वारकरी आईवडील ह. भ. प. निवृत्ती महाराज आणि सौ. सुभद्राबाई गायकवाड यांची स्मृती जागविण्यासाठी म्हणून त्यांचे चिरंजीव आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी ‘भामचंद्र वारी’ सुरू केली. म्हणजे दरवर्षी १ जानेवारीला संत तुकाराम महाराजांची तपोभूमी असलेल्या चाकणजवळच्या भामचंद्र डोंगरावर जायचं. तुकोबारायांचे विचार समजून घ्यायचे, वृक्षारोपण करून नव्या वर्षाची सुरूवात करायची. या उपक्रमात समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, तरुण, सर्व वयोगटांतील महिला, मुले आदी सहभागी होतात. संत तुकाराम महाराज आणि इतर संतांचे विचार समजून घेऊन त्यांचा समाजात प्रसार करणे, हा या भामचंद्र वारीचा मुख्य हेतू आहे. २०२२ या दुसऱ्या वर्षी यात आणखी एका उपक्रमाची भर पडली. ती म्हणजे संत साहित्याला वाहिलेला ।।ज्ञानबातुकाराम।। हा वार्षिक अंक. याच वार्षिक अंकाच्या ‘बा तुकोबा’ विशेषांकाचे प्रकाशन संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. दरवर्षीचा अंक या विभागामध्ये वाचायला मिळेल.
या उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे हे वेब पोर्टल आहे. १६ जून २०२२ रोजी पुणे येथे ‘आम्ही विठ्ठलाचे वारकरी’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पंढरीच्या वारीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याच वेळी www.dnyanbatukaram.com या पोर्टलचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे, संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे प्रमुख अॅड. विकास ढगे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह. भ. प. माणिक महाराज मोरे, देहू संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे, आळंदी संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. अभय टिळक, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, संत ज्ञानेश्वर माऊलींचे चोपदार राजाभाऊ रंधवे, रामभाऊ रंधवे, आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त रा. ना. गोहाड आदी यावेळी उपस्थित होते. या वेब पोर्टलवर प्रामुख्याने वारी आणि वारकरी संप्रदाय तसेच धार्मिक क्षेत्रांमधील विविध घटना, घडामोडींच्या बातम्या वाचण्यास मिळतील. धार्मिक क्षेत्रातील इतरही उपयुक्त माहिती लेख, मुलाखती, व्हिडिओ, ऑडिओ या स्वरुपात वाचायला, पाहायला, ऐकायला मिळतील.
संपर्क : dnyanabatukaram@gmail.com