सायंकाळी उशिरा संत ज्ञानदेव आणि

संत तुकारामांच्या पालखीचे आगमन

पुणे : ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषात, टाळमृदंगाच्या गजरात, रिमझिम पावसात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात आज (दि. ३०) दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सायंकाळी उशिरा आगमन झाले. पुणेकरांनी प्रचंड उत्साहात या पालख्यांचे स्वागत केले.

तुकोबारायांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात रात्री पावणे दहा वाजता, तर माउलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात रात्री साडेदहा वाजता विसावली. पालख्या रविवारी आणि सोमवारी पुण्यात मुक्कामी असतील.

रविवारी (दि. ३०) सकाळी देहू आणि आकुर्डीहून पुण्याकडे मार्गस्थ झाला. पालख्यांच्या दर्शनासाठी वाकडेवाडी ते संचेती चौकापासून दुतर्फा गर्दी झाली होती. तसेच, शहरातील विविध संस्था आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घालून पालख्यांचे स्वागत केले.

पुणे महापालिकेच्या वतीने वाकडेवाडी येथे पालख्यांचे स्वागत करण्यात आले. त्यासाठी चौकात स्वागत कमानी उभारल्या होत्या. पालखी सोहळ्यामध्ये शेकडो दिंड्या आणि हजारो वारकऱ्यांचा सहभाग आहे. तुकोबांची पालखी रविवारी सकाळी बोपोडीमार्गे, तर माउलींची पालखी विश्रांतवाडीमार्गे शहरात दाखल झाली.

यंदा भाविकांची प्रचंड गर्दी असल्याने संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा बराच उशिरा पुण्यात पोहोचला. एरवी दुपारी एक वाजता विश्रांतवाडी या ठिकाणी पालखी पोहोचते. पण, यंदा ती साडेतीन वाजता पोहोचली. त्यानंतर पालखी संचेती चौकात साडेसात वाजता आली. त्यामुळे पुढे सर्वच ठिकाणी पालखीला उशीर होत गेला.

प्रत्येकाच्या तोंडून ‘माऊली माऊलीचा जयघोष ऐकू येत होता. पालख्यांवर ठीकठिकाणी फुलाची उधळण करण्यात येत होती. पालखी रथासमोरील मानाच्या अश्वाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर पुणेकरांची गर्दी ओसंडून वाहत होती. संत तुकाराम पादुका मंदिरामध्ये तुकोबांची पालखी सायंकाळी सात वाजता पोहोचली.

तिथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व शिक्षण तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आरती झाली. मोहोळ यांनी चौघडा गाडीचे सारथ्यही केले. तिथून संत तुकोबांची पालखी अलका चौकातून लक्ष्मी रस्त्यावर आली. डेक्कन परिसर आणि लक्ष्मी रोडवरही दर्शनासाठी गर्दी झाली. तेथून पालखी नाना पेठेकडे मार्गस्थ झाली. माउलींचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये, तुकोबांची पालखी मुक्कामासाठी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये विसावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *