श्री संत अप्पा महाराजांनी
जळगावला बनविले पंढरपूर
खान्देशातील जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान. या संस्थानास वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभली आहे. या परंपरेतील थोर संत तथा श्रीराम रथोत्सव, श्री संत मुक्ताबाई पालखीचे संस्थापक जलग्राम संत श्री सद्गुरू अप्पा महाराज यांची आज ११२वी पुण्यतिथी. प्रभू श्रीरामाचे परमभक्त अशी अप्पा महाराज यांची ख्याती आहे.
त्यांनी सुरू केलेले विविध धार्मिक उत्सव आजही संस्थानतर्फे अखंड सुरू आहेत. संत श्री तुकाराम महाराज यांनी घालून दिलेल्या तुका म्हणे नाही जातिसवे काम।
ज्याचे मुखी नाम तोचि धन्य।। या आदर्शावर हे उत्सव आजही आयोजित केले जातात.
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले
संत श्री सद्गुरू अप्पा महाराज यांचा जन्म माघ वद्य त्रयोदशी १८४५ रोजी वेद शास्त्र संपन्न नारायणशास्त्री जोशी यांच्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच अप्पाजी धार्मिक होते. प्रभू श्रीरामावर त्यांची असीम भक्ती होती. पुढे खेळण्या-बागडण्याच्या वयात आणि विद्यार्जनावेळी ते मित्रांसमवेत कीर्तन-प्रवचने आयोजित करायचे. असं म्हणतात, की संतांनी पंढरीच्या वाळवंटी मांडलेला हा खेळ अप्पाजींनी जुन्या जळगावात प्रभू रामाच्या प्रांगणात मांडला.
…अन् राम मंदिराचा जीर्णोद्धार
सद्गुरू अप्पा महाराज यांचा जनसंपर्क अफाट होता. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांना जळगावकरांत मानाचे स्थान होते. १८६७ च्या श्रीराम नवमीला सर्व रामभक्तांना एकत्र बोलावून त्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विचार बोलून दाखवला. सर्वांनी तो उचलून धरला आणि सर्वांच्या सहकार्याने १८७२ पर्यंत अप्पाजींच्या मार्गदर्शनात आजचे भव्य राममंदिर उभारले गेले. तेव्हापासून नित्य भजन-कीर्तन, लोकजागर, समाजप्रबोधनाचा ज्ञानयज्ञ सुरू झाला. यात प्रख्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यादेखील होत्या. त्या म्हणातात,
“किती भजन-कीर्तन
रामनामाचा लहेर
केलं रामाचं मंदिर
संत लोकांचं माहेर
राम लक्ष्मण सीता
बसवले रे मंदिरी
त्याले सोन्याचा कयस
जागा संगमरवरी…”
आणि या माध्यमातून अप्पा महाराजांची सामाजिक-धार्मिक-आध्यात्मिक कार्याची सुरुवात झाली. पुढे मंदिरात नित्य साधू-संत येऊ लागले.
संत मुक्ताईंचा दृष्टांत
असं म्हणतात, की शके १७९१, वैशाख वद्य दशमीस (सन १८७२) अप्पा महाराज यांना संत मुक्ताबाई यांचा दृष्टांत झाला. या दृष्टांताद्वारे संत मुक्ताबाईने अप्पा महाराजांना सांगितले की, ‘वटवृक्षाखाली माझे वास्तव्य असल्याने तेथे माझे मंदिर उभारावे. संत ज्ञानेश्वर, संत सोपान पालखीस्वरुपात जसे दिंडी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात तशी माझीही पालखी जावी…’ या दृष्टांतानंतर अप्पा महाराजांनी मुक्ताईचे मंदिर उभारले.
हे मंदिर मेहरुण तलावाच्या डाव्या बाजूस शिवाजी उद्यानाजवळ आहे. ते पूर्वाभिमुख आहे. श्री संत मुक्ताईंच्या प्रासादिक पादुका घेऊन मुक्ताई राम पालखी श्री क्षेत्र पंढरवूर पायी वारी अप्पा महाराजांनी सुरू केली. ती आजपर्यंत १४० वर्षांनंतरही सुरू आहे. पंढरपुरातील एका मानाची पालखी म्हणून जळगावच्या या पालखीचा गौरव होत असतो. पुढे सद्गुरू नरसिंह महाराज सरस्वती स्वामी महाराज यांचा अनुग्रह घेतल्यानंतर अप्पा महाराज यांच्या धार्मिक कार्याला अधिक बहर आला. वाघोड येथील संत कुंवर स्वामी महाराज यांनाही ते गुरूस्थानी मानत.
श्रीराम रथोत्सवाची महती
संत श्री सद्गुरूअप्पा महाराजांनी हिंदू धर्मातील अठरा पगड जाती जमातींना एकत्र करून कार्तिक प्रबोधिनी एकादशी निमित्त भव्य दिव्य श्रीराम रथोत्सवास सन १८७२ मध्ये प्रारंभ केला. कार्तिकी शुद्ध प्रतिपदेपासून श्रीराम वहनोत्सव होत असतो. जलग्राम प्रदक्षिणा घालताना गावात ठिकठिकाणी भजन- भारूड, पानसुपारीचा कार्यक्रम होतो. वहनावर विविध प्राणिमात्रांसह देवी-देवतांच्या मूर्ती असतात. भारतीय संस्कृती मानवाबरोबरच प्राणिमात्रांचेही ऋण मानते. त्याचेच प्रतीक म्हणजे हा वहनोत्सव मानला जातो. हा उत्सव सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणूनही ओळखला जातो.
‘अप्पा महाराज आज गेले देवाघरी…’
आयुष्यभर प्रभू रामचंद्र, विठ्ठलाची सेवा करत असंख्य लोकांना भक्तीमार्गात आणणारे संत अप्पा महाराज यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी अवतार समाप्तीचा निर्णय घेतला. फाल्गून शुद्ध तृतीया १९१० रोजी महाराजांनी देह सोडला आणि ते वैकुंठाला गेले.
“नाम जपता जपता
जे जे रामकृष्ण हरी
अप्पा महाराज आज गेले देवाघरी
उभ्या गावाचे कैवारी
खरे रामाचे पुजारी
अप्पा महाराज गेले सोडिसनी देवाघरी…”
अशा शब्दांत बहिणाबाई यांनी अप्पा महाराज यांच्याबद्दल श्रद्धांजलीपर शोककाव्य रचले.
वारसा चौथ्या पिढीपर्यंत
अप्पा महाराजांची परंपरा दुसरे गादीपती वै. ह. भ. प. सद्गुरू वासुदेव महाराज १९१० ते १९३७ असा त्यांचा कार्यकाळ. त्यांनीही अप्पा महाराजांच्या परंपरा सुरू ठेवल्या. त्याच्या काळात संस्थानच्या लौकीकात भरच पडली. यानंतर तिसरे गादीपती वै. ह. भ. प. सद्गुरू केशव महाराज यांचा कार्यकाळ १९३७ ते १९७५, चौथे गादीपती वै. ह .भ. प. सद्गुरू बाळकृष्ण महाराज यांचा कार्यकाळ १९७५ ते २००२ असा होता, तर पाचवे विद्यमान गादीपती म्हणून ह. भ. प. मंगेश महाराज हे २००२ पासून परंपरा सांभाळत आहेत. अप्पा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंदिर संस्थानने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात अप्पा महाराज समाधीस विद्यमान गादीपती ह. भ. प. श्री मंगेश महाराज यांच्या हस्ते अभिषेक, आरती, रात्री वेदमूर्ती ह. भ. प. श्री श्रीराम महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे. कळीकळच्या तडाख्यातून सुटण्याचा मार्ग दाखवणारे संत श्री सद्गुरू अप्पा महाराज हे देहाने आपल्यात नाहीत. पण, त्यांचे विचार-कार्य आशीर्वाद रुपाने आपल्या सोबतच आहेत. त्यांच्या कार्यास आणि भक्तीमार्गास ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!
(ही माहिती आणि छायाचित्रे उपलब्ध करण्यास श्रीराम मंदिर जळगावचे पाचवे विद्यमान गादीपती ह. भ. प. मंगेश महाराज यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.)
लवकरच आपल्या सेवेत येत आहे – www.dnyanbatukaram.com