नेवासा येथे ज्ञानेश्वर मंदिरात
उद्या प्रकाशनाचा कार्यक्रम
नेवासा : अहमदनगर येथील वाङ्गयोपासक मंडळाने संपादित केलेला आणि १९३४ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ या ग्रंथाचा पुनर्प्रकाशन सोहळा उद्या (शनिवार दि. १३ ऑगस्ट २०२२) येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात होणार आहे. दुपारी दोन ते चार या वेळेत हा कार्यक्रम होईल. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने हा दोन खंडांचा ग्रंथ पुनर्मुद्रित केला आहे.
या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षपद साहित्य आणि संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे भूषवणार आहेत. श्रीक्षेत्र देवगड येथील श्री दत्तपीठ संस्थेचे मठाधिपती महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज आणि श्रीक्षेत्र सरला बेट येथील योगिराज सदगुरु गंगागिरीजी महाराज संस्थानचे मठाधिपती महंत स्वामी गुरूवर्य रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होईल.
यावेळी नेवासा येथील ह. भ. प. शिवाजी महाराज देशमुख, नेवासा येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, आळंदी येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त अभय टिळक, अॅड. विकास ढगे पाटील, श्रीज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र घुले पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, माजी मंत्री शंकररावजी गडाख पाटील, साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ ग्रंथाचे संपादक डॉ. शिरीष लांडगे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्रीक्षेत्र नेवासा आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई या दोन्ही संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ ग्रंथाविषयी
अहमदनगरच्या वाङ्मयोपासक मंडळाने १९३४ मध्ये ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ हा दोन खंडातील बृहद ग्रंथ प्रकाशित केला. भाविक, आस्वादक आणि चिकित्सकांनी एकत्र येऊन ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ची निर्मिती केली. तत्कालीन अनेक व्यासंगी लेखकांनी या ग्रंथात लेख लिहिले आहेत. असा सामूहिक प्रयत्न ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’च्या निर्मितीपूर्वी आणि नंतरही झालेला नाही.
संत ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयाचा अनेक प्रकारे आणि पद्धतीने अभ्यास होऊ शकतो, हे ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ने सर्वप्रथम दाखवून दिले. या ग्रंथाने ‘ज्ञानेश्वरी’ विषयक अभ्यास परंपरेत स्वतःची स्वतंत्र मुद्रा उमटवली. अर्वाचीन काळामध्ये ज्ञानदेवांविषयक अभ्यासाचा पाया रचला. त्यामुळे अनेक विद्वानांनी या ग्रंथाची प्रशंसा केली.
साहित्य आणि संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी या ग्रंथात आपल्या मनोगतात म्हटले आहे, ”अहमदनगर येथील वाङ्मयोपासक मंडळाने स्वातंत्र्याच्या अगोदर आणि नंतरच्या काही वर्षांमध्ये मराठी साहित्य, संस्कृती आणि इतिहास अभ्यासाच्या अनुरोधाने भरीव काम केले. या मंडळामध्ये अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी मंडळी होती, भाविक होते; तसेच न्यायमूर्ती, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक अशा वेगवेगळ्या व्यवसायांतील तज्ज्ञ मंडळी होती. या सर्वांनी अत्यंत निष्ठेने ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, साहित्य संमेलने घेतली.
त्यांच्या कार्यात सातत्य होते. मंडळाने केलेल्या कार्यातील एक संस्मरणीय कार्य म्हणजे ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ हा ग्रंथ होय. या ग्रंथाने संत ज्ञानेश्वरांच्या जीवन, कार्य, वाङ्मयाचे चौफेर म्हणावे असे अपूर्व दर्शन सर्वप्रथम घडविले. सामूहिक प्रयत्नातून हा १८०० पानांचा ग्रंथराज निर्माण झाला. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून हा ग्रंथ दुर्मिळ झाला होता. हा ग्रंथ पुनर्प्रकाशित व्हावा, अशी सातत्याने मागणी होत होती. ही मागणी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पूर्ण करीत आहे ही आनंदाची घटना आहे.”
ग्रंथाची किंमत –
१) श्रीज्ञानेश्वरदर्शन – भाग – १
पृष्ठे : 832, किंमत : रु. 288/-
२) श्रीज्ञानेश्वरदर्शन – भाग – २
पृष्ठे : 964, किंमत : रु. 335/-
ग्रंथ खालील ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत –
१) संवाद ग्रंथ वितरण – श्री. शशीकांत पवार – 8879039143
२) तुला ग्रंथ वितरण – श्री. वाल्मिक वाघमारे – 9637904001
३ ) वॉल्डन बुक स्टोअर्स – श्री.अभिषेक धनगर – 9766975165
१) शासकीय ग्रंथागार,
शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय,
नेताजी सुभाष मार्ग, चर्नीरोड, मुंबई – 04.
फोन नं – 022- 23699778 / 022 – 23630695/ 022- 23632693 /श्री.मांजरेकर – 8928533413
२) शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथगार,
फोटोझिंको मुद्रणालय, जी.पी.ओ. नजीक,
पुणे – 411 001.
फोन नं – 020- 26125808/26124759/श्री. आमरे – 9021779073
३) शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार,
सिव्हिल लाईन्स, नागपूर- 440 001.
फोन नं. – 0712-2562615/श्री. निरंजन नाईक- 9423409338
४) शासकीय लेखनसामग्री भांडार व ग्रंथगार,
रेल्वे स्टेशन, पैठण रोड,
औरंगाबाद – 431 001
संपर्क: श्री. नारायण चव्हाण – 8850944403 /श्री. संदीप काळे – 9049479314
५) शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार,
ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416 003.
फोन नं. – 0231-2650395/2650402 /श्री. महेश सोनावणे – 9225805856