पुणे : ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा संदेश अंगिकारत गेली ३० वर्षे कामगार, वारकर्‍यांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्याचे काम वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट करीत आहे.

अनेक दानशूर मंडळी, डॉक्टरांनी निरपेक्ष भावनेने या कार्यात सहभागी झाल्याने आज आळंदीतील संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी, देहू येथून निघणारी संत तुकाराम महाराज पालखी आणि सासवड येथील संत सोपानकाका पालखी सोहळ्यात संपूर्ण प्रवासादरम्यान वैष्णव ट्रस्ट सेवा पुरवित आहे. तसेच नाशिक, अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वार येथील कुंभमेळ्यात देखील आरोग्य सेवा पुरविली जात आहे.

वारीच्या वाटेवरच्या अनुभवातून सुचली कल्पना

या उपक्रमाची प्रेरणा आणि वाटचालीबद्दल सांगताना ट्रस्टचे संस्थापक, मुंबई येथे बँक ऑफ बडोदा शाखेतून निवृत्त झालेले कर्मचारी विजय कासुर्डे म्हणाले की, एका उपक्रमानिमित्त देहूच्या गाथा मंदिराचे अध्यक्ष  ह. भ. प. पांडुरंग महाराज घुले यांच्यासोबत ४० दिवस घालवण्याचा योग आला. त्यानंतर वारीत सहभाग घेण्याची उत्सुकता वाढली. वारीच्या वाटेवर डॉ. सुहास महाराज फडतरे यांची ओळख झाली. हे वर्ष होते १९९२. त्या वर्षीच्या आषाढी पंढरपूर पायी वारीत मी सहभागी झालो होतो. या प्रवासादरम्यान आरोग्यसेवेअभावी वारकर्‍यांचे होणारे हाल पाहिले. एका वारकर्‍याच्या पायावरून वाहन गेले होते. यात जखमी झालेला वारकरी उपचार मिळवण्यासाठी विवळत होता; पण यंत्रणा तोकडी असल्याने वेळेवर उपचार मिळू शकले नाही. दुसरा एक वारकरी भोवळ येऊन पडला होता. त्यालाही वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत. या घटना पाहिल्यानंतर वारीवरून परतल्यानंतर तात्काळ सर्व मित्रांशी भेटून अनुभव सांगितला. यातूनच वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट साकारले.

वारीत सहभागी होणार्‍या भाविकांसाठी दरवर्षी आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलले पाहिजेत, असे आग्रहाने सांगितले. हनुमंत महांगडे यांनी माझ्या कल्पनेला उचलून धरत सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली. माझी प्रामाणिक तळमळ पाहून यासाठी पुढाकार घेण्यास सांगितले. काही डॉक्टर मित्रांनीही वारी काळात मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार पहिल्यांदा १९९३ मध्ये औषधांसह डॉक्टरांचे पथक घेऊन एक गाडी वारीत दाखल झाली. सासवड-जेजुरी दरम्यान या सेवेचा शुभारंभ झाला.

भाविकांची मोठी गरज पाहता आमच्याकडे साधने खूप त्रोटक होती. नीरा-लोणंदला वारी पाहोचेपर्यंतच आमच्याकडील औषधांचा साठा संपला. आम्ही पुढे सेवा देऊ शकत नसल्याचे वाईट वाटत होते. आमची गाडी तेथून परतली. मी पुढे पालखीसोबत गेलो. पुढील वर्षी मोठ्या ताकदीने सहभागी होण्याचा विचार करीत होतो. त्यानुसार कामाला लागलो. ‘फुड्स अ‍ॅण्ड ड्रग्स’चे अधिकारी अनंत मोहिते, डॉ. नरेंद्र बांगी यांना आमच्या उपक्रमाची माहिती दिली. त्यांनाही संकल्पना आवडल्याने सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आमची ताकद वाढली. अन्न व औषध प्रशासनाचे व्ही. डी. कदम, सहआयुक्त एम. पी. मोरे यांचाही सहभाग झाल्याने आमची ताकद वाढली. चार रुग्णवाहिकांसह ट्रकभर औषधे घेऊन १९९४ मध्ये आम्ही आळंदी-पंढरपूर पालखी सोहळ्यात सहभागी झालो. याकामी महांगडे, काही डॉक्टर्स आणि मी पुढाकार घेतला होता, असेही कासुर्डे यांनी सांगितले.

ट्रस्टची स्थापना

वाढती मदत आणि भाविकांची गरज विचारात घेऊन कामाचा विस्तार करण्याचा विचार केला. त्यादृष्टीने १९९५ मध्ये चॅरिटी अंतर्गत नोंदणी करण्याचे ठरविले. आवश्यक कागदपत्रे आणि पाठपुरावा करून १९९६ मध्ये वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टची नोंदणी केली. त्यानंतर आमच्या कामाला अधिक गती मिळाली. आमच्या या कामात हनुमंतराव महांगडे यांचा मोठा वाटा आहे. माझी कामाची तळमळ आणि प्रामाणिकता पाहून त्यांनी ट्रस्टची जबाबदारी माझ्यावरच सोपवली. मी देखील ही जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने इतकी वर्षे समर्थपणे पेलत आहे. केवळ आळंदी-पंढरपूरच नाही तर देहू वरून निघणार्‍या पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांनाही आरोग्य सेवा पुरविण्याचा निश्‍चय केला. त्यानुसार २००० मध्ये देहू-पंढरपूर दरम्यानही आरोग्य सेवा पुरवू लागलो. याकामी रामभाऊ नलावडे, डॉ. डांगी, डॉ. सुहास फडतरे यांनी मोलाची जबाबदारी पेलली. तेव्हापासून आजपर्यंत ही सेवा अविरतपणे सुरू आहे. कोरोना काळात यात खंड पडली असली तरी पुन्हा सर्व ताकदीने सेवा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही विजय कासुर्डे यांनी सांगितले.

प्रामाणिक सेवा पाहून धावले मदतीचे हात

वारीच्या वाटेवर वारकऱ्यांवर वैद्यकीय उपचार करणारे वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे डॉक्टर.आळंदी आणि देहू येथून निघणार्‍या पालखी सोहळ्यात वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट पुरवित असलेली आरोग्य सेवा पाहून अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला. मोफत सेवा पुरविण्यासाठी डॉक्टर मंडळी देखील पुढे आली. अशीच सेवा संत सोपानकाका पालखी सोहळ्यात पुरविली जावी. त्यासाठी हवी ती मदत केली जाईल, असा प्रस्ताव संत सोपानकाका बँकेच्या वतीने ठेवण्यात आला. त्याचेही स्वागत करत २००५ पासून या पालखीतही वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट आरोग्य सेवा पुरवित आहे. आमच्या सोबत एकूण ८० डॉक्टर्स, १५० कार्यकर्ते कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता वारी काळात १८ दिवस सेवा पुरवतात. तसेच दानशूरांनी मदतीचा हात पुढे केल्याने आज ट्रस्टची ४० लाख रुपयांची एफडी आहे. त्याच्या व्याजातून या उपक्रमाचा खर्च उचलला जात आहे. कुर्ला येथे ऑफिस आहे. ट्रस्टच्या मालकीच्या दोन रुग्णवाहिका आहेत. यातून वारीसोबतच इतर वेळी कुर्ला कार्यालयात दररोज मोफत वैद्यकीय सेवा पुरविली जाते. महालक्ष्मी मंदिर, सिद्धीविनायक मंदिर येथेही आरोग्य कॅम्प घेतले जातात. ताडदेवला कामगार सोसायटीत क्लिनिक चालवले जात आहे. आदिवासी पट्टयात नेरळ येथील शाळेत आरोग्य कॅम्प घेतले जातात. मुंबईत २००५ मध्ये पूर आला होता, तेव्हा १०० मेडिकल कॅम्प घेतले. यापुढेही सुसज्ज असे रुग्णालय उभारून गरजूंना सर्व अत्याधुनिक आरोग्यसेवा पुरविण्याचा ट्रस्टचा मानस आहे, असे विजय कासुर्डे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *