पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर : आपल्या देशाला तसेच जगाला संतांनीच त्यांच्या विश्वात्मक विचारांनी वाचवले आहे. त्यामुळे संत साहित्य वाचाल, तरच आयुष्यात पुढे जाल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज कोल्हापुरात केले.
पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोल्हापुरात आज (दि. ५) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष ह. भ. प. न्यायमूर्ती डॉ. मदन महाराज गोसावी, तर स्वागताध्यक्ष संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, ज्येष्ठ कवयित्री प्रा. डॉ. अरुणा ढेरे, लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे उपस्थित होते.
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यपाल आपल्या भाषणात पुढे म्हणाले, देशातील युवक देशभक्त, ईश्वरभक्त तसेच देवावर विश्वास ठेवणारे आहेत. त्यामुळे आयुष्यात जर आपल्याला पुढे जायचं असेल तर संत साहित्य वाचा. त्याची आपल्याला अत्यंत गरज आहे. त्यातूनच आपण आयुष्यात पुढे जाल.
तुकाराम महाराजांची पगडी घालून सत्कार
राज्यपालांनी दीप प्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन केले. त्यानंतर संमेलनाचे डॉ. मदन महाराज गोसावी, आणि स्वागताध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी राज्यपालांचा संत तुकाराम महाराजांची पगडी घालून तसेच श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार केला.कोल्हापुरातील कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये आज आणि उद्या (दि. ५, ६ एप्रिल २०२२) रोजी हे संमेलन होत आहे.
उद्घाटन सोहळ्यापूर्वी सकाळी ६ वाजता करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे पूजन ह. भ. प. रंगनाथ महाराज नाईकडे आणि आनंदराव गायकवाड यांच्या हस्ते झाले. सकाळी ८ वाजता निघालेल्या ग्रंथदिंडीचा प्रारंभ महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते झाला. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांच्या उपस्थितीत ग्रंथ दालनाचे उद्घाटन झाले.
चित्र प्रदर्शन उद्घाटन
सकाळी ११ वाजता संमेलनातील चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय चित्रकार सुहास बहुलकर आणि जे. जे. आर्ट स्कूलचे संचालक प्रा. डॉ. राजीव मिश्रा यांच्या हस्ते झाले.
याशिवाय दिवसभर ग्रंथ स्मरणिकेचे विमोचन, संत शिरोमणी पुरस्कार वितरण, विश्वात्मक संत जीवन गौरव पुरस्कार, विदेशी अभ्यासक शोधनिबंध वाचन, भक्ती संप्रदाय आणि विश्वात्मकता परिसंवाद, ‘भक्ती वसा की व्यवसाय?’ महाचर्चा आणि भक्ती संगीत महोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.