आगरी, कोळी समाजाला दाखविला

सावळाराम म्हात्रे बाबांनी सन्मार्ग

‘विद्यानगरी’ डोंबिवलीची तुलना पुणे शहराशी केली जाते. इथं नामांकित लेखक, कवी, साहित्यिक, विद्वानांचे वास्तव्य आहे. या विद्यासंपन्न आणि सुज्ञ शहरात विखुरलेला मूळचा आगरी समाज एकेकाळी (५०-६० वर्षांपूर्वी) व्यसनं, अज्ञान, अंधश्रद्धा, अविकसित आणि पर्यायाने आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर होता. याच समाजाचा जणू उद्धार करण्यासाठी १३ जुलै १९२७ रोजी संत श्री सावळाराम बाबा महाराज म्हात्रे यांचा कोपरगाव-डोंबिवली इथं एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला.

शिक्षणाची आवड असली, तरी घरची आर्थिक स्थिती जेमतेमच. त्यामुळे कल्याणजवळच असलेल्या पिसवली गावातल्या नातेवाईकांकडे राहून गुरं चारण्याची कामं करू लागले. ते करतच त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. पुढं तरुण वयात काही काळ नोकरी केली. काही काळानंतर नोकरी सोडून दुग्ध व्यवसाय केला. योग्य वयात विवाह झाला. २ मुले, २ मुली असा कुटुंबविस्तार झाला. पण, महाराजांचे मन काही केल्या संसारात रमेना. त्यांना ओढ होती, ती अडचणीत सापडलेल्या आपल्या समाज बांधवांची. आपला समाज व्यसनमुक्त झाला पाहिजे, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि अंधश्रद्धाविरहित असावा, असं मनोमन वाटतं.

याच दरम्यान सावळाराम महाराज यांची भेट तळोजे-पनवेल येथील ब्रह्मलिन श्री सद्गुरू वामनबाबा महाराज यांच्याशी झाली. आपल्या मठात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वामनबाबा हे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या कार्याची, ईश्वर साधनेची माहिती द्यायचे. निर्व्यसनी होण्यासाठी लोकांना सतत मार्गदर्शन करायचे. त्यांचे अध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी रायगड-ठाणे परिसरातून भक्त मंडळी येत असत. त्यात सावळाराम महाराज हे देखील असायचे. सद्गुरू वामनबाबा यांच्या विचारांनी प्रभावित होऊन सावळाराम महाराज यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करले. काही काळानंतर वामनबाबा यांनी सावळाराम महाराज यांना प्रवचन- कीर्तन करण्याची आज्ञा दिली. हीच कास धरून त्यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजातील विषमता नष्ट करण्याचा चंग बांधला. कीर्तनातून समाज प्रबोधन करून शेकडो लोकांना निर्व्यसनी तर केलेच, शिवाय त्यांना वारकरी संप्रदायात जोडून घेतले. अर्थातच हे सर्व करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या.

सावळाराम महाराज आपल्या कीर्तनातून संतांचे मानव कल्याणाचे विचार सांगत. ईश्वर भक्ती-आराधनेबाबत प्रबोधन करत. शिक्षणाचे महत्त्व, अंधश्रद्धा निर्मूलन, मुलींचे शिक्षण याबाबत त्यांची आग्रही भूमिका राहिली. महाराजांच्या या प्रयत्नांनी समाज सुशिक्षित होत गेला. त्यांच्यामुळे आज अनेक मुले डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आयपीएस अधिकारी, प्रवचनकार, कीर्तनकार आहेत. आळंदी-पंढरपूर या ठिकाणी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येणाऱ्या भाविकांची निवासाची व्यवस्था व्हावी, यासाठी महाराजांनी लोकसहभागातून भव्य-दिव्य अशा धर्मशाळा उभारल्या. ढोके-श्रीमलंग येथे त्याकाळी दुर्गम असलेल्या भागात राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी एक विद्यालयदेखील उभारले. तसेच डोंबिवली शहरात अगदी मध्यवर्ती भागात वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळ, डोंबिवली’ या संस्थेची स्थापना केली. तिथे त्यांनी लोकसहभागातून श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर उभारले.

महाराजांनी ठाणे, रायगड, नाशिक या परिसरात दिवसरात्र आणि परिश्रमपूर्वक प्रबोधन केले. चातुर्मास काळात पंढरपूर येथे राहून संत-महात्म्यांचे पाठ श्रवण केले. धुंडा महाराज देगलूरकर आदी महात्म्यांची कीर्तने श्रवण केली. महाराजांचा स्वभाव अतिशय विनम्र, दयाळू आणि सर्वांना सामावून घेणारा होता. त्यामुळे समाजात सर्वत्र त्यांचे शिष्य आहेत. या महान विभूतीच्या कार्याचा गौरव म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने डोंबिवली येथील भव्य क्रीडा संकुलाला ‘वै. सावळाराम महाराज म्हात्रे, क्रीडा संकुल’ असे नाव दिले आहे. श्री महाराजांनी गावोगावी मंदिरे उभारण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले. पुढे त्यांनी त्या मंदिरांत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगितले. लोक एकत्र येतील. चांगल्या विचारांचे आदानप्रदान होईल. लोक निर्व्यसनी होतील, असा या मागचा हेतू होता.

सावळाराम महाराज या महात्म्याने आपल्या अंतिम श्वासापर्यंत समाजाची पारमार्थिक सेवा केली आणि माघ शुद्ध पौर्णिमा दि. १८ फेब्रुवारी १९९२ रोजी आपली इहलोकीची यात्रा संपवली. तेव्हापासून विठ्ठल- रखुमाई मंदिर, संतवाडा, डोंबिवली पूर्व येथे प्रतिवर्षी महाराजांचा पुण्यतिथी सप्ताह साजरा केला जातो. यामध्ये आठवडाभर विविध धार्मिक आयोजित केले जातात. श्री गुरुवर्य सावळाराम महाराज यांच्या निर्याणानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव वै. गुरुवर्य वासुदेव महाराज म्हात्रे यांनी समाजसेवेचे व्रत अधिक जोमाने सुरू ठेवले. त्यांच्या निर्याणानंतर ह. भ. प. चेतन महाराज म्हात्रे हे सध्या वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. म्हणजेच श्री महाराजांची तिसरी पिढी निरंतर समाजसेवा करत आहे. आज श्री गुरू सावळाराम महाराज यांची तिसावी पुण्यतिथी साजरी होत आहे. श्री सद्गुरूंच्या महान कार्य आणि विचारांना ।।ज्ञानबातुकाराम।। परिवारातर्फे त्रिवार वंदन…🙏

(या माहितीसाठी श्री. रवींद्र हरी पाटील, डोंबिवली यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published.