परभणीतील महान दत्तभक्त
श्री योगानंद सरस्वती महाराज
पवित्र अशा दत्तसंप्रदायात अनेक महान विभूती होऊन गेल्या आहेत. नाथसंप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय यात भगवान श्री दत्तात्रेयांविषयी गाढ श्रद्धा आहे. हा दत्तसंप्रदाय आपल्या महाराष्ट्रात शेकडो वर्षे अस्तित्वात आहे. भगवान दत्तात्रेयांच्या उपासनेला सर्वाधिक प्रेरणा मिळाली, ती श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतारामुळे. या संप्रदायातील एक महान सिद्ध तपस्वी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, तो परभणी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गुंज येथील श्री योगानंद सरस्वती महाराज यांचे नाव घेतले जाते. आज त्यांची पुण्यतिथी.
जन्मभूमी गुजरात, कर्मभूमी महाराष्ट्र
श्री योगानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे मूळ नाव कल्याण. त्यांचा जन्म गुजरामधील तालनगुर, जि. सुरत येथे १८६९ मध्ये झाला. बालपणी त्यांचे जीवन अत्यंत सर्वसामान्य होते. पण, परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या संपर्कात आल्यानंतर योगानंद यांचे जीवन आमूलाग्र बदलले. पुढे त्यांना श्री टेम्बे स्वामींचा अनुग्रह झाला. योगानंद सरस्वतींच्या निष्ठा, श्रद्धा आणि आचरण यामुळे ते स्वामींचे एक अत्यंतजवळचे शिष्य म्हणून ओळखले जाऊ लागले. काही काळ ते भरुच येथे राहिले. पुढे देश भ्रमंतीनंतर गुरू आज्ञेनुसार गोदावरी नदी काठावरील श्री क्षेत्र गुंज येथे स्थिरावले. हे ठिकाण सध्या पाथरी तालुक्यात आहे.
गुंज येथील जागा झाली पावन
सद्गुरू श्री योगानंद सरस्वती स्वामी महाराज गुंज येथे आले. तेथील जागा स्वच्छ करण्यात आली. सद्गुरूंचे दर्शन घेण्याकरता दररोज अनेक गावांहून लोक येऊ लागले. सावलीसाठी मंडप टाकण्यात आला. अन्नदान होऊ लागले. भजन, कीर्तन, पंचपदीच्या गजराने गोदामातेचा पवित्र तीर दुमदुमू लागला. हे वातावरण भक्तिमय होऊन गेले. शके १९४४ चा नवरात्रोत्सव आणि दसरा-चातुर्मास सद्गुरूंनी गुंज येथेच केला. पुढे पाथरी, रेणापूर, मानवत आणि जिंतूर परिसरात दत्तमंदिर उभारणी आणि जडणघडणीत सद्गुरूंनी मार्गदर्शन केले.
श्री गुरूमूर्ती चारित्र लेखन
सद्गुरूंच्या मार्गदर्शनात श्री गुरुमूर्ति चारित्र लेखन करण्यात आले. सद्गुरू श्री प. प. स. योगानंद सरस्वती स्वामी हे सांगत आणि श्री हनुमंतराव देशपांडे हे उतरून घेत, तर श्री बापूराव मोरेगांवकर ग्रंथ लिखाणासाठी दररोज ताजी शाई तयार करून पाठवत असत. अशा पद्धतीने १४ हजार ८८३ ओव्यांचा आणि १३५ अध्यायांचा हा भव्य ग्रंथ सद्गुरूंनी मराठीत तयार केला. नारेश्वर येथील श्रीरंगावधूत महाराज आले. त्यांनी ग्रंथ शुद्धीकरण पूर्ण केले आणि नर्मदेस परिक्रमा केल्यानंतर त्यांनी भडोच येथे सहा महिने मुक्काम केला. ग्रंथाची मुद्रीते स्वत: तपासून त्याचे पारायणही स्वत: केले.
फाल्गुन वद्य द्वादशीला सोडला देह
पुढे योगानंद महाराजांची प्रकृती अस्वस्थ झाली. त्यांचे पूर्वाश्रमातील नातलग सेवेसाठी आले. एक दिवस सद्गुरूंनी सर्वांना सांगितले, की “दत्त संप्रदायाचे कार्य, धर्मजागृती आणि अन्नदान या गोष्टी गुंज येथे अव्याहतपणे सुरू राहाव्यात. यासाठी येथे दत्त मंदिर बांधावे. देवांचे नित्यपूजन, करूणात्रिपदी, पालखी, शंकराची पूजा आणि अभिषेक यात खंड पडू देऊ नये.’ काही दिवसांनी त्यांच्या अंगावरची सूज खूप वाढली आणि महाराजांनी शके १८५०च्या फाल्गुन वद्य द्वादशीस पहाटे भौतिक देह सोडला. महाराजांची समाधी या मंदिर परिसरातच आहे. श्री क्षेत्र गुंज शिव मंदिर, दत्त मंदिर आणि इतर निवास व्यवस्था, भोजन प्रसाद व्यवस्था संस्थानामार्फत होत असते. हे सर्व भव्य दिव्य मंदिर आणि परिसर विकासाचे कार्य सद्गुरूंचे परमशिष्य समर्थ चिंतामणी महाराज यांनी केले. या मंदिर ट्रस्टमार्फत अनेक सामाजिक, कल्याणकारी प्रकल्प राबवले जातात. भक्ती, साधना आणि सेवाभावाची शिकवण देणाऱ्या अशा या थोर विभूतीच्या कार्यास ।।ज्ञानबातुकाराम।। परिवारातर्फे त्रिवार वंदन.🙏
(या माहितीसाठी डॉ. रवींद्र डावरे, औरंगाबाद यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.)