखीसमोर रात्रीची आरती, जागर होतो. आजरेकर फड, वासकर फड, जळगावकर महाराज आदींची मानाची कीर्तन प्रवचने होतात.

(छायाचित्रे: माऊली वैद्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *