वयाच्या ९९व्या वर्षी
मध्यप्रदेशात ठेवला देह
भोपाळ (मध्यप्रदेश) : हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू मानले जाणारे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे रविवारी (दि. ११ सप्टेंबर) दुपारी साडेतीन वाजता निधन झाले. मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील गोटेगावजवळील झोतेश्वर परमहंसी गंगा आश्रमात ९९ व्या वर्षी त्यांनी आपला देह ठेवला.
जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे द्वारका आणि ज्योतिर्मठ या दोन मठांचे शंकराचार्य होते. मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावात त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी धर्म कार्यासाठी घर सोडले होते. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन शंकराचार्यांनी तुरुंगवासही भोगला. राम मंदिराच्या उभारणीसाठीही त्यांनी प्रदीर्घ कायदेशीर लढा दिला. काही दिवसांपूर्वीच स्वामीजींचा ९९वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
नवव्या वर्षी घर सोडून तीर्थयात्रा करत जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती काशीला पोहोचले. तेथे त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले. महात्मा गांधींनी १९४२ मध्ये ‘भारत छोडो’चा नारा दिला, तेव्हा स्वामींनीही स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. त्यावेळी ते १९ वर्षांचे होते. त्यावेळी त्यांनी ९ महिने वाराणसीच्या तुरुंगात आणि ६ महिने मध्यप्रदेशच्या तुरुंगात काढले.
स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी १९५० मध्ये ज्योतिषपीठाचे ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंदर सरस्वती यांच्याकडून दंड संन्यासाची दीक्षा घेतली होती. १९८१ मध्ये त्यांना शंकराचार्य उपाधी देण्यात आली. स्वामी १९८२ मध्ये गुजरातमधील द्वारका शारदा पीठ आणि बद्रीनाथ येथील ज्योतिर्मठाचे शंकराचार्य बनले.
शंकराचार्य स्वरुपानंद यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जाऊ नये, अशी भूमिका मांडली होती. शेवटपर्यंत ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांच्या या भूमिकेमुळे काळी काळ वाद देखील निर्माण झाला होता. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात भूमिका मांडल्यानेही ते चर्चेत आले होते. तसेच ‘महिला राजकारणासह कोणत्याही इतर क्षेत्रात जाऊ शकतात, मात्र त्या शंकराचार्य बनू शकत नाहीत’, अशीही भूमिका त्यांनी मांडली होती.