श्रमात देव शोधणारे
संत रविदास महाराज
‘योगी बनून समाजापासून विन्मुख होण्यापेक्षा भक्त बनून समाजात मिसळून जावे’, अशी भूमिका मांडत श्रमात देव शोधणारे संत रोहिदास महाराज यांची आज जयंती. त्यांचे आणि पंढरीच्या पांडुरंगाचे नाते उलगडताना संत तुकाराम महाराज म्हणतात,
चर्म रंगू लागे रोहिदासासंगे।
कबीराच्या मागे शेले विणी।।
‘माणसाचे मन पवित्र असेल, त्याला जातीयवादाचा स्पर्श झाला नसेल, तर जोडे सांधणाऱ्या कारागिराजवळच्या कुंडातही गंगाजलाचे पावित्र्य दिसून येईल. जातीने चांभार असलेला देखील एक माणूसच आहे, त्याला हिन ठरवू नका, तशी दृष्टी जोपासायला पाहिजे’, या विचारधारेतून संत रविदासांच्या विचारांची व्यापकता कळून येते. संत रविदासांच्या विचारांनी प्रेरीत होवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘द अनटचेबल’ हा ग्रंथ संत रविदासांच्या चरणी अर्पण केला आहे. संत रोहिदास यांचे जन्मस्थान काशी जवळील मांडूर. रोहिदास महाराज यांची १९ फेब्रुवारी ही जयंती, तर तिथीनुसार माघ पौर्णिमा! संत रोहिदास महाराज हे १४-१५ व्या शतकात होऊन गेले. त्या काळात जन्मतारखांची नोंद ठेवली जात नव्हती. काहींच्या मते, त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १३९८ रोजी झाला, तर काहींच्या मते माघ पौर्णिमेला १३७६ साली झाला. मात्र माघ पोर्णिमा ही सर्वमान्य जयंतीची तारीख निश्चित झालेली आहे.
संत रविदासांच्या वडिलांचे नाव संतोरवदास आणि आईचे नाव कळसादेवी असे होते. बालपणापासूनच संत रविदासांना भजन, कीर्तन आणि अध्यात्माची आवड होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जातींवर आधारलेली विषमतावादी समाजव्यवस्था बदलण्यासाठी खर्ची घातले. तळागाळातील शेवटचा घटक सुखी व्हावा, एकमेकांप्रति आदर निर्माण व्हावा, जातीय आणि सामाजिक सलोखा निर्माण व्हावी, अशी त्यांची विचारधारा होती. स्वामी रामानंद हे त्यांचे गुरू. सेना महाराज, कबीर हे त्यांचे गुरूबंधू. उत्तर भारत, दक्षिणेत त्यांची स्मृतीस्थाने आहेत. रविदास, रैदास असाही त्यांचा उल्लेख होतो. त्यांची सुमारे शंभर पदे उपलब्ध आहेत. शिखांच्या ‘गुरू ग्रंथसाहिब’मध्ये संत रोहिदासांची ४० पदे आहेत. त्यांचा योगाभ्यास चांगला होता. बंगलीमध्ये रुईदास, रूयदास, राजस्थानीमध्ये रोहिदास, मराठीत रविदास, रोहिदास, रोहितदास तर पंजाबीमध्ये रैदास किंवा रेयीदास आणि हिंदी रविदास आणि रैदास अशी विविध नावे त्यांची प्रचलित आहेत. महाराष्ट्रात त्यांना संत ‘रोहिदास’ असेच म्हणतात.
संत रोहिदास यांच्या पत्नीचे नाव लोना. उत्तरप्रदेशातील चर्मकार समाज त्यांना देवी मानून पुजतो. सर्व धर्माचे अनुयायी लाभलेले संत रोहिदास स्वतःबद्दल म्हणतात, ‘ऐसी मेरी जाती विख्यात चमार, हृदय राम गोविंद गुन सागर’. ‘मन चंगा तो कठौती मे गंगा’ ही हिंदी म्हणही त्यांची वाणी आहे. संत रोहिदास यांच्याविषयी संत कबीर म्हणतात, ‘संतनमे रविदास संत है, सुपच ऋषी सो मानिया हिंदू तुस्क दीन बने है, कछु नही पहिचानिया’. अशा संत रोहिदास यांनी अंतकाळी पद्मासन घालून ॐ काराचे उच्चारण करत त्यांनी देह त्याग केला. अशा या थोर संताला त्यांच्या जयंतीनिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!!🙏
लवकर आपल्या सेवेत येत आहे – www.dnyanbatukaram.com