पुणे : देशाचं भविष्य ज्यांच्या हाती आहे त्या तरुणाईला व्यसनमुक्त बनवण्याच्या उद्देशाने युवकमित्र ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली. किल्ले प्रतापगड येथे ११ मे २००० रोजी स्थापन झालेल्या या संघाने आजवर हजारो युवकांना व्यसनमुक्तीची दिक्षा दिली आहे. त्यामुळे या युवकांचे आणि त्यांच्या परिवाराचे, पर्यायाने देशाच्या युवाशक्तीचे होणारे नुकसान टळले आहे.

अध्यात्म प्रबोधन, व्यसनमुक्ती, राष्ट्रभक्ती, समाजसंघटन, अंधश्रध्दा निर्मूलन, वृक्षसंवर्धन, बलसंवर्धन आणि गोपालन ही या युवक संघाची उद्दिष्ट्ये आहेत. अवघा युवक व्यसनमुक्त, सदाचारी, सशक्त, स्वाभिमानी, स्वावलंबी, आदर्श बनविणे हा व्यसनमुक्त युवक संघाचा अजेंडा आहे. यानुसार भ्रष्टाचार, व्यभिचार, जुगार, मटका, मद्यपान, मांसाहार, तंबाखू, गुटखा, धूम्रपान, हॉटेल, धाबा, चहा, कॉफी, नाटक, तमाशा आदी व्यसने अधोरेखित करून त्यापासून मानवाला मुक्त करण्याचा प्रयत्न हा युवक संघ गेली अनेक वर्ष सातत्याने करीत आहे.सुमारे १० जिल्ह्यांतील ६० ते ६५ तालुक्यांत सुमारे १००० गावात कमी अधिक प्रमाणात संघटनेचे कार्य चालले आहे. आतापर्यंत १४ राज्यस्तरीय शिबिरांतून सुमारे १५ हजार युवकांना त्याचप्रमाणे युवतींच्या सहा राज्यस्तरीय शिबिंरातून तीन हजार युवतींना संघटनेच्या विचारांनी प्रभावीत केले आहे. परिवर्तनाच्या या कार्यात तन, मन, धन अर्पण करून राष्ट्रकार्यात सहभागी व्हा, असे आवाहन केले गेले. सध्या व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष म्हणून दीपक जाधव काम पाहत आहेत.

कीर्तनातील आवाहनाला प्रतिसाद

समाजाचा पर्यायाने देशाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर युवक व्यसनमुक्त झाला पाहिजे. आज व्यसनांच्या गुलामीत अडकलेला तरुण त्यातून मुक्त झाला पाहिजे, असे मत गुरूवर्य ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी १५ ऑगस्ट १९९६ रोजी भादे (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे कीर्तनातून मांडले. तसेच व्यसनमुक्त होण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. कदाचित एकही तरुण प्रवृत्त होईल की नाही असे वाटत असतानाच अनपेक्षितपणे ३० मुले व्यसनमुक्त होण्यासाठी पुढे आली.

आपण योग्य मार्गदर्शन केल्यास तरुण मुले सहज बदलतील, व्यसनमुक्त होतील याची बंडातात्यांना खात्री वाटली. तेथून पुढे मग प्रत्येक कीर्तनात त्यांनी हा व्यसनमुक्तीचा प्रचार सुरू केला. त्यातून अनुभव असा आला की अनेक वर्षे दारूसारख्या भयंकर व्यसनाच्या आहारी गेलेली माणसेसुध्दा व्यसनातून बाहेर आली. हेच काम सांघिकपणे केल्यास चांगला प्रतिसाद मिळेल आणि बहुसंख्य तरूण व्यसनमुक्त होतील हा विश्वास बंडातात्यांना वाटला. यातूनच व्यसनमुक्त युवक संघ स्थापन झाला. युवकांना एकत्र करून तात्यांनी ५ ते १२ मे २००० या कालावधीत प्रतापगड येथे संघटनेचा पहिला संस्कार सोहळा आयोजित केला. सचिन शिंदे यांची संघटनेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. या सोहळ्यास बाबासाहेब पुरंदरे, राजीव दीक्षित, अण्णा हजारे, डॉ. कल्याण गंगवाल आदींनी मार्गदर्शन केले. व्यसनांचे पाश आणि दुष्परिणाम कळाले तर कोणीही सद्सद्विवेकी व्यक्ती नक्की बदलेल. याच विचारातून ’व्यसनमुक्ती प्रबोधिका’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.

पावन स्थळांवर संस्कार सोहळे

किल्ले प्रतापगडनंतर धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानाने पवित्र झालेल्या श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली, पुणे), मुरारबाजी देशपांडे यांच्या वीरगतीने पावन झालेल्या किल्ले पुरंदर (पुणे), हिंदवी स्वराज्याची राजधानी असणार्‍या राजतीर्थ किल्ले रायगड, तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने फत्ते झालेला किल्ले सिंहगड, बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या हौतात्म्याने पुलकीत झालेला किल्ले पन्हाळगड, संत रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ले सज्जनगड, छत्रपती शिवाजीमहाराज यांचे जन्मस्थळ असलेला किल्ले शिवनेरी, छत्रपती संभाजी महाराजांच्या वीरश्रीने पावन झालेला किल्ले धर्मवीरगड (बहादूरगड), सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मस्थानी (भोसरे, जि. सातारा), किल्ले रामशेज (जि. नाशिक), स्वराज्याच्या सुरुवातीची  25 वर्षे राजधानीचे ठिकाण असलेला किल्ले राजगड (पुणे), सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या बलिदानाने पावन झालेला किल्ले केंजळगड (जि. सातारा), फिरंगोजी नरसाळे यांच्या अतुल पराक्रमाने पुनीत झालेला किल्ले संग्रामदुर्ग (चाकण, ता. खेड, जि. पुणे) या 14 ठिकाणी व्यसनमुक्त युवक संघाचे प्रतापी संस्कार सोहळे पार पडले. प्रत्येक सोहळ्यात सुमारे दीड हजार युवकांचा सहभाग होता.

व्यसनमुक्त युवक संघटनेचा प्रत्येक प्रतापी संस्कार सोहळा हा ऐतिहासिक ठिकाणीच साजरा होतो. मुलांमध्ये तीव्र देशभक्ती जागृत व्हावी, हा यामागचा हेतू आहे. या सोहळ्यात प्राधान्याने युवकांनाच प्रवेश दिला जातो. ज्यांचे जीवन आदर्श, निष्कलंक आहे अशा सन्माननीय व्यक्तींना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले जाते. सोहळ्यात सहभागी होणारा प्रत्येक युवक स्वत:ची वर्गणी जमा करतो. यात संत साहित्याचे पारायण, व्याख्याने, प्रवचने, चर्चासत्र, कीर्तन, योगासने, सूर्यनमस्कार आदींचा समावेश असतो.

व्यसनमुक्त युवक संघाचे कार्य –

– मानवास असह्य दु:ख देणाऱ्या, तसेच मानवता, सुख-समृध्दी आणि पैशांचा नाश करणाऱ्या, निसर्ग विरोधी, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या घात करणाऱ्या, कलंकीत करणाऱ्या व्यसनांविरोधात प्रचार प्रसार करण्याचे काम व्यसनमुक्त युवक संघ करत आहे.

– गाव आणि तालुका पातळीवर युवकांची २०० पेक्षा अधिक शिबिरे, मेळाव्यांचे आयोजन . राज्यभरातून सुमारे दोन हजार युवकांना एकत्रित करून दरवर्षी राज्य पातळीवर चार दिवसांची १४ शिबिरे घेतली. या माध्यमातून हजारो युवकांना व्यसनमुक्तीची दीक्षा दिली.

– ठिकठिकाणी १५ हजारांहून जास्त वृक्षांचे रोपण-संगोपन केले. ३५ पेक्षा जास्त गावांतील विक्रेत्यांचे प्रबोधन करून गुटखा विक्री बंद केली. ओंड (ता. कराड, जि. सातारा) या गावातील सरकारमान्य बिअरबार महिलांच्या मतदानाने कायमस्वरूपी बंद केला. ही भारतातील पहिली घटना आहे.

– राज्यात अनेक ठिकाणी अवैध दारूविक्रीविरोधात युवक आणि महिला कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. कराड तहसील कार्यालयावर पाच हजार लोकांचा मोर्चा काढून दारूविरोधात शासनाला जागविण्याचे काम केले.

– युवक संघाच्या माध्यमातून अनेक गावांत स्वच्छता अभियान, निर्मलग्राम योजना राबविली. बेरोजगार युवकांचा मुलभूल प्रश्न सोडविण्यासाठी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले. सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यातूनच अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग राबवू लागले आहेत. याबाबत कोरेगाव तालुक्यातील प्रमोद बोरगे हे संघटनेचे कार्यकर्ते मार्गदर्शन करतात.

– रासायनिक खतामुळे जमिनींचा होणारा र्‍हास आणि अन्नातून मानवतेवर होणारा परिणाम, फास्टफूड, व्यसनाधिनता, व्यायामाचा अभाव, ताणतणाव यामुळे हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा, मुतखडा, कॅन्सर अशा अनेक आजारांना समाज सामोरा जात आहे. त्यावर उपाय म्हणून माणसाचा योग्य दिनक्रम आणि आरोग्य नियम यावर प्रबोधन करण्याचे काम प्रताप कदम, सचिन शिंदे यांनी केले.

– शेतकर्‍यांना गाईचे महत्त्व सांगून गोहत्या बंदी आणि गोरक्षणाचा प्रयत्न सुरू आहे. या अंतर्गत युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करवडी, राजमाची, पिंपरद येथे गोशाळा, सेंद्रीय आणि गांडूळ खत निर्मितीचे प्रकल्पही उभारले आहेत.

– किल्ले सिंहगड, किल्ले पुरंदर, किल्ले प्रतापगड येथे स्वच्छता अभियान राबविले. संत तुकाराम महाराजांच्या तपोभूमीत भामचंद्र डोंगर परिसरात ‘डाऊ केमिकल्स’ या विषारी रसायने बनविणार्‍या अमेरिकन कंपनीविरोधात आंदोलन करून त्या कंपनीला पिटाळून लावले.

– सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, नांदेड, जिल्ह्यात सरकारच्या आदेशाचा उपयोग करून १०० हून अधिक सरकारमान्य देशी दारू दुकाने आणि बिअरबार, वाईनशॉप बंद केली. १० महिने २३ दिवसांत जावळी (जि. सातारा) येथील १३ दारू दुकाने बंद करून देशातील पहिला दारू दुकान मुक्त तालुका होण्याचा मान मिळाला.

– जावळी तालुक्यात बामणोली येथील ८ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना २०११ मध्ये घडली. या घरांतील लोकांना तात्काळ मदत करण्याच्या हेतूने मेढा येथे फेरी काढून १५ हजार रुपये, धान्य, कपडे, प्लास्टिक कागद आदी जीवनावश्यक साहित्य मिळवून दिले.

– संघटनेचे दादासाहेब नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरद (पवारवाडी, ता. फलटण) येथे बालसंस्कार केंद्र सुरू केले असून, हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. दलाल, व्यापारी यांच्याकडून ग्राहकांची होणारी लूट आणि दर्जाहीन धान्य आणि माल यामुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना न्याय मिळवून दिला. शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी कडधान्ये, साबुदाणा, तांदूळ, सेंद्रिय गूळ, मिरची पावडर, मसाला विक्री करण्याचे केंद्र संघटनेने सुरू केले आहे. ग्राहकांच्या दारापर्यंत जाणारे फिरते दुकान उपलब्ध केले आहे.

– नवलाख उंबरे (मावळ) ग्रामस्थांनी कडवा प्रतिकार करून हिरानंदानीची होऊ घातलेली कंपनी बंद करण्यात यश मिळवले. जेजुरी ‘एमआयडीसी’साठी शेतकर्‍यांच्या संपादित जमिनी अनेक वर्ष पडून आहेत. तरीसुध्दा आणखी जमीन संपादीत करण्याचा घाट शासनाने घातला होता. युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाने त्याला तीव्र विरोध करण्यात आला. याच प्रश्नावरून पुरंदर तालुक्यातील दोन हजार मतदारांचे मावडी कडेपठार येथील ग्रामस्थांना बंडातात्यांनी मार्गदर्शन करून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आहवान केले होते. त्याला प्रतिसाद देत १०० टक्के मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकून पुणे जिल्हयात इतिहास घडविला.

– टोलनाक्यावर होणारी टोलधाड थांबविण्यासाठी सात दिवस पेरणे टोलनाक्यावर वाहनगणती केली. त्याचा अहवाल पाठवला. हजारो युवकांनी पेरणे टोलनाक्यावर शांततेने आंदोलन केले. या वेळी बंडातात्यांसह शेकडो युवकांना अटक झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *