विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप
करावा लागणार : पुरातत्त्व विभाग
पंढरपूर : अल्पावधीतच निघालेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या वज्रलेपाची आणि झालेल्या झीजेची पाहणी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या टीमने नुकतीच केली. या पाहणीनंतर श्री विठ्ठल मूर्ती सुरक्षित आहे; तर रुक्मिणी मातेच्या चरणावर पुन्हा वज्रलेप करावा लागेल, असे निरीक्षण पुरातत्त्व विभागाचे प्रमुख श्रीकांत मिश्रा यांनी नोंदवले आहे.
सोवळे नेसून केली पाहणी
रविवारी (दि. ८) पहाटे साडे तीनच्या सुमारास काकड आरतीच्या वेळी पुरातत्त्व विभागाचे प्रमुख श्रीकांत मिश्रा आणि त्यांच्या टीमने सोवळे नेसून श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांच्या मूर्तीची बारकाईने पाहणी केली. विठ्ठल मूर्तीची नेमकी कोणत्या भागात झीज होत आहे, याची अत्याधुनिक उपकरणांसह मोजणी केली. रुक्मिणी मातेच्या मूर्तीला चरणाजवळ पडलेले खड्डे या टीमने पाहिले. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि समिती सदस्य उपस्थित होते. या पाहणीचा सविस्तर अहवाल पुरातत्त्व विभागातर्फे महाराष्ट्र सरकार आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना देण्यात येणार आहे.
फुलाफळांची सजावट बंद करण्याची सूचना?
विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील उष्णता, दमटपणा निर्माण करणारे घटक काढून टाकण्याची महत्त्वाची सूचना पुरातत्त्व विभागाने यापूर्वी दिली होती. गाभाऱ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी २२ वर्षांपूर्वी चकचकीत ग्रेनाईटच्या फरशा भिंतीवर लावण्यात आल्या होत्या. त्या फरशा काढून गाभाऱ्याचे मूळ दगडी स्वरूप कायम ठेवण्याची सूचना करण्यात आली होती. गाभाऱ्यात प्रखर उष्णता निर्माण करणारे वीजेचे दिवे बदलण्यास सांगण्यात आले होते. अभिषेकात वापरले जाणारे दूध, दही, साखर, मध हे पदार्थ मूर्तींवर विपरीत परिणाम करतात; त्यांचा वापर कमी करावा’ अशा पुरातत्त्व विभागाने दिलेल्या सुमारे १५ सूचनांचे व्यवस्थित पालन करण्यात आले नाही. या सूचना आता पुन्हा देण्यात आल्या आहेत. तसेच अलिकडच्या काळात गाभाऱ्यात विविध फुले, फळे यांची आरास करण्यात येते. त्यामुळेही दमटपणा वाढून मूर्तींना धोका संभवतो, त्यामुळे त्याबाबतही पुरातत्त्व विभागाने मंदिर समितीला सूचना केल्या आहेत.
मंदिरे समिती सूचनांचे पालन करणार : औसेकर
पुरातत्त्व विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येईल, अशी माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. पदस्पर्श दर्शन सुरू ठेवून कशा प्रकारे मूर्ती संवर्धन करता येईल, यावर मंदिर समिती आणि पुरातत्त्व विभाग निर्णय घेईल, असेही औसेकर म्हणाले.