उद्धव ठाकरे यांनी दिले

वारकरी प्रतिनिधींना आश्वासन

मुंबई : देहू, आळंदी आणि पंढरपूर येथे वारकरी भवन उभारण्यात यावे, तसेच देहू, आळंदीला वारकऱ्यांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारावे, अशी मागणी अखिल भारतीय वारकरी संघाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शनिवारी (दि. १० सप्टेंबर) केली.

मुंबईतील मातोश्री निवासस्थानी शनिवारी (दि. १०) अखिल भारतीय वारकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय वारकरी संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र महाराज कुंभार, उपाध्यक्ष धुमाळ गुरुजी, सचिव यशवंत महाराज फाले, प्रदेशाध्यक्ष गंभीर महाराज अवचार, तात्यासाहेब कोंढाळकर, अण्णासाहेब वाल्हेकर, विश्वनाथ महाराज जाधव, कृष्णा महाराज पांचाळ, आत्माराम शास्त्री, विठ्ठल महाराज गव्हाणे आदींसह वारकरी संघाचे सुमारे १०० कीर्तनकार, सदस्य वारकरी उपस्थित होते.

यावेळी वारकरी संप्रदायाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना संत तुकाराम महाराजांची पगडी देऊन सन्मानित करण्यात आले. वारकरी संघातर्फे उद्धव ठाकरे यांच्याकडे काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये वारकरी महिन्याची आळंदी, देहू, पंढरीची वारी करतात. बहुतेकांची राहण्याची गैरसोय होते. वारकऱ्यांसाठी शिवसेनेने मुंबईत उभारले, त्या धर्तीवर आळंदी, देहू, पंढरीत वारकरी भवन बांधावे, कीर्तनकारांकडे उतरत्या वयात आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागते. त्यांच्याकडे उपचारांसाठी, दवाखान्यासाठी पैसे नसतात. म्हणून त्यांच्यासाठी माफक दर असणारे हॉस्पिटल उभारावे. इतर सामान्य पेशंटनाही त्याचा उपयोग व्हावा, महाराष्ट्रभर जनप्रबोधनासाठी फिरणाऱ्या कीर्तनकारांना टोल माफ करावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्याकडे मुख्यमंत्री पद नसतानाही तुम्ही सर्वजण माझ्याकडे आलात, हे मी माझे भाग्य समजतो. मी हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफीच्या निमित्ताने का होईना, मी पंढरीची वारी अनुभवली आहे. वारीच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्यांमध्येची मी पांडुरंग बघितला आहे. खरे तर मुख्यमंत्री असतानाच ही कामे माझ्या लक्षात यायला हवी होती. पण आताही तुम्ही केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. हॉस्पिटल, वारकरी भवनासासाठी तुम्ही सुयोग्य जागा बघा. आम्ही ते पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू.

यावेळी वारकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष ह. भ. प. गंभीर महाराज अवचार म्हणाले, माननीय बाळासाहेब ठाकरे आम्हा सर्वांवर आईची माया करायचे. आता आम्ही उद्धवजींमध्येच बाळासाहेबांना पाहत आहोत. तुम्ही सत्तेत असा किंवा नसा, आम्ही तुमच्याकडे येत राहणार. कारण तुमचे पाय नेहमीच जमिनीवर असतात. आम्ही कुठल्याही भव्य मंदिरासाठी देणगी मागायला आलो नाही. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा, त्यांची सेवा करणारे हॉस्पिटल हेच मंदिर, असे मानणारे आम्ही वारकऱ्यांच्या नव्या पिढीचे प्रतिनिधी आहोत. अर्थात हॉस्पिटल उभे राहिले तर, त्यात छोटे मंदिर असेलच, पण हॉस्पिटल सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असावे, अशी आमची मागणी आहे. यावेळी वारकरी संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र महाराज कुंभार, सचिव यशवंत महाराज फाले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. खासदार अरविंद सावंत यांनी आलेल्या सर्व वारकऱ्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *