कुटुंब, गाव आणि देशभक्तीत
देव पाहायला सांगणारे राष्ट्रसंत
अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार तालुक्यातील यावली हे तुकडोजी महाराजांचे जन्मगाव. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते. वडिलांचे नाव बंडोजी गणेशपंत इंगळे आणि आईचे नाव मंजुळा होते.
– डॉ. अशोक राणा, यवतमाळ
लहानपणापासून त्यांना पोहणे, घोडेस्वारी अशा खेळांची आवड होती. लहानपणी त्यांना गरीबीचे चटके सहन करावे लागले. शिक्षण चौथीपर्यंत झाले. आईसोबत ते आजोळ श्री क्षेत्र वरखेडला आले. तेथे नाथपंथीय सद्गुरू आडकोजी महाराज यांच्या सहवासात आले. त्यांनी माणिक हे नाव बदलून महाराजांचे नाव तुकडोजी असे ठेवले. आडकोजी महाराजांच्या प्रेरणेनेच तुकडोजी महाराज अभंग रचना करू लागले.
आजोबा होते विठ्ठलभक्त
तुकडोजी महाराजांचे आजोबा गणेशपंत हे विठ्ठलाचे निस्सीम उपासक होते. आषाढी एकादशींची पंढरीची वारी त्यांनी कधीही चुकविली नाही. संपूर्ण ज्ञानेश्वरी त्यांना मुखोद्गत होती. त्यांना सात मुली आणि एक मुलगा झाला. त्या मुलाचे नाव होते, बंडोपंत. हेच तुकडोजींचे पिता होत. त्यांच्या वागण्यातील बंडखोरीमुळे त्यांना बंडोपंत हे नाव मिळालले होते. त्यांचा पंढरीच्या वारीवर मुळीच विश्वास नव्हता. वारी करणाऱ्या त्यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही, असे त्यांचे म्हणणे होते. पुढे त्यांचा मुलगा म्हणजे तुकडोजी महाराजांनी मात्र आयुष्यभर पंढरीची वारी आणि संत विचारांचा प्रचार प्रसार केला.
जनजागरणासाठी खंजिरी भजने
समाजातील कुरीतीविरुद्ध जनजागरण करण्याकरिता तुकडोजी महाराजांनी कवने रचली. खंजिरी वाजवून ते भजन करीत. त्यांच्या भजनांची पुस्तकेही प्रकाशित झाली. सामाजिक कार्यामुळे महाराजांचा महात्मा गांधीजींशी परिचय झाला आणि ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांना अटक झाली आणि तुरुंगवासही भोगावा लागला. आचार्य विनोबा भाव यांच्या भूदान चळवळीत त्यांनी १० दिवसांत ११ हजार ४१० एकर जमीन मिळवून देऊन मोलाचे योगदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी देशाच्या उभारणीत सहभाग घेतला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी महाराजांना ‘राष्ट्रसंत’ या उपाधीने गौरविले.
अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेश आंदोलन
आपले आजोबा आणि आजीप्रमाणेच तुकडोजी महाराजही नियमितपणे आषाढी एकादशीला पंढरीच्या वारीला न चुकता जात. २१ जुलै १९४५ रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला तुकडोजी गेले असता त्यांनी अस्पृश्यांना मंदिराबाहेर दर्शनासाठी ताटकळत असताना पाहिले. त्याचा निषेध म्हणून तुकडोजी महाराज विठ्ठल मंदिरासमोर असलेल्या संत चोखामेळा यांच्या समाधीसमोर बसले. त्याबाबत विचारल्यावर महाराज म्हणाले, “समाजात काही विशिष्ट जातीत जन्मास आलेल्या लोकांना इतर अनेक बाबतीत मागे पडावे लागते. अनेक न्याय्य लाभांपासून दूर राहावे लागते. ही वस्तुस्थिती अत्यंत खेदजनक आहे यात शंका नाही, परंतु या सर्वावर कळस चढविणारी गोष्ट म्हणजे कित्येकांना पतितपावन भगवंताच्या मंदिरात जाऊन त्याचे दर्शन घेण्यासही बंदी केली जाते. देवाच्या दर्शनाने ते पावन होण्याऐवजी त्यांच्या सावलीने देवच बाटतो, असे अत्यंत विसंगत आणि विकृत विचार मांडून लोक त्यांना कुत्र्या-मांजरापेक्षाही नीच लेखतात. मानवतेला आणि भक्तिभावाला कलंक लावणारी गोष्ट याहून दुसरी कोणती?”
महाराजांनी आपले हे मत काही कार्यकर्त्यांकडे लेखी स्वरुपात दिले. ते कळताच काही सनातन्यांनी महाराजांना शास्त्रार्थ करण्याचे आव्हान दिले. त्याला योग्य शब्दांत महाराजांनी पत्र लिहून उत्तर दिले. परंतु त्या पत्राचे उत्तर मात्र महाराजांना मिळाले नाही. एका कीर्तनकाराने त्यांना मिश्किलपणे प्रश्न केला की, आपण पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाविषयी बोलता, पण आपल्या वरखेडच्या गुरुमहाराजांच्या समाधी मंदिराचे काय?त्यावर महाराज उत्तरले, ‘याच कारणाने मी स्वतः उभारलेल्या त्या समाधी मंदिरात जाण्याचे सोडले आहे!’
आडकोजी महाराज मंदिरात अस्पृशांना प्रवेश
पंढरपूरहून महाराज वरखेडला आल्यावर तिथल्या लोकांनी आपण पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश का केला नाही, असे विचारले. त्यावर महाराजांनी तिथला वृत्तांत सांगितला आणि जोपर्यंत या ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश नसेल, तोपर्यंत मीही या मंदिरात जाणार नाही, असे ठामपणे सांगितले. महाराजांचा दृढनिश्चय पाहून गावकरी मंडळींनी ७ ऑगस्ट १९४६ रोजी सर्वांसाठी आडकोजी महाराजांचे समाधी मंदिर खुले केले. तेथील कार्यकर्त्यांनी महाराजांच्या विनंतीनुसार गावातील अस्पृश्यांना आपल्या हातात हात धरून मंदिरात नेले. सार्वजनिक विहिरी आणि मंदिरे सर्वांसाठी खुली करावीत, असे विचार आपल्या भजनांमध्ये महाराज मांडत होते. त्यानुसार गावोगावच्या गुरुदेव सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील मंदिर आणि विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या केल्या. त्यामुळेच अस्पृश्यांसाठी पंढरपूरचे मंदिर खुले व्हावे, यासाठी उपोषण आंदोलन करणाऱ्या पूज्य साने गुरुजी यांच्यासोबत तुकडोजी महाराज होते. १० मे १९४७ रोजी साने गुरुजींचे उपोषण संपले, तेव्हाही तुकडोजी महाराज त्यांच्यासोबत होते. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले.
‘ग्रामगीते’ची प्रेरणा पंढरपुरात
२३ जुलै १९५३ या दिवशी आषाढी एकादशी होती. या दिवशी पंढरपूरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले पांडुरंगाचे भक्त पाहून त्यांच्याकरिता आपण काय करू शकतो, हा विचार करू लागले. त्यांच्या संवेदना तीव्र झाल्या आणि त्यांनी सर्वसामान्य माणसांकरिता ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला. महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वराज्याची संकल्पना या ग्रंथामधून त्यांनी विस्ताराने सांगितली आणि आपल्या चिंतनाचे सार त्यांनी त्याद्वारे व्यक्त केले. आपल्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून राष्ट्रसंतांनी बारा महिन्यांमध्ये ग्रामगीतेची रचना केली. त्यांनी ४१ अध्यायांमधून ४ हजार ६७५ ओव्या रचल्या. प्रवासातही ते ग्रामगीतेचे लेखन करीत असत. पोशिंदा शेतकरी हा या ग्रंथाचा केंद्रबिंदू आहे. त्यालाच ग्रामनाथ असे संबोधून त्याला त्यांनी हा ग्रंथ अर्पण केला आहे.
विश्वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व
धर्मकार्य, राष्ट्रकार्य राष्ट्राच्या उभारणीकरिता धर्माचा वापर करणारे तुकडोजी महाराज हे एकमेव संत होत. त्यांनी जपानमध्ये २३ जुलै १९५५ रोजी भरलेल्या विश्वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्या ठिकाणी त्यांनी बुद्धाच्या पंचशील तत्त्वाच्या आधारे विश्वधर्माची संकल्पना मांडली. या परिषदेचे उद्घाटनही महाराजांच्याच हस्ते झाले. परिषदेतील त्यांच्या खंजिरी वादनाने विदेशातील प्रतिनिधींना मंत्रमुग्ध केले. जगाला शांततेच्या मार्गाकडे वळविण्याकरिता धर्मसुधार, धर्मसंघटन आणि धर्मप्रसार कसा उपकारक आहे हे त्यांनी उपस्थितांना सांगितले. दृष्टीने त्यांनी उचललेले पहिले पाऊल म्हणजे १ एप्रिल १९१६ हृषीकेश येथे भरविलेला संत महात्म्यांचा मेळावा. या ठिकाणी त्यांनी ‘भारत साधू समाजा’ची स्थापना केली. भारतावर १९६२ मध्ये चीन आणि १९६५ मध्ये झालेल्या पाकिस्तानच्या आक्रमणाच्या वेळी सैनिकांचे मनोबल वाढविण्याकरिता जनप्रबोधन करून आर्थिक मदत केली. त्याचप्रमाणे स्वतः सीमेवर जाऊन सैन्याला दिलासा दिला.
पंढरपुरात शेवटचे भाषण आणि भजन
देश-विदेशात समाज प्रबोधनासाठी प्रवास करणाऱ्या राष्ट्र तुकडोजी महाराज यांचे शेवटचे भाषण आणि भजन आषाढी एकादशीच्या दिवशी १९६७ मध्ये पंढरपुरात झाले. १९६५ डिसेंबरमध्ये त्यांना कर्करोगाची बाधा झाल्याचे निदान झाले होते. तरीही त्यांनी आपल्या दैनंदिन कार्यात खंड पडू दिला नाही. त्यांनी स्थापन केलेले गुरुदेव सेवा मंडळ त्यांनी संचालक मंडळाच्या स्वाधीन केले. पंढरपुरात विशाल जनसमुदाय समोर त्यांनी दिलले भाषण आणि भजन अखेरचे ठरले. या वेळी ते म्हणाले, की ‘विठ्ठलाच्या दरबाराची माझी ही अखेरची भेट आहे’. ११ ऑक्टोबर १९६८ रोजी तुकडोजी महाराजांची प्राणज्योत मालवली. त्यांची खंजिरी कायमची मूक झाली; परंतु त्यांची भजने आणि ग्रामगीता त्यांच्या विचाराचे आणि गुरुदेव सेवा मंडळ हे कार्याचे स्मारक म्हणून आपणाला सतत प्रेरणा देत राहील.