‘रांजण पूजन’ विधीने महोत्सव सुरू
पैठण : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पैठण येथील शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांचा नाथषष्ठी यात्रा महोत्सव आजपासून (दि. २० मार्च) सुरू झाला आहे. उत्सवाची सुरुवात ‘रांजण पूजा’ या विधीने झाली. सौ. उल्का रघुनाथभाऊ गोसावी यांच्या हस्ते मानाची पहिली घागर रांजणात ओतण्यात आली.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर हा महोत्सव होत असल्याने तमाम वारकरी आणि भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. लाखो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीने नाथनगरी भगव्या पताका, टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमून गेली आहे.
नाथषष्ठी उत्सवाची सुरुवात आज (दि. २० मार्च) ‘रांजण पूजा’ या विधीने झाली. भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या रुपात ज्या रांजणात पाणी भरले, त्या रांजणाची श्रीक्षेत्र नाथ मंदिर येथे दुपारी १ वाजता पूजा झाली.
पंचमीला म्हणजे मंगळवारी (दि. २२ मार्च) अक्षत कार्यक्रम असेल. या दिवशी श्री विजयी पांडुरंगास अक्षत देऊन इतर मानकऱ्यांना श्री एकनाथ षष्ठीचे निमंत्रण दिले जाईल. त्यानंतर श्री नाथ मंदिर येथून सायंकाळी ७ वाजता प्रस्थान होईल.
यानंतरचे उत्सवातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
दि. २३ मार्च (श्री एकनाथ षष्ठी रोजी) –
१. पहाटे ३ वाजता : श्री विजयी पांडुरंगास अभिषेक
२. सकाळी ८ वाजता : श्री योगीराज महाराज गोसावी यांच्या निवासस्थानी वारकरी पूजन
३. सकाळी ९ वाजेपासून संत श्री एकनाथ महाराज यांच्या चरित्राचे चित्रप्रदर्शन
४. दुपारी १ वाजता : समस्त पारंपरिक मानकऱ्यांसह गावातील नाथमंदिर येथून सर्व कुलोत्पन्न नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी (निर्याण दिंडी) समाधी मंदिराकडे प्रस्थान ठेवतील. तेथे वारकरी आणि नारदीय कीर्तन सेवा होईल.
५. सायंकाळी समाराधना आणि महाप्रसाद
६. सायंकाळी ७ वाजता संत श्री एकनाथ महाराज यांचे मराठी, संस्कृत आणि इंग्रजी माध्यमातील चरित्र ग्रंथाचे आणि पैठणकर फडाच्या भजनी मालिकेचा प्रकाशन सोहळा
७. रात्री ८ ते १० हरिकीर्तन
दि. २४ मार्च : छबिना आणि गुरुपूजन
१. सकाळी १० वाजता : संत श्री एकनाथ महाराज यांच्या नावे विविध ६ पुरस्कारांचे वितरण. स्थळ : संत श्री नरहरी सोनार महाराज धर्मशाळा, नाथ गल्ली
२. दुपारी १ वाजता : गुरुपूजन आणि अनुग्रह
३. सायंकाळी ४ वाजता : हरिपाठ
४. रात्री ७ ते ९ : हरिकीर्तन
५. रात्री १ वाजता : गावातील नाथमंदिर येथील छबिना श्री एकनाथ संस्थानाधिपती भैय्यासाहेब महाराज पैठणकर यांच्या वाङ्मयातील श्री एकनाथ महाराज यांच्या पादुकांची मिरवणूक. नगर प्रदक्षिणा करून गावातील नाथ मंदिरात दि. २५ मार्च रोजी आरतीने छबिन्याची समाप्ती.
दि. २५ मार्च (अष्टमी) : काला दहीहंडी
सायंकाळी ४:३० – गावातील श्री नाथ मंदिर येथून काला दिंडी प्रस्थान. परंपरेनुसार सूर्यास्तावेळी समाधी मंदिराच्या प्रांगणात दहीहंडी. त्यानंतर अभंग आणि आरतीने उत्सवाची समाधी.
हे सर्व कार्यक्रम हे कुलोत्पन्न नाथवंशजांच्या अधिपत्याखाली होणार आहेत.
नाथषष्ठी यात्रेचे महत्त्व :
पैठण येथील संत एकनाथ महाराजांची पुण्यतिथी फाल्गुन वद्य षष्ठी ही आहे. या निमित्त दरवर्षी मोठा उत्सव साजरा केला जातो. तर अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सवाची समाप्ती होते. महोत्सवात राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक दिंडीने यात सहभागी होतात.
नाथषष्ठी यात्रा महोत्सवात नाथवंशांच्या प्रमुख उपस्थितीत दिंड्या नाथ मंदिरातून गोदावरी नदीमार्गे समाधी मंदिरापर्यंत भजन करत जातात. मध्यरात्री नाथांच्या पादुकांची छबिना पालखी काढण्यात येते. शेवटच्या दिवशी सायंकाळी नाथवंशजांच्या हस्ते काला दहिहंडी फोडून नाथषष्ठी यात्रा महोत्सवाची सांगता केली जाते.
यात्रेच्या निमित्ताने विविध भागांतील वारकरी पायी दिंडीने नाथनगरीत दाखल होऊन भजन, कीर्तन, प्रवचन, गवळण आदी धार्मिक कार्यक्रमात लीन होतात. तसेच यात्रेत कुंकू, बुक्का, धार्मिक पुस्तके, प्रसाद खेळणी, मृदुंग, वाद्य दुकानदार यांचेही दुकाने थाटले जातात. कोरोनाचे निर्बंध हटल्याने यंदा व्यावयायिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
महोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पिण्याचे पाणी, गोदावरी नदी वाळवंट साफसफाई, शहरातील स्वच्छता आणि इतर सुविधा देण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत.