श्री ज्ञानेश्वरी प्रसाराचा ध्यास
घेतलेले मामा महाराज देशपांडे
श्री ज्ञानेश्वरीच्या प्रचार, प्रसारात महत्त्वाचे योगदान देणारे सद्गुरू योगीराज श्री श्रीपाद दत्तात्रय तथा मामा महाराज देशपांडे यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म परम पूज्य श्री टेंब्ये स्वामी महाराजांचे एक अधिकारी शिष्य श्री दत्तोपंत देशपांडे आणि श्री अक्क्लकोट स्वामी समर्थ महाराजांच्या शिष्या पार्वती देवी या भाविक दाम्पत्याच्या पोटी २५ जून १९१४ रोजी झाला. टेंब्ये स्वामींच्या आशीर्वादाने मामा महाराजांचा जन्म झाला, अशी त्यांच्या आईवडिलांची श्रद्धा होती. ते दोघेही ज्योतिष आणि आयुर्वेद यांचे उत्तम जाणकार होते.
आठव्या वर्षीच हिमालय यात्रा
वडिलांबरोबर वयाच्या आठव्या वर्षी श्रीपादाने हिमालय यात्रा आणि बाराव्या वर्षी अनवाणी नर्मदा परिक्रमाही केली होती. यात्रांमध्ये वडिलांकडून श्रीपादाला आयर्वेदिक औषधी, ज्योतिषशास्त्र यातील बारकाव्यांचे ज्ञान मिळाले. देशपांडे नसरापूरचे वतनदार होते. लहानग्या श्रीपादाला शिक्षणासाठी पुण्याच्या भारत हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर एक वर्षानेच दत्तू अण्णा स्वर्गवासी झाले. त्यानंतर पार्वतीदेवींही राहायला पुण्याला आल्या. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे श्रीपादाला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. तेल, साबण, उदबत्या विकून चरितार्थ चालवावा लागला. नंतर खडकी येथील ऍम्युनिशन फॅक्टरीत ते नोकरी करू लागले.
श्री ज्ञानेश्वरी, भागवताचा अभ्यास
आई पार्वतीमातेच्या सांगण्यावरून श्रीपादांनी दासबोध, श्री एकनाथी भागवत आणि नंतर ज्ञानेश्वरी या क्रमाने पारमार्थिक अभ्यास केला. ‘ज्ञानेश्वरी हा नुसता पारायणाचा ग्रंथ नाही, तर त्यातील ओवी जगता आली पाहिजे. देहाची तीन चिमट्या राख होईपर्यंत नेमाने आणि प्रेमाने न चुकता साधना करीत राहायची’, असे पार्वतीदेवी त्यांना सांगत असत. त्या स्वतः अध्यात्मातील थोर अधिकारी होत्या. शेवटची १२ वर्षे जमिनीला पाठ न टेकवता त्यांनी ध्यानधारणा केली. श्रीपाद उर्फ मामांनी १५ जून १९४८ रोजी गृहत्याग केला. आळंदी, पंढरपूर, व्दारका येथे यात्रा करून ते राजकोटला आले. तेथे हठयोग, अष्टांगयोग वगैरेचा अभ्यास केला. ध्यान-ध्यारणा, योगासने केली. गिरनार, व्दारका, हिमालय या यात्रांसोबतच त्यांनी पंढरीची आषाढीवारीही केली.
श्री ज्ञानेश्वरी प्रसाराचे कार्य
मामा महाराज साहेब हे श्री ज्ञानेश्वर माऊलींचे निष्ठावंत भक्त आणि संतवाङ्मयाचे साक्षेपी, रसज्ञ अभ्यासक होते. माऊलींच्या वाङ्मयाचा अखंड अभ्यास हा त्यांचा एकमात्र ध्यास होता. त्यांनी आजन्म पंढरीची वारी केली. संपूर्ण हयातीत हजारो प्रवचनांच्या माध्यमातून श्री माऊलींचा ज्ञानसंदेश जनमानसात वितरित केला. १९७३ साली इंग्लंडमधील त्यांच्या प्रवचनांनी भारावून जाऊन अनेक परदेशी व्यक्तींनी देखील ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू केला. संतविचारांच्या आधारे उपासनेला सुरुवात केली. मामा महाराज तरुणपणी उत्तम नाट्य दिग्दर्शक आणि नाट्य क्षेत्रातील जाणते व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी श्री माऊलींच्या जीवनावर ‘चैतन्य चक्रवर्ती’ हे सुंदर चार अंकी संगीत नाटक लिहिले. त्याच्या संहितेवरूनच काही वर्षांपूर्वी ‘ज्ञानोबा माझा’ हे संगीत नाटक मराठी रंगभूमीवर आले आणि सर्वत्र गाजले. मामा महाराजांना सर्व थोर महात्म्यांनी आणि विचारवंतांनी ‘ज्ञानेश्वरीचे अपूर्व भाष्यकार म्हणून एकमुखाने गौरविले आहे. आचार्य अत्रे देखील मामांकडे येऊन आवर्जून ज्ञानेश्वरीचे मार्गदर्शन घेत असत.
प्रवचनांमधून सांगितलेले ज्ञान हे तेवढ्यापुरतेच राहते. त्यातले सगळे काही लोकांच्या लक्षात राहत नाही. पण त्याच उपदेशाचे संकलन जर पुस्तकरूपाने प्रकाशित झाले तर मात्र त्याचा लाभ अनंत काळपर्यंत होत राहतो. याच संपन्न जाणिवेतून त्यांनी ‘श्री वामनराज प्रकाशन’ नावाने एक संस्था स्थापन करून श्री माऊलींच्या आणि इतर संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास ग्रंथांच्या माध्यमातून ना नफा तत्त्वावर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला. आजमितीस अडीचशे पुस्तके प्रकाशित करून अल्पदरात विक्री करणारी ही एकमात्र आध्यात्मिक प्रकाशन संस्था प्रसिद्ध पावली आहे. श्री माउलींचे वाङ्मय जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतरित करण्याचा मामा महाराजांचा एक महान संकल्पही हळूहळू पूर्ण होत आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून जगाच्या पाचही खंडांमध्ये मराठी संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास होत आहे.
मामा महाराजांची ग्रंथसंपदाही मोठी आहे. ह. भ. प. केशवराव देशमुख महाराजांनी केलेले ज्ञानेश्वरीचे तीन खंडांतील सुलभ ग्रंथ रूपांतर मामा महाराजांनी छापून प्रसिद्ध केले. तसेच हरिपाठ, अभंगमालिका, नारद भक्तिसूत्र, विवरण इत्यादी ग्रंथ प्रकाशित केले. ‘संतकृपा’ नावाचे मासिकही त्यांनी सुरू केले. १९८३ मध्ये श्रीवामनराज प्रकाशन आणि श्री वामनराज त्रैमासिकाची सुरूवात केली. अनेक वर्षे ज्ञानेश्वरीवर प्रवचने केली आणि ‘श्री ज्ञानेश्वरी वाड्.मय अभ्यास मंडळ’ स्थापन करून ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. त्यांनी इंग्लंडलाही ज्ञानेश्वरीवर प्रवचने केली.
सेवाकार्याचा झाला वटवृक्ष
१९७३ मध्ये ‘संप्रदाय सेवाकार्यासाठी स्वतंत्र पीठ स्थापन करावे’ या श्री गुळवणी महाराजांच्या आज्ञेनुसार सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथे ‘माऊली’ आश्रमाची स्थापना केली. कोयनानगरजवळील हेळवाक या गावी डोंगरावर भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली. या समारंभानंतर मात्र मामा महाराजांनी निरवानिरव सुरू केली आणि मंगळवार २१ मार्च १९९० रोजी त्यांनी योगमार्गाने देह सोडला.
परमपूज्य मामा महाराजांनी लावलेल्या रोपट्याचे आता मोठया वृक्षात रूपांतर झाले आहे. ‘श्रीपाद सेवा मंडळ’ या ट्रस्टच्या अंतर्गत अनेक प्रकल्प राबविले जातात. पुण्यात ‘श्रीसंत मामासाहेब देशपांडे सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय’ आणि वामनराज प्रकाशन कार्यालये आहेत. संतवाङ्मयाची सेवा करणाऱ्या या महान विभूतीस ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन!🙏