श्री ज्ञानेश्वरांनी वेद बोलविले

त्या रेडेश्वराचा समाधी सोहळा

पैठणच्या गोदाघाटावर श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आज्ञेने जो रेडा वेद बोलू लागला, त्या रेड्याच्या श्री क्षेत्र आळे येथील समाधीचा आज ७२७वा संजीवन सोहळा आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये प्राणी, पशुपक्षी आणि वृक्षांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. भारतीय संस्कृती कृषीप्रधान आहे. त्यामुळे प्राण्यांना देखील येथे देवत्व बहाल केले जाते. संत ज्ञानेश्‍वर महाराज तर संपूर्ण विश्‍व माझे घर आहे असे म्हणतात. त्यामुळे विश्‍वात येणारा प्रत्येक घटक हा त्यांचा नातलग आहे. घरातील सदस्य आहे. त्यामुळे विश्‍वातील विविधतेत देखील संत एकता शोधतात आणि त्यांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडतात,
हे विश्‍वची माझे घर। ऐसी मती जयाची स्थिर।
किंबहुना चराचर। आपणची झाला।
किंवा
संत तुकाराम महाराज म्हणतात,
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।।
संपूर्ण विश्‍वातील चराचर एकाच देवाची लेकरे आहेत. परंतु त्यांनी भिन्न आकार आणि वेश परिधान केला आहे. त्यामुळे सर्वांचा स्वीकार करून त्यांच्याकडे मायेने पाहिले पाहिजे, असा संदेश सकल संतांनी आपल्याला दिला आहे.

पैठणच्या धर्मपीठापुढचा प्रसंग
असा विश्वात्मक देवाचा संदेश ज्ञानोबाराय पैठण येथील धर्मपीठापुढे सांगत असतानाच सुप्रसिद्ध असा रेड्याचा प्रसंग घडला… विठ्ठलपंत आणि रुक्‍मिणी माता यांच्या पोटी संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्‍वर, सोपानकाका आणि मुक्‍ताईने जन्म घेतला. परंतु विठ्ठलपंतांनी लग्नानंतर संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यानंतरही अपत्य झाल्याने तत्कालीन ब्राह्मनांनी त्यांना वाळीत टाकले. विठ्ठलपंत आणि रुक्‍मिणीमातेला प्रायश्चित्त घेण्यास सांगितले. परंतु तरीदेखील या चारही भावंडांचा समाजाने स्वीकार केला नाही. शेवटी धर्मपीठ असलेल्या दक्षिण काशी म्हणजे पैठण येथून धर्मपीठाचे शुद्धपत्र घेऊन येण्यास सांगितले. तेव्हा ज्ञानोबांसह ही सर्व भावंडे पैठण येथे गेले. तिथे ज्ञानोबाराय आणि त्यांच्या भावंडांना पावलोपावली परीक्षांना सामोरे जावे लागत होते. चैतन्य सर्व ठिकाणी कसे एक आहे, याचे चिंतन ज्ञानोबाराय सांगत असताना एका धर्ममार्तंडाने प्रश्‍न केला. हा समोरून चाललेला रेडा त्याचे देखील नाव ज्ञाना आहे. तो देखील तुमच्यासारखी वेदवाक्क्ये बोलू शकतो का? तेव्हा ज्ञानोबारायांना होकार दिला. आणि रेड्याच्या मस्तकी हात ठेवून कृपा केल्याबरोबर रेडा ऋग्वेदातील ऋचा म्हणू लागला… धर्मपीठासमोरच्या या प्रसंगामुळे ज्ञानदेवादी भावंडांना लोकमान्यता मिळाली.

रेडा निघाला माऊलींच्या सोबत
या प्रसंगानंतर रेड्याचा मालक वाकोबा आपल्या रेड्यासह ज्ञानोबा आणि भावंडांसोबत प्रवासाला निघाला. पैठणहून आळंदीकडे जाताना नेवासा या ठिकाणी पैसाचा खांब येथे संत ज्ञानेश्‍वरांनी भावर्थदीपिका (ज्ञानेश्‍वरी) सांगितली. पुढे संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई, वाकोबा आणि त्याचा रेडा मजल दरमजल करत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्‍यातील अकलापूर गावी आले. त्यांनी संतवाडी येथील चौऱ्याच्या डोंगरावर वस्ती केली. डोंगरावरून आजूबाजूला पाहिले तेव्हा समोर असलेल्या वर्तुळाकार आणि निसर्गरम्य परिसराचे ज्ञानोबारायांनी आळे असे नामकरण केले. याच भूमीस पूर्वी अलंकापुरी म्हणून संबोधित असत. याच ठिकाणी सोबत आलेल्या ज्ञाना नावाच्या वेदमंत्र म्हणणाऱ्या रेड्याला ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्‍ताबाई यांनी स्वतःच्या हाताने शके १२१२ (इसवीसन १२९०) माघ वद्य १३ (त्रयोदशी) या दिवशी समाधी दिली. या चारही भावंडांचे हात लागलेली ही एकमेव समाधी.
येऊनिया उतरिले आळेचिये बनी।
पशु तये स्थानी शांत जाहला।।
असे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आळे येथील श्री रेडा संजीवन समाधी समाधीचे वर्णन आपल्या अभंगामध्ये केलेले आहे. ह्या परिसरात माऊली स्वतः अदृश्य स्वरूपात वास करत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या संजीवन समाधीच्या जागेत १९५५ च्या फाल्गुन शुद्ध पंचमीला श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यावर मंदिर उभारण्यात आले.

प्रापंचिक यात्रा
१९८८ मध्ये या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी समितीची स्थापना झाली. अनेक शेतकऱ्यांनी मंदिरासाठी आपल्या जमिनी दान केल्या आणि २३ फेब्रुवारी १९९६ मध्ये मंदिराचा शिखर जीर्णोद्धार झाला. त्यानिमित्ताने १३ दिवसांचा सोहळा आयोजित करण्यात आला. बाबा महाराज, केशवराव कबीर महाराज, भीमसेन महाराज, गडकर महाराज सहभागी झाले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं भाविकांना लक्ष भोजन घालण्यात आलं. प्रत्येक वर्षी चैत्र वद्य एकादशी द्वादशी आणि त्रयोदशीला यात्रा भरते. ही या परिसरातील सर्वात मोठी ‘प्रापंचिक यात्रा’ म्हणून प्रसिद्ध आहे. शेतीची लाकडी अवजारे, जीवनोपयोगी सर्व साहित्य या जत्रेत मिळते. यावेळी हगामा म्हणजे कुस्त्यांचा मोठा आखाडा भरतो. तीन दिवसात अखंड हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, काकड आरती असे धार्मिक कार्यक्रम पार पडतात. तिसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने ही यात्रा संपते. त्याचबरोबर वर्षभरातील शुद्ध एकादशीला आळे ग्रामस्थ आणि वद्य एकादशीला पंचक्रोशितील १२ गावांचा प्रत्येकी एक याप्रमाणे पुजेचा मान असतो. दुसऱ्या दिवशी द्वादशीचा महाप्रसाद म्हणून सर्वांना भोजन घालतात. वर्षातून दोन वेळा तसेच महाशिवरात्री आणि अधिक मासातही येथे अखंड हरिनाम सप्ताह होतो. अशी अखंड परंपरा आळे येथील रेडा मंदिरात सुरू आहे. वारकरी संप्रदायात आळे येथे असलेल्या या रेडेश्‍वर महाराजांच्या समाधीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अनेक वारकरी येथे महिन्याची वारी करतात. ज्या वारकऱ्यांना आषाढी, कार्तिकीला पंढरपूरला जाता आले नाही ते वारकरी आळे येथे येऊन रेड्याच्या समाधीचे दर्शन घेऊन वारीचे पुण्य प्राप्त करतात.

रेड्याची दशक्रिया आणि वाकोबाची समाधी
आळे येथे रेड्याला समाधी दिल्यानंतर माऊली आणि त्यांच्या भावंडांनी रेड्याचा दशक्रिया विधी करण्याचे ठरवले. यासाठी ते दक्षिणवाहिनी नदीचा शोध घेऊ लागले. त्यांना जवळच्याच चास येथील घोडनदी काठी योग्य ठिकाण आढळले. याठिकाणी नदी ९० अंशात वळते. याच ठिकाणी त्यांनी रेड्याचा दशक्रिया विधी केला. १९४७ मध्ये याठिकाणी जुन्नरचे कोंडाजीबाबा डेरे यांनी माशाच्या आकारातील छोट्या घुमटात ज्ञानेश्वरांची मूर्ती स्थापन केली. सध्या या ठिकाणी नवीन मंदिर उभारले आहे. गाभाऱ्याकडे तोंड करून बसवलेली रेड्याची मूर्ती आहे. कोंडाजीबाबा डेरे यांचीही मूर्ती इथे स्थापन केली आहे. मुख्य मंदिराच्या पुढे नदीकाठी मुक्ताबाईंचे छोटे मंदिर आहे. गुढीपाडवा ते चित्र पौर्णिमेला येथे सप्ताह होतो. भजन, कीर्तन, प्रवचन, काकड आरती असे धार्मिक कार्यक्रम होतात.

चास येथून ज्ञानदेवादी भावंडे भीमाशंकर दर्शनासाठी गेली. तेथून नारायणगावला आल्यानंतर मुक्ताईने वाकोबाला उपदेश दिला. काही दिवस तेथे राहिल्यानंतर हे सगळेजण पुणे-नाशिक हायवेवरील चाकण जवळील वाकी येथे आले. या ठिकाणी वाकोबा कोळ्याला माऊलींनी समाधी दिली. याठिकाणी सर्वजण १० दिवस राहिले आणि वाकोबांचा दशक्रिया विधी केला. याठिकाणी आता मंदिर उभारण्यात आले आहे. ‘काळोबा महाराज’ म्हणूनही लोक वाकोबांना संबोधतात. फाल्गुन महिन्यात शुद्ध द्वितीय ते सप्तमी असा पाच दिवसांचा येथे अखंड हरिनाम सप्ताह होतो. कार्तिकी एकादशीला आळंदी येथे काळोबा महाराजांची दिंडी जाते. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या कार्याचा साक्षीदार असलेला ज्ञाना रेडा आणि त्याचा मालक वाकोबा यांना समाधी उत्सवानिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार अभिवादन!🙏

– ह. भ. प. उमेश महाराज अनारसे

लवकरच आपल्या सेवेत येत आहे – www.dnyanbatukaram.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *