जातीव्यवस्था, अनिष्ट प्रथांविरोधात
लढा उभारणारे महात्मा बसवेश्वर
आज जगात मानवकल्याण आणि लोकहित जोपासण्याच्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्या बाबी १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी प्रत्यक्ष आचरणात आणल्या होत्या. मध्ययुगीन कालखंडात आपल्याकडे निरर्थक रूढींनी उच्छाद मांडला होता. स्पृश्य-अस्पृश्यता यांसारख्या समाजाला मागे खेचणाऱ्या प्रथा बोकाळल्या होत्या. दुर्दैव असे, की हे सारे धर्माची झूल पांघरून सुरू होते. अशा काळात महात्मा बसवेश्वर यांचा उदय झाला आणि त्यांनी यातील अनेक प्रथा मोडून काढल्या. त्यांचे मूळ नाव बसव हे होते. लोक त्यांना आधी प्रेमाने बसवण्णा आणि नंतर आदराने बसवेश्वर म्हणू लागले. या थोर महात्म्याची आज जयंती.
मंगळवेढ्यात लिंगायत धर्माची स्थापना
विश्वगुरू महात्मा बसवेश्वर हे आपल्या देशात १२ व्या शतकात होऊन गेलेले समग्र क्रांतीचे महानायक. त्यांनी अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक जी क्रांती केली. कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ मध्ये प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात बसव यांचा जन्म झाला. काहींच्या मते तो इंगळेश्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी त्यांचा जन्म अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते. धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण अशा क्षेत्रांतील त्यांचे कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून संत बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी मौजीबंधन करून घ्यायचे नाकारले आणि घर सोडून ते कूडलसंगम (जि. विजापूर) येथे निघून गेले. कृष्णा आणि मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते. तेथे बसवेश्वरांनी १२ वर्षे वास्तव्य केले. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. पुढे महाराष्ट्रातील सोलापूर येथील मंगळवेढा येथे त्यांनी तब्बल ३१ वर्षे वास्तव्य केले होते. बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली, असे सांगितले जाते.
मानवी मूल्यांची रुजवण
बसव हे निस्सीम शिव उपासक होते. याच काळात त्यांनी जातवेदमुनी गुरू यांच्याकडून दीक्षा घेतली आणि शिवाचे प्रतीक म्हणून ‘इष्टलिंग’ गळ्यात धारण केले. गुरुंकडे राहून बसवेश्वरांनी वेद, उपनिषदे, षड्दर्शने, पुराणांचा सखोल अभ्यास केला. संस्कृत, पाली, तामीळ या भाषांवरही प्रभुत्व मिळविले. धर्मग्रंथांचे अध्ययन करून त्यावर चिंतन-मनन केले. ते धनुर्विद्या आणि अन्य कलांत पारंगत होते. बसवेश्वर हे गुरू आज्ञेनुसार ज्ञानप्रसार आणि धर्म प्रचारासाठी निघाले. या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. अनेक अनिष्ट चालीरिती बंद केल्या. बालविवाहाला कडाडून विरोध करून विधवा विवाहाला मान्यता दिली. बसवेश्वरांनी ‘शिवानुभवमंडप’ नावाच्या आध्यात्मिक विद्यापीठाची स्थापना केली. यातून त्यांनीनी विश्वशांती आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देत मानवतावादी कार्य केले. माणसासारखा माणूस असूनसुद्धा त्याचा विटाळ दुसऱ्यांना का होतो, असे अनेक प्रश्न ज्यांच्या मनात उभे राहिले, त्या बसवण्णांनी स्त्री-पुरूष समानता, रंजले-गांजलेल्या समाजाला जगण्याचा अधिकार मिळवून दिला.
लोकसंसदेची स्थापना
बसवेश्वर यांनी आपले तत्त्वज्ञान संस्कृत भाषेचा वापर न करता लोकांना सहज समजणाऱ्या कन्नड भाषेतून मांडले. निरक्षर, अन्यायाने त्रस्त, कोणताही अधिकार नसणाऱ्या पिचत पडलेल्या लोकांना सामावून घेण्याचे आणि त्यांना सर्वाधिकार देण्याची क्रांतिकारी किमया महात्मा बसवेश्वर यांनी केली. जात-पात, धर्मभेद, उच्च-नीच, लिंगभेद यांच्या त्यागकरून प्रथम समाजाला साक्षर करण्याचे कार्य अनुभव मंटप अर्थात प्रथम लोकसंसद स्थापन करून केले. त्या काळात कर्मठ आणि रुढीपरंपरावाद्यांच्या वर्चस्वाला झुगारू हे कार्य म्हणजे खूप मोठी क्रांती होती. अक्षरक्रांती झाल्याशिवाय साहित्य क्रांती होणार नाही, वा साहित्य क्रांती झाल्याशिवाय सामाजिक क्रांती होणार नाही हे महात्मा बसवेश्वर यांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी सुरुवातीला सर्वसामान्य व्यक्तींना अक्षरज्ञानी केले.
महिला साक्षरतेचा वसा
या समाजाचे ऐक्य म्हणजे येथील आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य होय, हे तत्त्व बसवण्णा जाणून होते. आध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी ‘अनुभव मंटप’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास कोणत्याही जात-धर्म आणि पंथातील स्त्री आणि पुरुषांना परवानगी होती. प्रत्येक माणसाला धार्मिक जीवन जगण्याची समान संधी मिळावी. त्या धार्मिक जीवनात जन्म, जात, व्यवसाय, स्त्री-पुरुष म्हणून भेदभाव केला जाऊ नये. अशी त्यांची शिकवण होती. ‘एक स्त्री शिकली, की पूर्ण कुटुंब साक्षर होते’ याची प्रचिती महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात दिली आहे. त्यांच्या अनुभव मंटपात ७० शरणी म्हणजे महिला होत्या. त्यांना साक्षर करण्याचे कार्य बसवेश्वरांनी केले. ज्यावेळी पुरूषांना साक्षर करणे अशक्य होते, तेव्हा बसवेश्वरांनी महिलांना साक्षर करत सनातनी विचारांना मोठा धक्का दिला. आध्यात्मिक लौकिकाबरोबर समता, बंधुता या मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी देशभरातील मोठा जनसमुदाय कल्याणस्थित अनुभव मंटपाकडे लोटला. यात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटकसह गुजरात, काश्मीर, कलिंग, अफगाणिस्तान आदी ठिकाणांहून लोक अनुभव मंटपात आले. तेथील शरणसमुदायांनी त्यांना कन्नड शिकवून वचनसाहित्य निर्माण केले.
राजदरबारी मानाचे स्थान
कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील खेड्यांतील लोकांच्या जिभेवर आजही बसवेश्वरांची वचने आरूढ आहेत. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन चालुक्य राजाच्या दरबारात बसवण्णांना मानाचे स्थान मिळाले. ते राज्याच्या मंत्रिपदी राहिले. पण सत्ता आणि वैभव असूनही बसवण्णा आध्यात्मिक नीतिमूल्यांपासून ढळले नाहीत. अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयता, बळी प्रथा, व्रतवैकल्य, उपास-तापास इत्यादींवर प्रखर हल्ला केला. त्यांच्या विचारांची समाजाला आजही गरज आहे. आज आपण कितीही प्रगती केली असली, तरी त्याची बीजे ही महात्मा बसवेश्वर यांच्यासारख्या विद्वान व्यक्तींच्या तत्त्वज्ञानावरच अवलंबून आहे. ११६७ मध्ये वयाच्या ६६ व्या वर्षी बसवेश्वर शिवचरणी एकरूप झाले. कुडलसंगम-कृष्णा आणि मलप्रभा नदीच्या संगमावर बसवेश्वरांचे समाधीस्थळ आहे, जे आजही प्रगतशील समाजाची शिकवण देते. या थोर महात्म्यास जयंतीनिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!🙏