सातारकर, तनपुरेबाबांचा
आळंदी येथे आज सन्मान
आळंदी : राज्य सरकारच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार आज (दि. २६) आळंदी येथे प्रदान करण्यात येणार आहे. फ्रुटवाला धर्मशाळा मैदानात सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या पुरस्काराने ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, ह. भ. प. बाबा महाराज सातारकर, स्वामी श्री गोविंददेव गिरी तसेच महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना गौरविण्यात येणार आहे.
संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य सरकारच्या वतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी पाच लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना २०१९-२० साठीचा, ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांना २०२०-२१, स्वामी श्री गोविंददेव गिरी यांना २०२१-२२, महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना २०२२-२३ साठीचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, श्रीमती उषा देशमुख, ह. भ. प. निवृत्ती महाराज वक्ते, डॉ. किसन महाराज साखरे, मधुकर जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे हे पंढरपुरातील तनपुरे महाराज आश्रमाचे विद्यमान अध्वर्यू असून वारकरी परंपरा आणि गाडगे महाराजांची परंपरा याचा समन्वय साधणारे संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात. साने गुरुजींपासून ते डॉ. दाभोलकरांपर्यंत परिवर्तनाच्या चळवळीतील विविध घटकांशी त्यांचे साहचर्य राहिले आहे. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक सदस्य आणि पदाधिकारी तसेच कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून ते सर्वपरिचित आहेत.
कीर्तन परंपरेचा वारसा वयाच्या बाराव्या वर्षापासून आपल्या रसाळ आणि गोड वाणीने वैश्विक राजदूताप्रमाणे सांभाळणारे अध्यात्मातील ज्येष्ठ शिरोमणी म्हणजे ह. भ. प. बाबा महाराज सातारकर. बाबा महाराज सातारकरांनी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश अशा अनेक राज्यांत शेकडो कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम केले. कित्येक लोकांना संप्रदायाची दीक्षा देऊन व्यसनमुक्त केले. जनसेवेसाठी त्यांनी चैतन्य संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे त्यांनी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा पुरविल्या.
श्रीमद्भभागवत कथनाची सात ते आठ पिढ्या परंपरा असलेल्या कुटुंबात स्वामी श्री गोविंददेव गिरी यांचा जन्म झाला. हा समृद्ध ठेवा जपत त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षापासून श्रीमद्भभागवत कथनास सुरवात केली. अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर या जन्मगावी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यांनतर पाडुरंगशास्त्री आठवले यांनी प्रवर्तित केलेल्या तत्त्वज्ञान या विषयात स्वामी गिरी यांनी पदवी संपादन केली. संस्कृत, हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती यासारख्या विविध भाषांद्वारे दीड हजारांपेक्षाही अधिक व्याखाने, प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञान प्रस्तुत केले आहे.
महानुभवाचे अहिंसा हे महत्त्वाचे तत्व तसेच धर्माचे रहस्य आपल्या बोली भाषेत सांगणाऱ्या महानुभाव पंथाने भारतीय तत्वज्ञानात मोलाची भर घातली आहे. अशा या ज्ञानाने समृद्ध पंथात महंत बाभूळगांवकर शास्त्री यांनी १९६९ मध्ये बनापूर आश्रमात प्रवेश केला. त्यानंतर महानुभाव साहित्याचे अध्ययन, मराठी अक्षर ओळख, संस्कृती अध्ययन अशा अनेक बौद्धिक आणि लौकिक ज्ञानाच्या पायऱ्या पार करत विद्यापीठांतून त्यांनी पदवी प्राप्त केली. महानुभाव पंथांच्या वाङ्मयाचा पूर्वरंग अतिशय समृद्ध आणि संपन्न आहे. अशा समृद्ध वाङ्मयास अजून ३९ पुस्तकांनी बाभूळगांवकर शास्त्री यांनी संपन्न केले. आजवर त्यांनी तीन हजारांहून अधिक कीर्तने, प्रवचने केली आहेत.
पुरस्कार प्रदान समारंभाप्रसंगी भक्तीसागर या भक्तीमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे, कार्तिकी गायकवाड, समीर अभ्यंकर, आसावरी, विशाल भांगे, भजनसम्राट ओमप्रकाश हे भक्तीगायनाचा कार्यक्रम सादर करणार असून कमलेश भडकमकर हे संगीत संयोजन करणार आहेत. पुरस्कार प्रदान समारंभप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचालनालय निर्मित ‘अवघा रंग एक झाला’ आणि ‘हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील रॉबीनहूड दत्तोबा भोसले मातोळकर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.