निसर्गसुंदर देवगड येथील
प्रसिद्ध कुणकेश्वर महादेव
निसर्गाने मुक्तहस्त उधळण केलेल्या कोकणाला जसा समुद्रकिनारा आणि गर्द झाडी लाभली आहे, अगदी तशीच भव्य अशी धार्मिक परंपराही राहिली आहे. कोकणची दक्षिण काशी म्हणून देवगडमधील कुणकेश्वर हे महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. कोरोना काळ सोडला, तर दरवर्षी महाशिवरात्र यात्रेनिमित्त कुणकेश्वराच्या मंदिरात हजारो भाविक येतात. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने यंदा ही यात्रा बहरली आहे. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे, अशी नोंद आहे.
वर्षभर भाविकांची मांदियाळी
कुणकेश्वर मंदिर म्हणजे प्राचीन कलेचा एक अद्भूत नमुना आहे. मंदिराच्या बांधकामासाठी पूर्वी लाकूडसामान व कौले वापरण्यात आली होती. जीर्णोद्धार करताना मात्र मंदिराच्या मूळ रचनेत कोणताही बदल न करता सध्याचे आधुनिक साहित्य वापरून बांधकाम केले गेले आहे. मंदिराच्या आवारात श्री गणपती, श्री भैरव, श्री मंडलिक, श्री नारायण, देवी जोगेश्वरी आदी देवतांची मंदिरे आहेत. कुणकेश्वर जसे धार्मिक स्थळ आहे, तसेच या क्षेत्राला सुंदर, स्वच्छ समुद्र किनारा लाभला आहे. यामुळे वर्षभर येथे भाविक आणि पर्यटकांची रेलचेल असते. श्रावणी सोमवारनिमित्त या ठिकाणी भाविकांची मांदियाळी असते.
११व्या शतकापासून इतिहास
अतिप्राचीन काळापासून येथील ‘कणकेच्या राई’मध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभूमहादेवाची ही भूमी… कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच ‘कुणकेश्वर’… देवावरुन गावाचे नावसुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले. सुमारे ११व्या शतकापासून हे स्थळ प्रसिद्धीला आले आहे. जशी परंपरा आहे, तसेच हे देवालय भव्यदेखील आहे. एसटी थांबते तेथून अवघ्या पाचसात मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या मंदिराचा कळस लक्ष वेधतो. समुद्र किनाऱ्याच्या उंचवट्यावर उभारलेल्या या मंदिराचा सागरतटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित आहे.
गावोगावचे देव येतात भेटीला
यात्रेनिमित्त कुणकेश्वराच्या भेटीसाठी १२ किलोमीटरवरून येत असलेल्या जामसंडेच्या दिर्बा-रामेश्वरसाठी येथील खाडीवर नौकासेतू बांधला जातो. दर २४ वर्षांनी कुणकेश्वराच्या भेटीला येणाऱ्या कोटकामते गावच्या भगवती मातेला ग्रामस्थ उत्साहात वाजतगाजत कुणकेश्वर येथे आणतात. १६ किलोमीटरवरून येणाऱ्या मुणगे गावची भगवती माता वाटेत विश्रांती न घेता पायी येऊन कुणकेश्वरची भेट घेते. ५० किलोमीटरवरून येणारा मसुरे गावचा श्री भरतेश्वर पायी चालत गावरयतेसह कुणकेश्वरच्या भेटीला येतो. तसेच किंजवडे-स्थानेश्वर, दाभोळे-पावणाई, टेंबवली-कवळाई, असे अनेक देव त्याच्या त्याच्या रयतेसह कुणकेश्वराची पायी वारी म्हणजेच यात्रा करतात. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ परिसरात मोठी जत्राही भरते. कलिंगडांचा बाजार आणि मालवणी खाजे हे या जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे.
शिवलिंगांचे ऐतिहासिक महत्त्व
सिंधुदुर्ग किल्ला देवस्थानच्या परिसरात समुद्रकिनारी काही शिवलिंग आहेत. त्यापैकी २१ शिवलिंग आपणास ओहोटीवेळी पाहावयास मिळतात. गेली कित्येक वर्षे समुद्राच्या पाण्यामध्ये असणारी ही शिवलिंग झिज होत असतानासूद्धा ती पूर्ववत असल्याचे स्थानिक नागरिक सांगातत. गेली कित्येक वर्षे यात्रेकरू या शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत. ही शिवलिंग पांडवांनी घडवलेली आहेत, अशी श्रद्धा आहे.
पांडव लेणीचे वेगळेपण
देवळापासून जवळच पूर्व दिशेस डोंगराच्या उतरणीवर काही लोक जमीन खोदत होते. त्यावेळी कित्येक शतके बंद असलेली गुहा सापडली. आत कोरीव पाषाण मूर्ती आढळून आल्या. ही गुहा म्हणजे इतर कोरीव लेण्यांप्रमाणे एक लेणी आहे. पण, यातील मूर्ती मात्र गुहेच्या दगडांवर कोरलेल्या नसून त्या वेगळ्या आहेत. गुहेची खोली तांबड्या दगडाची असून, मूर्तीचा दगड काळा-काळित्री आहे. हा काळा दगड गावात समुद्राच्या कडेस आणि डोंगराच्या कडयांत क्वचित स्थळीच सापडतो. या गुहेला सध्या पांडव लेणी म्हणून ओळखले जाते. गुहेची खोली सुमारे १० फुट लांब ८ फूट रूंद आणि ६ फुट उंच असून, पाच फूट उंच आणि तीन फूट रूंद असा दरवाजा आहे. आत १८ कोरीव मुखवटे शिवलिंग आणि नंदी मिळून २० शिल्पे आहेत.