पुरणपोळीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध
असलेले भोजाजी महाराज संस्थान
विदर्भाची पंढरी म्हणून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा हे गाव ओळखले जाते. या गावाची ही ओळख आहे, ती निस्सीम विठ्ठलभक्त संत भोजाजी महाराज यांच्यामुळे. आज महाराजांची पुण्यतिथी. पुरणपोळीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध असलेल्या आजनसरा येथील संत भोजाजी महाराज मंदिरात १९५५ पासून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते. यंदाही २० एप्रिलपासून हा उत्सव सुरू झाला. आज दिनांक २७ रोजी त्याची समाप्ती झाली.
सर्वधर्म समभावाची शिकवण
आजनसरा येथील विदर्भासह मध्यप्रदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत भोजाजी महाराज यांचे मंदिर आहे. १८०० मध्ये भोजाजी महाराजांचा जन्म आजनसरा येथे झाला. पुढे ते एक संत आणि सिद्धपुरुष म्हणून नावारुपास आले. महाराज धर्मभेद, जातिभेद मानत नव्हते. ते सर्वधर्म समभावाची सर्वांना शिकवण देत. त्या काळी त्यांनी दिलेली शिकवण येथील गावकरी आणि भाविक अजूनही जपत आहेत. महाराजांचा फोटो कोणाकडेही उपलब्ध नव्हता. पण, पूर्वजांनी सांगितलेल्या वर्णनानुसार येथील मंदिरातील मूर्ती घडवण्यात आली आहे.
आषाढी, कार्तिकी एकादशीला यात्रा
संत श्री भोजाजी महाराज यांच्या मंदिरात दरवर्षी आषाढी-कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. महाराजांच्या आरत्याही प्रसिद्ध आहेत.
आजनसरा आहे सोन्याची खान।
बाबा भोजाजीचे अमर आहे नाव।।
ही त्यापैकीच एक आरती आहे. शिवाय, पुण्यतिथी उत्सवानिमित्त येथे दहीहंडी उत्सवाचेही आयोजन केले जाते. त्याला शेकडो भाविक जमतात आणि प्रसाद मिळवण्यासाठी धडपड करतात. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.
दरवर्षी पंढरीची वारी
महाराजांनी आपल्या कार्यकाळात कोड आणि महारोग याबाबत जनजागृती केली. महाराजांना एक बहीण आणि भाऊ होते. महाराज अजन्म ब्रह्मचारी राहिले. त्यांनी आयुष्यभर विठ्ठलभक्त केली.
संत भोजाजी महाराज आणि पुरणपोळी
भोजाजी महाराज न चुकता दरवर्षी पंढरीची वारी करायचे. पुरणपोळी त्यांचा आवडता पदार्थ. वारीच्या निमित्ताने महाराज आवर्जून पुरणपोळ्या करायला सांगत. त्या भक्तांना प्रसाद म्हणून वाटत. महाराजांची ही परंपरा अजूनही येथे सुरू आहे. आजही दर बुधवारी आणि रविवारी पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू असतो. भाविक हा पुरणपोळीचा प्रसाद खाऊन तृप्त होतात. या ठिकाणी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांतील भाविकांचा रोजचा राबता असतो.
नैवेद्य पुरणपोळीचाच देण्याची अट
भोजाजी महाराज समाधिस्त झाल्यावर काही वर्षांनी मंदिराचे बांधकाम सुरू झाले. मंदिरात महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मंदिर मोठे असून आजूबाजूचा परिसरही प्रशस्त आहे. येथे सर्व जातीधर्माचे, पंथाचे, गरीब, श्रीमंत, सुशिक्षित आणि भोळेभाबडे भाविक सर्वच मंडळी येतात. त्यांनी महाराजांना पुरणपोळीचाच नैवद्य दाखवावा, अशी अट आहे. कोणा तरी भक्ताच्या स्वप्नात महाराज आले अन् पुरणाच्या नैवेद्याची परंपरा सुरू झाली, असे सांगतात. पुरणपोळीसाठी दर महिन्याला येथे ४० हजार किलो पुरण शिजत असते, असे स्थानिक लोक सांगतात.
रविवार, बुधवार शेकडो पंगती
येथे रविवारी आणि बुधवारी पाच हजारांवर भाविकांचे पुरणपोळीचे स्वयंपाक असतात. या दिवशी स्वयंपाकासाठी मंदिर परिसरसुद्धा कमी पडतो. आजनसरा येथे निवास व्यवस्था आणि अद्यावत पुरण पोळीच्या स्वयंपाकाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील पुरणवाटणी यंत्र प्रसिद्ध आहे. दर बुधवार-रविवारी येथे शेकडो भक्तांच्या पंगती येथे होत असतात. पंगतीमध्ये पुरणपोळीचा प्रसाद ठरलेला असतो.
हरिनाम सप्ताहाचे आयोजन
संत श्री भोजाजी महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दरवर्षी हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात येतो. शिवाय, भजन-कीर्तन आणि प्रवचनाचेही कार्यक्रम असतात. उत्सव काळात महाराजांच्या प्रतिमेची पालखी काढण्यात येते. त्यात शेकडो भाविक सहभागी असतात. महाराजांच्या मूर्तीपुढे गाऱ्हाणे मांडतात. नवस करतात. त्याची पूर्ती झाल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. अशी ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. या सर्व परंपरांसोबतच महाराजांनी शिकवलेला सर्वधर्म समभाव आणि मानवतेच्या विचारांना ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!