श्री गजानन महाराजांची अखंड

सेवा करणारे भास्कर महाराज

शेगावच्या श्री गजानन महाराजांची सुमारे २९ वर्षे अखंड सेवा करणाऱ्या, वारकरी संप्रदाय वाढविण्यात मोलाचा हातभार लावणाऱ्या श्री भास्कर महाराज यांची आज ११५ वी पुण्यतिथी.

गीता जयंतीला जन्म
अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात अकोली जहागीर या गावातील कर्ताजी पाटील जायले आणि मातोश्री पार्वतीबाई जायले या दाम्पत्याच्या पोटी भास्कर महाराजांचा जन्म झाला. कर्ताजी पाटील नागपूरच्या रघुजीराजे भोसले यांचे सरदार होते. त्यांच्यावर गजानन महाराजांची कृपा झाली. महाराज त्यांच्या घरी गेले असता पार्वतीबाईंनी डोहाळे सांगितले, ‘गुरुसह नित्य आळंदी, पंढरीची वारी करीन. चोर, डाकू यांना दंड करीन आणि भागवत धर्माचा प्रसार करेन…’ शके १७२२ ला गीता जयंतीच्या पर्वकाळावर भास्कर महाराजांचा जन्म झाला. पुढे शके १७२५ मध्ये शिरसोली नावाच्या गावात इंग्रजांशी भोसल्यांचे युद्ध झाले. त्यात कर्ताजी पाटलांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात पार्वतीबाईंनी भास्कर महाराजांना शस्त्रास्त्र शिक्षणात निपुण केले. भास्कर महाराजांनी प्रजेचे चोर, डाकू यांपासून संरक्षण केले.

श्री गजानन महाराजांची भेट
गजानन महाराज आणि भास्कर महाराजांच्या भेटीची एक कथा सांगितली जाते. एकदा पाटीलकीचा कारभार बघणारे शस्त्रसज्ज भास्कर महाराज भालदारासोबत घोड्यावरून आपली शेती पाहत जात होते. तेव्हा एक निर्वस्त्र माणूस त्यांच्याकडे पाणी मागू लागला. भास्कर महाराज त्याच्यावर रागावले आणि गावात जाऊन पाणी माग म्हणाले. भास्कर महाराजांनी नकार दिल्यावर तो मनुष्य जवळच्याच कोरड्या विहिरीपाशी गेला आणि आश्चर्य म्हणजे १२ वर्षे कोरड्या असलेल्या त्या विहिरीतून पाण्याचे जिवंत झरे उफाळून वरती येऊ लागले. ते पाहून भास्कर महाराजांनी त्या मनुष्याला दंडवत घातला. तो मनुष्य म्हणजे साक्षात श्री गजानन महाराज होते. त्या घटनेपासून भास्कर महाराजांना वैराग्य आले आणि ते श्री गजानन महाराजांचे शिष्य बनले. त्यांनी पुढे तब्बल २९ वर्षे गजानन महाराजांची अखंड सेवा केली.

स्वतः गजानन महाराजांनी दिली समाधी
पुढे श्री गजानन महाराजांनी आपल्या या पट्टशिष्याला समाधी दिल्याचे वर्णन संतकवी दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्याय ११ मध्ये आलेले आहे. अकोटवरून हिवरखेड रस्त्यावर १० किलोमीटरवर असलेल्या द्वारकेश्वर या ठिकाणी गजानन महाराज आपल्या शिष्यांसह हनुमान जयंतीला आले. याठिकाणी १९०७ मध्ये गुरुवार दिनांक २५ रोजी चैत्र कृष्ण पंचमीला त्यांनी भास्कर महाराजांना समाधी दिली. याप्रसंगी खूप मोठ्या संख्येने भक्त मंडळी उपस्थित होती. महाराजांनी त्या सर्व भाविकांना ‘विठ्ठल विठ्ठल’ भजन करायला सांगितले आणि भास्कर महाराजांना समाधी दिली. अशा प्रकारे प्रत्यक्ष गुरूंनी आपल्या शिष्याला समाधी दिल्याचे माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतरचे हे दुसरेच उदाहरण असावे.
पुण्यतिथी उत्सवाची परंपरा
समाधीनंतर गजानन महाराज या ठिकाणी १४ दिवस उत्सवासाठी थांबून होते. या उत्सवात फार मोठ्या प्रमाणात अन्नदान झाले. संत पदाला पोहोचलेले श्रींचे पट्टशिष्य श्री भास्कर महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा भंडारा झाला म्हणून त्याचे नाव पडले, संतभंडारा. या अन्नदानाच्या कार्यक्रमात फार कावळे आले. त्यांचा त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांना मारण्यासाठी काही लोकांनी तीरकामटे आणले, पण गजानन महाराज म्हणाले, ‘कावळ्यांना मारू नका. मी त्यांना येथून जाण्यास सांगतो.’ त्याप्रमाणे त्यांनी कावळ्यांना येथून जा आणि एक तप इकडे येऊ नका, असे सांगितले. ते ऐकताच कावळे लगेच निघून गेले. त्यानुसार खरोखरच १२ वर्षे कावळे तेथे आले नाहीत. पुढे १९०७ ते १९१० असे भास्कर महाराजांचे चार पुण्यतिथी उत्सव गजानन महाराज यांनी स्वतः केले.

संत वासुदेव महाराजांनी केला जिर्णोद्धार
१९५५ मध्ये श्री संत भास्कर महाराज यांचे नातू श्री संत वासुदेव महाराज यांनी या संजीवन समाधी स्थळाचा जीर्णोद्धार केला. यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी हजारो वारकरी आले होते. या प्रसंगी वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांचे ‘हेचि दान देगा देवा’ या अभंगावर कीर्तन झाले. त्यांनी ही भास्करनगरी गोर-गरीब श्रद्धावान भक्तांची आळंदी आहे. या भागातील ज्यांना आळंदी किंवा पंढरपूरची वारी शक्य होत नसेल त्यांनी श्री क्षेत्र भास्करनगरची वारी करावी, असे कीर्तनात सांगितले. त्याप्रमाणे अजूनही कित्येक वारकरी, भाविक आळंदी, पंढरी, शेगावला जाणे शक्य न झाल्यास याच ठिकाणी येऊन आपली वारी पूर्ण करतात आणि गुरु-शिष्यांच्या दर्शनाने कृतकृत्य होतात.

भास्करनगर येथे ज्ञानदान
श्रीसंत वासुदेव महाराज यांनी वारकरी संतांच्या विचारार्थ प्रचार आणि प्रसार याकरिता श्री क्षेत्र भास्करनगर येथे एक ज्ञानपीठ उघडले. वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन स्वतः ज्ञानदान केले. दररोज हरिपाठ, काकडा, प्रवचन, कीर्तन, भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन, भागवत, रामायण आणि शास्त्र धडे असा नित्यनेम शिकवला. जातीयता हा समाजहितासाठी कलंक आहे, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना भेदाभेद नाहीशी करण्याची शिकवण दिली.

आज या संतपीठाच्या माध्यमातून अनेक कीर्तनकार घडले आहेत आणि संत विचारांचा प्रसार करत आहेत. याच क्षेत्रावरून महाराजांनी अनेक संशोधनात्मक माहिती निर्माण केली. पुढे अनेकानेक संतांचे चरित्र लेखन याच क्षेत्रातून केले. भक्तांची संतसेवा दृढ व्हावी याभावनेने पाक्षिक एकादशी वारीचा नियम गुरुवर्य महाराजांनी घालून दिला. दर एकादशीला स्वतः गुरुवर्य महाराज येथे तीन तास कीर्तन करत. अन्नदान हा श्रेष्ठ विधी या क्षेत्रात घडावा म्हणून त्यांनी बारस (द्वादशी) पंगत सुरू केली. आजही ती परंपरा भाविक भक्त श्रद्धेने जोपासत आहेत. या ठिकाणी महाराजांनी उन्हाळी बालसंस्कार शिबीर हा उपक्रम सुरु केला. संत वासुदेव महाराजांनी या समाधी स्थळाचा जिर्णोद्वार करुन श्री भास्कर महाराज संस्थान स्थापन करून हे संस्थान सर्वांर्थाने पुढे नेले. आयुष्याच्या अंतिम काळात २००१ मध्ये हे संस्थान शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानात विलीन केले.

अडगावच्या श्री क्षेत्र भास्करनगर (द्वारकेश्वर) येथे यंदाचा पुण्यतिथी उत्सव १४ एप्रिलपासून सुरू झाला. यात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, काकडा, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम झाले. आज (दि. २१) सकाळी सात वाजता शेगाव संस्थानच्या शिस्तबद्ध राजवैभवी थाटात श्रींच्या पालखी सोहळ्याने नगरप्रदक्षिणा केली. त्यात बाहेरगावाहून आलेल्या सर्व दिंड्या आणि पालख्यांनी सहभाग घेतला. १० ते १२ काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. अशा या थोर संताला पुण्यतिथी निमित्ताने ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *