दुष्काळात धान्याचे कोठार
लुटवणारे संत दामाजी पंत
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरजवळील मंगळवेढे ही संतांची भूमी. महात्मा बसवेश्वरांपासून ते टीकाचार्य, संत सजन कसाई, लतिफ महाराज, संत चोखामेळा कुटुंब, संत कान्होपात्रा, मौनीबुवा, वडरी महाराज, आदी संत नामावलीतील एक मोठे नाव म्हणजे संत दामाजी पंत.
बिदरच्या बादशहाच्या नोकरीत असलेल्या दामाजी पंतांनी दुष्काळात सरकारी धान्याचे गोदाम गोरगरिबांसाठी खुले करून दिले आणि आपल्या दातृत्त्वाने अजरामर झाले. या संत दामाजी पंतांची आज पुण्यतिथी.
बिदरच्या बादशहाच्या दरबारात नोकरी
शालिवाहन शके १३०० ते १३८२ हा संत दामाजी पंतांचा कालावधी आहे. बिदरचा बादशहा अहमदशहावल्ली याच्या दरबारात दामाजीपंत कारकून म्हणून नोकरीस लागले होते. ते उत्तम घोडेस्वार होते. दांडपट्टा चांगला खेळत. त्यांचे मोडी अक्षर छान वळणदार होते. कामात नेकी आणि नेटकेपणा होता. त्यामुळे वरिष्ठ त्यांच्या कामावर खूष असत. एकदा दफ्तरखान्यातील सर्व कारकून काम संपवून गेले तरी सायंकाळी दामाजीपंत काम करीत बसलेले बादशहाला दिसले. ‘उशिरापर्यंत का काम करत आहात? असे बादशहाने विचारल्यावर ‘रोजचे काम पूर्ण करूनच मी घरी जातो. कामालाच मी ईश्वर मानतो.’ दामाजी पंतांचे हे उत्तर ऐकून आणि काम पाहून बादशहाने त्यांची नायब तहसिलदार म्हणून नियुक्ती केली. वयाच्या ४० व्या वर्षी दामाजी पंतांना पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्याचा योग आला आणि तेथील दिव्य सोहळा पाहून ते वारकरी बनले. ज्ञानेश्वरीचे नित्य वाचन करू लागले.
दुष्काळात कोठारे केली खुली
शके १३७६ ते १३७८ या काळात मंगळवेढा परिसरात भीषण दुष्काळ पडला. त्यावेळी दामाजी पंत मंगळवेढे येथे तहसीलदार होते. सरकारी धान्याची दोन कोठारे त्यांनी बांधली होती. भुकेने व्याकूळ होऊन मरणपंथाला लागलेले लोक पाहून दामाजी पंतांचे हृदय कळवळले. त्यांनी बादशहाच्या अवकृपेची भीती न बाळगता सरकारी कोठारातील धान्य भुकेकंगाल गोरगरिबांना मोफत वाटून टाकले. ही बातमी बादशहाला समजताच त्याने दामाजी पंतांना अटक करण्यासाठी सैन्य पाठवले. यापुढे कथा अशी सांगितली जाते, की त्या दरम्यान पांडुरंगाने दामाजी पंतांच्या विठू महार या नोकराचे रूप घेतले आणि बादशहाच्या दरबारात दाखल झाला. दामाजी पंतांनी धान्य योग्य मोबदला घेऊन विकले असून या सव्वा लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या मोहरा पाठविल्या आहेत, असे सांगितले. दरबाराकडून त्याची पावती घेतली आणि ती दामाजी पंतांच्या गीतेच्या पोथीत ठेवली. बादशहालाही ही गोष्ट समजली आणि त्याने दामाजी पंतांचा सत्कार केला.
विठू महार ऐतिहासिक व्यक्ती?
वारकरी अशीही कथा सांगतात, की बादशहाने दामाजी पंतांकडे देवाचे ते विठू महाराचे रुप पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त केली. दामाजी पंतांसाठी देवाने बादशहाला दर्शन दिले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा जो भव्य लाकडी मंडप आहे, त्या ठिकाणी गरुड मंदिरामागे एक कट्टा होता. तेथे बादशहाला भगवंताने दर्शन दिले असे सांगतात. विठू महाराची कथा ही चमत्काराची कथा मानली जात असली तरी, काही इतिहासकारांनी विठू महार नावाची ऐतिहासिक व्यक्ती होती असे दाखवून दिले आहे. हा विठूच पंढरीनाथासारखा धावून आला, असे सांगितले जाते. हे काहीही असले तरी दामाजी पंतांची दानशूरपणाची कृती मात्र कालातीत आहे. जिने त्यांना संत मांदियाळीत सन्मानाचे स्थान मिळवून दिले.
राजाराम महाराजांनी केली मूर्तीची स्थापना
शके १३८२ मध्ये दामाजी पंतांनी देह ठेवला. मंगळवेढा येथे त्यांची समाधी उभारली गेली. शिवाजी महाराजांचे धाकटे सुपुत्र राजाराम यांनी तेथे घुमटवजा छोटे मंदिर बांधले. त्यात विठ्ठल, रुखमाई आणि दामाजी पंतांची मूर्ती स्थापन केली. १९४४ मध्ये दामाजी पंतांच्या नावाने मंगळवेढ्यात एक संस्था स्थापन करण्यात आली. संस्थेतर्फे मोठे समाधी मंदिर बांधण्यात आले. या ठिकाणी देवस्थानतर्फे भाविकांच्या राहण्यासाठी भक्तनिवासाची सुविधा करण्यात आली आहे. येथे अन्नछत्रही चालविले जाते. या मंदिरामध्ये नित्य धार्मिक कार्यक्रम होत असतात. यामध्ये रोज सकाळी नित्यपूजा, सायंकाळी धुपारती, दामाजी आख्यानाचे वाचन, दर गुरुवारी भजन, एकादशीला गीता पारायण, हरिजागर वगैरे कार्यक्रम होतात. मंदिरामध्ये अखंड नंदादीप आणि वीणा चालू आहे. याशिवाय गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, रामनवमी, हनुमान जयंती, ज्ञानेश्वरी जयंती निमित्त ज्ञानेश्वरी पारायण, कार्तिक स्नान अर्थात काकड आरती, गीता जयंती, तुकाराम बीज, एकनाथ षष्ठी, अधिक महिना इत्यादी कार्यक्रम साजरे होतात. फाल्गुन प्रतिपदा हा दिवस दामाजीपंतांनी धान्य कोठार लुटविले तो दिवस. या दिवशी दामाजीपंतांची मिरवणूक काढली जाते. तर वैशाख महिन्यांमध्ये शुद्ध त्रयोदशी ते वद्य प्रतिपदा पुण्यतिथी उत्सव साजरा होतो. पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी पुण्यतिथीचे कीर्तन होऊन गुलाल टाकला जातो. यानंतर अन्नप्रसाद भंडारा होतो. याशिवाय आषाढी आणि कार्तिकी महिन्यांमध्ये दामाजीपंतांची पालखी पंढरपूरला जाते. अशा या मानवता जपणाऱ्या थोर संताला पुण्यतिथी निमित्ताने ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!