सहज बोलण्यातून उपदेश करणारे

परभणीतील नथुरामबाबा केहाळकर

आपल्या निस्पृह कार्याने वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व बनलेले वै. नथुरामबाबा केहाळकर यांची आज पुण्यतिथी.

लहानपणापासून वारकरी संस्कार
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील केहाळ या गावी एका श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी नथुरामबाबा यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा अमृतराव आणि वडील गणपतराव हे गावातील प्रतिष्ठित मानकरी होते. त्यांच्या आई मैनावती यांनी बाबांचे नाव नाथू ठेवले होते, जे नंतर नथुराम झाले. त्यांचे मूळ नाव घुगे, पण केहाळ गावचे म्हणून पुढे त्यांना केहाळकर असे आडनाव लागले. नथुरामबाबांचे वडील लहानपणीच निवर्तले. त्यामुळे त्यांचा सांभाळ काकांनी केला. काका लहानग्या नथुला भजन, कीर्तनात घेऊन जायचे. त्यामुळे बालपणीच त्यांना भजन, कीर्तनाची आवड निर्माण झाली. कालांतराने देवगाव धानोरा येथील अप्पा कुटे यांची मुलगी लक्ष्मीबाई यांच्यासोबत नथुरामबाबांचे लग्न झाले. पण प्रपंचापेक्षा त्यांचा ओढा भजन, कीर्तनाकडेच जास्त होता. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा झाली. काही दिवसांनी त्यांची पत्नी सर्पदंशाने निवर्तली. त्यानंतर संसारातून त्यांचे चित्त उडाले. आईने दुसऱ्या लग्नाचा खूप आग्रह केला, पण त्यांनी ऐकले नाही. ते गावातील महादेवाच्या मंदिरात एकांतवासात ध्यानधारणा करू लागले. पण गावातील काही लोकांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. यादरम्यान जिंतूर तालुक्यातील शेवडीचे नामधारक श्री रंगनाथ महाराज शेवडीकर यांच्यासोबत त्यांची गाठ झाली.
जोगवाडा गाव बनले कर्मभूमी
रंगनाथ महाराज नथुराम महाराजांना भोसी या गावात घेऊन गेले. रंगनाथ महाराजांच्या सांगण्यावरून भोसीच्या गावकऱ्यांनी बाबांना महादेवाच्या मंदिरात राहण्यास जागा दिली. जिंतूरच्या पश्चिमेला अकोली नावाचे गाव आहे. तेथे एक दिवस कीर्तनासाठी म्हणून बाबांना तेथील ग्रामसेवक श्रीरंगराव अकोलीकर घेऊन गेले. तेथे कीर्तन ऐकण्यासाठी जोगवाडा येथील लोक आले होते. त्यात उत्तमराव मस्के, मारोतराव मगर अशी प्रतिष्ठित मंडळी होती. ते नथुराम महाराजांना जोगवाडा येथे घेऊन गेले. पुढे हे गावच नथुराम महाराजांची कर्मभूमी बनले. नथुराम महाराज आसपासच्या गावात पायी फिरत. कीर्तन, प्रवचन करत. पण त्यासाठीचा मोबदला घेत नसत. त्यांच्या या निस्पृह भावामुळे पांडुरंग महाराज पाथरगव्हाणकर, छगनबाबा टाकळीकर, नामदेव महाराज ढवळे, माऊली महाराज मदने, दिगंबर महाराज कुटे, तुकाराम महाराज दराडे, केसुमहाराज भोसीकर, विठ्ठल महाराज गायकवाड, शिवाजी महाराज हातेकर हे परमार्थ स्नेही त्यांना मिळाले.

सहज बोलण्यातून उपदेश
‘सहज बोलणे हाचि उपदेश’ अशा सहज शब्दांमध्ये नथुराम महाराज उपदेश करत. जोगवाडा येथे तुकाराम महाराज नावाचे एक सत्पुरुष होते. त्यांची तिथे समाधी होती. नथुराम महाराजांनी नाथषष्ठीला त्यांची पालखी घेऊन पैठण वारी सुरू केली. याशिवाय अधिक मासामध्ये ते जोगवाडा येथून दिंडी घेऊन पंचक्रोशीतील एकेका गावात जात. तिथे भजन, कीर्तन करत, तेही विनामोबदला. आळंदी ते पंढरपूर या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रथाच्या मागे असणाऱ्या हरिहर महाराजांच्या दिंडी क्रमांक ४६ मध्ये सामील होऊन ते दर आषाढी वारीला पंढरपूरला जात. रथाच्या मागे बापूसाहेब महाराज वारूडकर यांची दिंडी क्रमांक १५ असते. बापूसाहेबांचे पालखी सोहळ्यातील मानाचे कीर्तन सासवड येथे होत असे. ते निवर्तल्यानंतर त्यांची सासवड येथील कीर्तनसेवा नथुराम महाराजांना मिळाली होती. आळंदी, पंढरपूर, पैठणसोबतच नथुरामबाबा संत तुकाराम महाराजांची तपोभूमी असलेल्या भंडारा, भामचंद्र डोंगरावर जात असत.

शेत विकून बसविल्या मूर्ती
त्यांची जन्मभूमी असलेल्या केहाळ गावच्या महादेवाच्या मंदिरात त्यांनी स्वतःचे शेत विकून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बसविल्या. तिथे अधिक मासात महिन्याभराचा सप्ताह आणि अखंड वीणा पहारा सुरू केला. नथुराम महाराजांनी गावागावांत अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. सेवेचा काहीही मोबदला घ्यायचा नाही हे त्यांचे तत्त्व होते. ते त्यांनी शेवटपर्यंत पाळले. गाथा, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, भागवत हे ग्रंथ आणि त्यांचे वाचन, चिंतन हीच आपली संपत्ती असे ते मानत. ‘न पाहे याती कुळाचा विचार’ या संत वचनाप्रमाणे जातपात न पाहता ते उपदेश करत. ते सर्व प्राणीमात्रांवर, निसर्गावर प्रेम करत. जोगवाडा येथे एका विहिरीच्या कडेला उभ्या असलेल्या मोठ्या वृक्षावर खूप कावळे होते. त्यांची घाण विहिरीत पडून पाणी दूषित होत असे. त्यामुळे तो वृक्ष तोडायचे गावकऱ्यांनी ठरवले. त्याला नथुरामबाबांनी विरोध केला. वृक्ष वाचलाच, पण त्या दिवसापासून कावळेही त्या झाडावरून गायब झाले. रविवार दिनांक ७ एप्रिल २०१३ रोजी फाल्गुन कृष्ण पक्ष द्वादशी ब्रह्ममुहूर्तावर नथुराम महाराजांचे वैकुंठगमन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेचे नियोजन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केले होते.
नथुरामबाबांचे मंदिर आणि दिंडी
नथुराम महाराजांच्या निधनानंतर केहाळ या त्यांच्या गावी त्यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह सुरू करण्यात आला आहे. केहाळवरून पंढरपूर वारीसाठी त्यांच्या नावाने दिंडी सुरू केली आहे. तसेच बाबांच्याच प्रेरणेने जोगवाडा ते पंढरपूर अशीही पायी दिंडी गेली २५ वर्षे सुरू आहे. जोगवाडा येथेही बाबांचे मंदिर उभारण्यात आले आहे. त्यात बाबांच्या आकर्षक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. केहाळजवळच्या दिग्रस येथील दत्त आश्रमाच्या देवानंद बाबा यांच्या पुढाकारानेही पंढरपूरसाठी बाबांच्या स्मरणार्थ दिंडी काढली जाते. नथुरामबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या दिंडीतील लोक स्वतःचा खर्च स्वतः करतात. खाणेपिणे वगैरे बाबींसाठी इतरांवर अवलंबून राहत नाहीत.

महाराजांचे ओवीबद्ध चरित्र
नांदेडमधील मालेगाव गिरगाव येथील ग्रामसेवक शेषराव कऱ्हाळे यांनी नथुरामबाबांचे १०० अभंगाचे ओवीबद्ध चरित्र लिहिले आहे. तसेच दिग्रस येथील हरीभाऊ महाराज घुगे महाराज यांनीही नथुराम महाराजांचे २१ अध्यायांचे ओवीबद्ध चरित्र लिहिले आहे. नथुराम महाराजांचे विचार पुढे नेण्यासाठी आळंदी येथे ‘वैकुंठवासी नथुरामबाबा केहाळकर’ या नावाने वारकरी शिक्षण संस्था सुरू करण्यात आली आहे. त्यात अनेक विद्यार्थी संतविचारांचे धडे गिरवत आहेत. ह. भ. प. हनुमंत महाराज घाडगे या संस्थेचे व्यवस्थापन पाहत आहेत. अशा या थोर सत्पुरुषाला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवारातर्फे त्रिवार वंदन!🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *