वर्धा नदीत भरणारी
अनोखी दहीहंडी यात्रा
विदर्भाला साधू-संतांचाचा मोठा वारसा आहे. येथील अनेक गावे संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहेत. त्यामुळे विविध गावांत तिथी आणि प्रसंगांनुसार धार्मिक उत्सव आयोजित केले जातात. याच श्रृंखलेत वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमारेषेवरून वाहणाऱ्या हिंगणघाट तालुक्यातील कापशी येथील नानाजी महाराजांची दहीहंडी यात्रा प्रसिद्घ आहे. नानाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त या यात्रेचे आयोजन होते.
दरवर्षी माघ शुद्ध सप्तमी अर्थात रथसप्तमीच्या दिवशी येथे भव्य दहीहंडी यात्रा भरते. तिला साधारणपणे सात हजारांवर भाविक आवर्जून येतात.
वर्ध्यापासून कापशी गाव ३४ किलोमीटरवर आहे. संत श्री नानाजी महाराज यांनी या गावात बरीच वर्षे वास्तव्य केले. नानाजी महाराज यांनी बरीच वर्षे पंढरपूरची वारी केल्याची नोंद आहे. पुढे नानाजी महाराज यांनी वर्धा नदीच्या तीरावर १८९०मध्ये लोकसहभागातून लक्ष्मी-नारायणाचे भव्य मंदिर उभारले. या मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीचीदेखील मूर्ती आहेत.
याशिवाय मंदिरात नानाजी महाराज आणि त्यांच्या पत्नीची समाधी तसेच मूर्ती आहेत. रथसप्तमीच्या मध्यरात्री बारा वाजता, वर्धा नदीपात्रातील एक विशिष्ट खडकावर २२ भजनी मंडळे दहीहंडी फोडतात. अशा पद्धतीने होणारी ही एकमेव यात्रा असावी, असे स्थानिक नागरिक सांगतात. ही अनोखी यात्रा साधारणपणे १० दिवस चालते.
याशिवाय आषाढी-कार्तिकी एकादशीनिमित्त आणि वर्षभर येथे पुरणपोळी आणि इतर पदार्थांचे भाविकांना भोजन दिले जाते. यात्रेनिमित्त येथे अन्नछत्राचे आयोजन केले जाते.
नदीकाठचा मंदिर परिसर शांत आणि अत्यंत सुंदर आहे. लक्ष्मी-नारायण मंदिरातील मूर्तीचे शिल्प काळ्या दगडात कोरण्यात आलेले आहे. नानाजी महाराज यांची समाधी त्यांनीच बांधलेल्या लक्ष्मीनारायणाच्या देवळासमोरच आहे.
दरवर्षी अत्यंत उत्साहाने भरणारी ही नदीतील दहीहंडी यात्रा मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे प्रातिनिधिक स्वरुपात आयोजित केली जात आहे. मंदिरात नियमित पूजा-विधी केले जातात. महाप्रसाददेखील आयोजित केला जातो. यंदाही मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत हा उत्सव होत आहे.