राष्ट्रसंतांना वंदन करण्यासाठी

दोन लाखांहून अधिक भाविक

“या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे..” असा आपल्या काव्यातून वर मागणारे आणि वारकरी संतांचा मानवतेचा वारसा पुढे नेणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज ५४ वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांना वंदन करण्यासाठी त्यांच्या समाधी स्थळावर अर्थात अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथे देशविदेशातील दोन लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.

असंख्य अभंगांचे लेखन
“हे सर्व पंथ – संप्रदाय एक दिसू दे। मतभेद नसू दे।।
नांदोत सुखे गरिब-अमिर एकमतानी।
मग हिंदू असो, ख्रिश्‍चन वा हो इस्लामी।
स्वातंत्र्य सुखा या सकलांमाजि वसू दे।
दे वरचि असा दे।।”
या ओळींतून तुकडोजी महाराज आपल्याला एकोप्याचा संदेश देतात. तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकरे असे होते. त्यांचे गुरु आडकूजी महाराज यांनी त्यांना तुकडोजी हे नाव दिले. ‘तुकड्या म्हणे‘ या शब्दांनी शेवट होणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले.


स्वातंत्र्यसंग्रामात उडी
१९३० मध्ये त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला. भारत छोडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. त्यांनी तरुण आणि महिला वर्गात स्वातंत्र्याबद्दल जागृती निर्माण केली. त्यांचे म्हणणे होते की, मुंगी सुद्धा मनात आणले तर हत्तीला जेरीस आणू शकते. मग इंग्रजांना आपण घालवू शकत नाही का? आपल्या भजन-कीर्तनातून जनजागृती करुन त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांची एक फळीच निर्माण केली होती.

समाजसुधार आंदोलन
कारागृहाबाहेर आल्यावर त्यांनी समाज सुधार आंदोलन सुरू केले. नागपूरपासून १२० किलोमीटरवरील मोझरी गावात त्यांनी ‘गुरुकुंज’ आश्रमाची स्थापना केली. तेथे सर्व जाती, धर्म, पंथ, देशी, विदेशी लोकांना प्रवेश दिला जात होता.

ग्रामविकास हाच ध्यास
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष ग्रामीण पुनर्निर्माणवर केंद्रीत केले होते. खरा भारत खेड्यात आहे. गावाचा विकास हाच भारताचा विकास आहे.
“अरे उठा, उठा, श्रीमंतांनो, अधिकाऱ्यांनो, पंडितांनो, सुशिक्षितांनो, साधुसंतांनो, हाक आली क्रांतीची। गावा गावासि जागवा, भेदभाव हा समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा।”
या दोन ओव्या वाचल्या तरी संत तुकडोजी महाराजांची ग्राम कल्याणाविषयीची आर्त हाक पूर्णपणे लक्षात येते.

ग्रामगीतेचे लेखन
‘विश्वपुटे ग्रामे अस्मिन्ननातुराम’ या संस्कृत वचनातून बोध घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामगीता लिहिली. गाव सुशिक्षित, सुसंस्कृत, स्वयंपूर्ण व्हावे. देशाच्या गरजा गावाने भागवाव्यात. अंधश्रद्धा, अनावश्यक रुढी-परंपरा, देवभोळेपणा यात लोकांनी अडकून पडू नये यासाठी ते विशेष प्रयत्न करत.

गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना
महिला विकास हा त्यांचा प्रमुख मुद्दा होता. कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्या व्यवस्थापनात स्री कशी महत्वाचा वाटा उचलते. हे त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले. गावोगावी गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करून तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण केली. व्यसनाधिनतेचा तीव्र विरोध केला. देशभक्ती, आत्मसंयम यांचे धडे दिले. व्यायामाचे महत्व सांगणारा ‘आदेश रचना’ हा ग्रंथ लिहिला. तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. ते निरोगी, बलवान, नीतियुक्त, सुसंस्कृत असले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता.

विपुल साहित्याची रचना
मराठी, हिंदी भाषेतून त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले. जवळजवळ ३००० भजने, २००० अभंग, ६०० पेक्षा जास्त लेख त्यांनी लिहिले. सामाजिक, आध्यात्मिक, राष्ट्रीय विषयांवर हे लिखाण आहे. ते आध्यात्मिक क्षेत्रात योगी, सांस्कृतिक क्षेत्रात कवी, व्याख्याता, संगीततज्ज्ञ होते. कीर्तन, अभंग, खंजिरी भजने यातून त्यांनी समाज प्रबोधन केले. राष्ट्रोन्नतीच्या कामात त्यांनी आपले सारे आयुष्य खर्ची घातले. तत्कालिन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून सन्मानित केले. त्यांनी जगाला विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. स्वतः जवळ असलेल्या स्वानुभूत दृष्टीने, पवित्रतेने जगाकडे पहावे. कोणाचाही द्वेष करू नये. देव मंदिर, मशिद, चर्च अशा वास्तूंत नाही तर सर्वव्यापी आहे. एकाच निराकाराची भक्ती करा. आपले आंतरिक मूल्य आणि सार्वभौमिक सत्य जाणून घ्या. समाजाला आध्यात्मिक मार्गाने विश्वशांतीकडे नेणारे तुकडोजी महाराज हे राष्ट्रसंत होते. पंथपरंपरेवर मात करुन परमार्थाचा मार्ग सुकर करणारे संत होते. व्यक्तिगत स्वरुपाची भक्ती समाजाभिमुख करण्याचे सामर्थ्य असणारे आधुनिक समाज पुरुष होते. त्यांचे विचार कृतिप्रधान होते. त्यामुळे ग्रामाकडून देशाकडे व देशांकडून विश्वाकडे जाण्याचा मार्ग त्यांनी दाखवला.

सामुदायिक प्रार्थना
सामूहिक प्रार्थना पद्धतीने समाजात प्रेम,बंधूता वाढेल अशी त्यांची शिकवण राहिली. त्यांनी जगाला सांगितले, तुम्ही कोणत्याही धर्माचे असा साऱ्या जगाचा नियंता एकच आहे आणि आपल्या प्रार्थनेत हेच सूत्र असले पाहिजे, अशीच तुकडोजी महाराज यांनी दिली. तुकडोजी महाराजांच्या आजच्या ५४व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथील समाधीस्थळी देश, परदेशातून दोन लाखांहून अधिक गुरुदेवभक्त दाखल झाले आहेत. आज दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी दोन मिनिटे स्तब्ध होऊन तुकडोजी महाराजांना हे भक्तगण मौन श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर सर्वधर्माच्या प्रार्थनाही इथे होणार आहेत.
या थोर समाजसुधारक राष्ट्रसंतास ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *