‘रामचरितमानस’, ‘हनुमान चालीसा’

लिहिणारे संत गोस्वामी तुलसीदास

‘रामचरितमानस’ लिहून ज्यांनी रामकथा जनमानसात रुजविली, ‘हनुमान चालीसा’ लिहून श्री हनुमंत घराघरांत पोहोचविले, काशी आणि अयोध्या इथे राहून सुमारे ३९ ग्रंथांची रचना केली, असे महाकवी गोस्वामी श्री तुलसीदास महाराज यांची आज जयंती.

चित्रकूट जिल्ह्यात जन्म
संत तुलसीदासांचा जन्म १४९७मध्ये श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी या तिथीस झाला. तुलसीदासांच्या जन्मतिथीबद्दल संशोधकात मतभेद आहेत. सध्याच्या उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर येथे तुलसीदास यांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव आत्माराम दुबे आणि आईचे नाव हुलसी होते. रामचरितमानसच्या बालकांडात त्यांनी तसा उल्लेख केला आहे. तुलसीदासांचे बालपण फारच कष्टात गेले. त्यांचा जन्म मूळनक्षत्रावर झाला असल्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा जन्मत:च त्याग केला. त्यांना नरहरिदास यांनी वाढवले, अशी कथा प्रचलित आहे. तुलसीदासांच्या जन्मानंतर दहा महिन्यांतच त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला आणि तुलसीदास अनाथ झाले, अशीही कथा प्रचलित आहे. त्यांना आईवडिलांचे सुख फारसे मिळाले नाही, एवढे निश्चित. लहानपणी त्यांना एका हनुमानमंदिरात आश्रय मिळाला. त्या दैवताची पूजा ते करू लागले. उदरनिर्वाहासाठी त्यांना भिक्षांदेही करावी लागली. यासंबंधी त्यांच्या काव्यांत विपुल उल्लेख आढळतात.

रत्नावली नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला होता. त्याचा काव्यांतर्गत पुरावाही सापडतो. ते तरुणपणी पत्नीवर खूप आसक्त होते. याआसक्तीपायी लोकाचाराची पर्वा न बाळगता ते पत्नीला तिच्या माहेरी भेटावयास गेले. वादळ, पावसात भेटायला आलेल्या या आसक्त पतीला त्या धर्मनिष्ठ पत्नीने चांगलेच खडसावले. असे म्हणतात, की तिच्या मर्मवेधी बोलण्याने तुलसीदासांचे मन संसारातून उडाले आणि रामभजनी स्थिर झाले.

भारतभर भ्रमण
तुलसीदासांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. ते गौर वर्णाचे, दयाळू आणि परोपकारी होते. काशीमध्ये त्यांना खूप त्रास झाला पण त्यांची सहिष्णू वृत्ती आणि सोशिकपणा कधी कमी झाला नाही. ते मनाने कोमल, स्वभावाने उदार होते. श्रीराम आणि हनुमानावर त्यांची अपार श्रद्धा होती. त्यांना हनुमानाचे, शिवाचे आणि रामाचे साक्षात दर्शन झाले होते, असे सांगतात. तुलसीदासांनी तीर्थयात्रेच्या निमित्ताने खूप प्रवास केला, पण बहुतांशी त्यांचे वास्तव्य काशी येथेच होते. त्यांचे अनेक ग्रंथ काशीमध्येच लिहिले गेले.
तुलसीदास यांनी भारतभर भ्रमण केले. तत्कालीन समाजावर झालेले आक्रमण पाहून ते अतिशय दु:खी झाले. त्यानी भारतातील सर्व राजांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. पण, हे प्रयत्न सफल झाले नाहीत. तरीही तुलसीदास यांनी या आक्रमणाचे स्वरूप समजावून सांगितले. प्रबोधन केल्याने अनेक राजांनी सामना केला. सामान्य लोकांमध्येही त्यांनी जागृती करण्यासाठी मारुतीची उपासना करण्यास सुरुवात केली. हनुमंत हे भक्ती, शक्ती, संघटन कौशल्य, वाकपटुत्व, राजकारणी, चतुर या सर्व गुणांनी युक्त असे आहेत हे त्यांनी रामलीला, रामचरितमानस, हनुमान चालिसा या ग्रंथांच्या माध्यमातून पटवून दिले. हिंदू धर्म हा एक आहे, त्यास पंथात विभागू नका हे त्यांनी सांगितले. तुलसीदासांनी रामलीला नाट्य-प्रकाराची सुरुवात केली.

तुलसीदासांचे तत्त्वज्ञान
उत्तर भारतात खऱ्या अर्थाने भक्तियुगाचा आरंभ पंधराव्या शतकाच्या सुरूवातीला सुरू झाला. या काळातील मोगलांच्या राजवटीत राजकीय आणि धार्मिक आक्रमणाचे संकट उभे राहिले होते. रामचरितमानस या ग्रंथात या परिस्थितीचे प्रतिबिंब पडलेले आहे. धर्माचे मूळ स्वरूप बाजूला पडले. कबीरांसारखे निर्गुणवादी, तुलसीदासांसारखे रामभक्त व सूरदासांसारखे कृष्णभक्त यांनी सत्य, प्रेम, सहानुभूती, करुणा, दया, शांती या मूल्यांवर आधारलेल्या भक्तिमार्गाचा जनतेने अवलंब करावा, असा प्रयत्न केला. तुलसीदासांनी तत्कालीन संप्रदायांत समन्वय करण्याचा प्रयत्न केला आणि शुद्ध धर्माचे स्वरूप भक्तीच्या मार्गाने लोकमानसात रुजावे असा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी आपल्या महाकाव्याचा नायक म्हणून श्री रामाची निवडला केली.

तुलसीदासांचे तत्त्वज्ञान एका अर्थाने समन्वयवादी होते. शंकराचार्यांचा अद्वैतवाद आणि रामानुजाचार्यांचा विशिष्टाद्वैतवाद या दोहोंचा स्वीकार करणारी भूमिका त्यांनी घेतली आहे. सामान्यतः रामानुजाचार्यांच्या तत्त्वज्ञानाकडे त्यांचा कल अधिक होता असे म्हणता येईल. ‘विनयपत्रिकेत’ मात्र ते द्वैतवादाकडे अधिक झुकलेले दिसतात. जगताचे स्वरूप सांगताना शंकराचार्यांच्या मायावादाचे अनुसरण करूनही शेवटी भक्तिमार्गाचे विवेचन करताना मात्र ते रामानुजाचार्यांचे अनुसरण करतात. तुलसीदासांनी मायेची दोन रूपे सांगितली आहेत. अविद्या माया आणि विद्या माया. अविद्या माया माणसाला जंजाळात गुरफटवते, तर विद्या माया ही ब्रह्माची शक्ती आहे. विद्या माया विश्वाचे सृजन, पोषण आणि संहारही करते. या विद्या मायेच्या मदतीनेच जीव जीवनमुक्त होतो. शंकराचार्यांप्रमाणे अद्वैती आहेत, की रामानुजाचार्यांप्रमाणे विशिष्टाद्वैती आहेत, याबद्दल विद्वानांत मतभेद आहेत. ते भक्तिमार्गी असल्याबद्दल मात्र वाद नाही.


हिंदी साहित्यातील भक्तियुग पंधराव्या शतकाच्या आरंभी सुरू होते. या काळातील मोगलांच्या राजवटीत राजकीय आणि धार्मिक आक्रमणाचे संकट उभे राहिले होते. रामचरितमानस या ग्रंथात या परिस्थितीचे प्रतिबिंब पडलेले आहे.धर्माचे मूळ स्वरूप बाजूला पडले. कबीरांसारखे निर्गुणवादी, तुलसीदासांसारखे रामभक्त आणि सूरदासांसारखे कृष्णभक्त यांनी सत्य, प्रेम, सहानुभूती, करुणा, दया, शांती या मूल्यांवर आधारलेल्या भक्तिमार्गाचा जनतेने अवलंब करावा, असा प्रयत्न केला. तुलसीदासांनी तत्कालीन संप्रदायांत समन्वय करण्याचा प्रयत्न केला आणि शुद्ध धर्माचे स्वरूप भक्तीच्या मार्गाने लोकमानसात रुजावे असा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी आपल्या महाकाव्याचा नायक म्हणून जो राम निवडला आहे, त्याच्या व्यक्तिमत्वात शक्ती, शील, सौंदर्य यांच्या समन्वयाचा परमोत्कर्ष साधला.

प्रचंड लोकप्रियता
तुलसीदासांना प्रचंड लोकप्रियता मिळाली याचे कारण त्यांनी जो नवा मार्ग सांगितला त्याला परंपरेची भक्कम बैठक दिली, हे होय. वेद, उपनिषदे, गीता, भारतीय दर्शने, वाल्मीकि रामायण यांच्या आधाराने त्यांनी आपले विचार लोकांच्या पुढे ठेवले. तुलसीदास समन्वयवादी होते पण त्यांच्या समन्वयवादाला विचारांची, दूरदृष्टीची बैठक होती. हजारीप्रसाद द्विवेदी म्हणतात, ‘तुलसीच्या काव्यांत लोक आणि शास्त्र यांचाच समन्वय आहे असे नाही, तर वैराग्य आणि गृहस्थधर्म, भक्ती आणि सगुण, पुराण आणि काव्य, भावावेग आणि अनासक्त चिंतन, ब्राह्मण आणि चांडाळ, पंडित आणि अपंडित यांतील समन्वय आहे’. तुलसीदासांचे काव्य सर्व मतांच्या लोकांना आपलेसे वाटते. तुलसीदासांनी आदर्श गृहस्थधर्माचे, आदर्श कुटुंबव्यवस्थेचे चित्र रेखाटले. माणसाची कुटुंबातील आणि समाजातील कर्तव्ये आणि मर्यादा यांचा आदर्श त्यांनी सांगितला. हे सर्व रामकथेच्या माध्यमातून सांगितल्यामुळे, हा ग्रंथ उत्तर भारताच्या सामाजिक जीवनात पुष्कळ वर्षांपर्यंत उच्च नीतिमूल्यांचे संस्कार घडविणारा एक संस्कृतिग्रंथ म्हणून आदरणीय ठरला.

तुलसीदासांचे काव्यसौंदर्य
कुशल रचना, कथेतील मार्मिक आणि रसात्मक सौंदर्यस्थळे वर्णन करण्याची हातोटी, प्रसंगानुकूल भाषेचे रूप राखण्याचे सामर्थ्य, छंद आणि अलंकारांचा औचित्यपूर्ण उपयोग, संवादांतील नाट्यात्मकता या सर्वच बाबतींत तुलसीदासांची प्रतिभा महाकवीची होती, असे मानावे लागेल. तुलसीदासांच्या शेकडो अनुभवगर्भ वआणि विदग्ध उक्ती नंतर लोकजीवनात, साहित्यात भाषेतील म्हणींप्रमाणे प्रचलित झाल्या. तुलसीदासांनी रामकथेला ज्या उंचीवर नेले, त्यापेक्षा अधिक उंचीवर कोणत्याही हिंदी कवीला जाता आले नाही. भक्तमालमध्ये नाभादासाने त्यांना ‘कलिकाल का वाल्मीकि’ म्हटले आहे. हजारीप्रसाद द्विवेदी म्हणतात ‘क्वचित प्रसंगी असा शुभयोग जुळून येतो, की जेव्हा माणसाचे ‘सर्वोत्तम’ प्रकट होण्यास अशा तऱ्हेने भाव आणि भाषा उपलब्ध होते. तुलसीदास असेच असाधारण शक्तिशाली कवी, लोकनायक आणि महात्मा होते’.

काशी आणि अयोध्या येथे तुलसीदासांनी सुमारे ३९ ग्रंथांची रचना केली. त्यात श्रीरामचरितमानस आणि विनय पत्रिका आजचा सुप्रसिद्ध पाठ हनुमान् चालीसा ही तुलसीदास यांची रचना आहे. श्रीरामचरितमानस लिखाणासाठी त्यांना प्रत्यक्ष भगवान श्रीराम यांनी आज्ञा केली होती, असे मानतात. त्यांनी संस्कृतमधील वाल्मिकी रामायणाचे अवधी भाषेत रुपांतर करून त्याचे नाव ‘रामचरितमानस’ असे ठेवले. हे लेखन त्यांनी निव्वळ सव्वीस दिवसात पूर्ण केले होते. या महान संतास ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *