कीर्तनकारांना घडविणारे

श्री सद्गुरू बंकट स्वामी

ज्यांनी अभंगांच्या मूळ वारकरी गोड, अनवट चाली प्रचलित केल्या, वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो कीर्तनकार घडविले, वारकरी संप्रदायाचा प्रसार खेडोपाड्यांपर्यंत केला त्या पूज्य गुरुवर्य श्री बंकट स्वामी यांची आज पुण्यतिथी.

बीड जिल्ह्यातील निनगूर म्हणजेच आजचे नेकनूर या गावी १८७७ मध्ये एका सामान्य रजपूत कुटुंबात बंकटस्वामी महाराज यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव निहालसिंग आणि आईचे नाव रत्नाबाई होते. श्री व्यंकटेशाच्या आशीर्वादाने पुत्रप्राप्ती झाली म्हणून महाराजांचे मूळ नाव व्यंकटेश होते. तेच ‘व्यंकट’ पुढे ‘बंकट’ झाले.

लहानपणापासून भजनाची आवड
गरिबीमुळे व्यंकटेश यांना पुढे शिक्षण घेता आले नाही. शिक्षण अर्धवट सोडून त्यांना शेळ्या-मेंढ्या, गाई-म्हशींची राखण करण्याचे काम करावे लागले. पण त्यांना लहानपणापासूनच भजनाची आवड होती. कामात असतानाही ते हरिभजनात रंगलेले असायचे. पुढे त्यांनी स्वत:च एकलव्याप्रमाणे मृदुंगवादन आणि संगीताचा अभ्यास केला. साथीदारांसोबत भजनी मंडळ सुरू केले. नोकरीनिमित्त महाराज निनगूर गाव सोडून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे गेले. तेथेही त्यांनी एक भजनी मंडळ सुरू केले. गावोगावी त्यांच्या भजनांचे कार्यक्रम होऊ लागले. इथेच त्यांची भेट लक्ष्मणबुवा इगतपुरीकर या वारकरी संप्रदायातील तरुणाशी झाली. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू गुरुवर्य विष्णुपंत जोग महाराज हे एकदा इगतपुरीला आले असताना बंकटस्वामी त्यांचा संपर्कात आले आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली.

भामचंद्र, भंडारा डोंगरावर अभ्यास
गुरुवर्य जोग महाराज बंकट स्वामींना आळंदीला घेऊन आले. तिथे आल्यावर त्यांनी जवळच्याच भामचंद्र, भंडारा डोंगरावर तीन वर्षे तुकाराम गाथा, नाथ भागवत, ज्ञानेश्वरी या ग्रंथांचे अध्ययन, अभ्यास केला. नंतर काही वर्षे ते आळंदी येथे राहिले. आळंदी येथे जोग महाराजांनी नुकतीच ‘वारकरी शिक्षण संस्था’ सुरू केली होती. त्या संस्थेत बंकट दाखल झाले आणि हळूहळू संस्थेच्या जबाबदार्‍या स्वीकारत गेले. या ठिकाणी त्यांना वारकरी संप्रदायाचे एक अध्वर्यू सोनोपंत मामा दांडेकर यांचा सहवास लाभला. याच काळात महाराजांनी संत साहित्याचे अहोरात्र अध्ययन केले. अजान वृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरीची १०८ पारायणे केली. १९२० मध्ये गुरुवर्य जोग यांचे निधन झाले. त्यानंतर बंकटस्वामी यांनी सोनोपंतांसमवेत आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेची जबाबदारी सांभाळली.

वारकरी शिक्षण संस्थेमार्फत कार्य
स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या वैकुंठ गमनानंतर बंकट स्वामी महाराज हे वारकरी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष झाले. त्यांनी अध्यक्ष म्हणून १८ फेब्रुवारी १९२० ते १२ मे १९४४ पर्यंत म्हणजेच २४ वर्ष ३ महिने संस्थेचा कारभार पाहिला. त्यांच्या दोन तपाच्या काळात वारकरी शिक्षण संस्था घासवाले धर्मशाळेतून संस्थेच्या मालकीच्या जुन्या घरात सुरू झाली. बंकट स्वामी महाराज यांनी संस्थेला स्थैर्य मिळावे म्हणून त्यांनी वर्गणी, दान म्हणून शेतजमिनी, घरे मिळवून संस्थेला स्थैर्य प्राप्त करून दिले. सर्वसामान्य कुटुंबातील, खेडोपाड्यातील मुलांना आळंदी येथे आणून त्यांना वारकरी संस्काराने सुसंस्कृत करून अभ्यासू साधक उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक बनविले. आपल्या शिष्यांच्या माध्यमातून दूरवस्था झालेल्या मठ, मंदिरांचा जीर्णोद्धार घडवून आणला. त्यांचे व्यवस्थापन नीट चालावे म्हणून योग्य शिष्यांची नेमणूक केली. महाराजांच्या या कार्याने वारकरी संप्रदायामध्ये नवे चैतन्य निर्माण झाले.

गावोगावी भजन, कीर्तन, पारायण
श्री बंकटस्वामींना मानणारा अफाट भाविक वर्ग अवघा महाराष्ट्रभर होता. त्यांनी प्रवचने, कीर्तने, भजनांचे अनेक सोहळे गावोगावी साजरे केले. ज्ञानेश्वरी पारायणांचे सामूहिक सोहळे भरवून संतविचार तळा-गाळातील समाजात पोहोचविला. सर्वांना सहजपणे ज्ञानेश्वरी समजावी म्हणून त्यांनी ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ तयार केली. पंढरपूर येथे येणार्‍या वारकरी बांधवांच्या निवासाची गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी लोकसहभागातून मोठी धर्मशाळा बांधली आणि एका ट्रस्टच्या ताब्यात दिली. ते स्वत: वाळवंटात राहत होते. कीर्तनासाठी महाराज गावोगावी पायी फिरत. सोबत बरोबर घोडे, गाडी साधने असूनही त्यांत बसत नसत. आषाढी, कार्तिकी वारीच्या वेळीही ते कटाक्षाने पायीच भजन म्हणत चालत.

 

संत मुक्ताबाईंच्या समाधीची निश्चिती
संत मुक्ताबाईंचे समाधिस्थान ‘मेहूण’ की ‘एदलाबाद’ या वादावर बंकटस्वामींनी उत्तर शोधले. त्यांनी संत नामदेवांच्या अभंगांचा सूक्ष्म अभ्यास करून त्या स्थानावर मुक्ताबाईंची सुंदर मूर्ती स्थापन केली आणि ते स्थान वारकर्‍यांमध्ये प्रिय केले. श्री बंकट स्वामींनी शके ११६६ वैशाख कृष्ण १, दिनांक ९ मे १९४४ या दिवशी सकाळी ८ वाजता आपला देह पांडुरंगाच्या चरणी विलीन केला. अशा या थोर विभुतीला पुण्यतिथी निमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *