लोकांना सन्मार्गाला लावणारे
सद्गुरू रामानंद उर्फ तुकाबाबा
अत्यंत कठोर अनुष्ठान आणि तपश्चर्या करणारे, विठ्ठलाचे भक्त, श्री दत्तगुरूंचे साधक अशी ओळख असलेल्या महर्षी सद्गुरू रामानंद स्वामी सरस्वती म्हणजेच तुकाबाबा यांची आज ३०वी पुण्यतिथी. या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जालना जिल्ह्यात साधारणपणे पाच गावांत मोठा उत्सव साजरा केला जातो. यात बाबांचा ताडहादगाव मठ, श्री भोलेबाबा संस्थान, सिद्धेश्वर पिंपळगाव, रहेगव्हाण, दिण्णापूर, पाडवी नाईक या गावांत या उत्सवाला मोठे महत्त्व आहे.
रामानंद स्वामी यांचे बालपणीचे नाव तुकया.. त्यांचा जन्म ताडहादगाव इथं झाल्याची नोंद आहे. बाल तुकया आणि त्यांच्या आईने घर चालवण्यासाठी खूप कष्ट घेतले. शेती हा मूळ व्यवसाय असला, तरी त्यातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. एकदा गावात भजनी मंडळ आले होते. तिथली भक्ती पाहून ‘पंढरीचा सोहळा किती भव्य असेल’ असा विचार बाल तुकया यांच्या मनात आला. पंढरीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना.
आईकडून शिदोरी घेऊन पंढरपूरला जावे, असा विचार त्यांनी बोलून दाखवला. पण, घरात पीठदेखील नव्हते. शेजाऱ्यांनी मदत केली नाही. पण, मनात विठ्ठल भक्ती रुंजी घालत असल्याने तुकया यांनी तशाच अवस्थेत पंढरी गाठली. तिथं साधू- संतांचा मेळा पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि ते नित्य नामकरणात दंग झाले. पंढरीतच त्यांनी वारकऱ्यांची भगवी पताका हाती घेतली. तिथं यमुनाआई ही थोर माऊली गुरू म्हणून तुकया यांना लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाने तुकया यांनी थेट श्री क्षेत्र काशी गाठली. तिथं श्री दत्तगुरूंची उपासना केली आणि तेव्हापासून तुकया यांचे नाव रामानंद स्वामी असे झाले. असं म्हणतात, की स्वामीजी यांनी सुमारे ३६ वर्षे अळणी भोजन घेतले. दिवसातून एकदाच एक भाकरी खायची आणि ईश्वरसाधना करायची असा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांच्या पर्णकुटीत सदैव दत्तगुरूंचे भजन, प्रवचन भरायचे. गावकरी अत्यंत भक्तीने त्यात सहभागी व्हायचे.
पुढे स्वामींची ख्याती सर्वदूर पसरली. गावोगावचे लोक दर्शनाला येऊ लागले. सल्ला, मार्गदर्शन घेऊ लागले. स्वामींनी अनेकांना भक्तिमार्गात आणले. अनेकांना व्यसनापासून दूर केले. स्वामींनी पुढाकार घेत लोकवर्गणीतून दत्त मंदिर उभारले. अनेकांना दीक्षा दिली. सदैव आराधानेत तल्लीन राहणाऱ्या रामानंद स्वामी यांच्याभोवती श्वानांचे वास्तव्य असायचे. ईश्वरभक्तीतून अनेकांचा उद्धार करणाऱ्या रामानंद स्वामी यांनी १९९२ मध्ये इहलोकीचा प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला. असं म्हणतात, की त्यांच्या समाधीची जागादेखील त्यांनीच निवडली होती. आज त्यांची ३०वी पुण्यतिथी धार्मिक वातावरणात साजरी केली जात आहे. त्यानिमित्ताने श्री सद्गुरू एकनाथानंद रामानंद सरस्वती (भोलेबाबा) संस्थान सिद्धेश्वर पिंपळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अन्नदानाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंचक्रोशीतील हजारो भाविक त्यात सहभागी होत आहेत, अशी माहिती भोलेबाबा मंदिराचे सचिव विजयानंद महाराज सरस्वती आणि लेखक अंकुश महाराज कोरडे यांनी दिली. सद्गुरू श्री रामानंद स्वामी यांच्या कार्यास आणि भक्तिमार्गास ।।ज्ञानबातुकाराम।। परिवारातर्फे त्रिवार वंदन!🙏