सोपानकाकांचा पालखी सोहळा

सुरू करणारे धोंडोपंत दादा अत्रे

ज्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू श्री संत सोपानकाका यांचा पंढरपूरसाठी पालखी सोहळा सुरू केला, ते शिरवळकर फडाचे निष्ठावंत वारकरी वै. धोंडोपंत दादा अत्रे यांची आज पुण्यतिथी. ‘पंढरी हेच भूवैकुंठ’, ‘अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ ‘ज्ञानेश्वरी, तुकोबारायांचा गाथा हेच वारकऱ्यांचे प्रमाणग्रंथ’ हे वारकऱ्यांचे विचार खऱ्या अर्थाने, निष्ठेने जगलेले वारकरी म्हणजे, वैकुंठवासी धोंडोपंत दादा अत्रे.

सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी माढा तालुक्यातील घोटी गावी दादांचा जन्म झाला. धोंडोपंत गोविंद अत्रे असे त्यांचे पूर्ण नाव. तेथील वडिलोपार्जित जमीन, घरदार सोडून दादा भूवैकुंठ पंढरीत रमले. त्यांना थोर वारकरी संत गंगूकाका शिरवळकरांचा अनुग्रह झाला आणि ते त्यांच्या परंपरेचे पाईक बनले.
पंढरपूर हेच वैकुंठ
दादांचे ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत आदी वारकऱ्यांचे प्रमाणग्रंथ तोंडपाठ होते. संतांना अभिप्रेत असलेला वारकरी विचार दादा अक्षरशः जगले. पंढरपूर हेच भूवैकुंठ आहे. ते सोडून दुसऱ्या तीर्थांना जाऊ नये, असे सर्वच संतांनी सांगितले आहे. दादा आपल्या कीर्तनातून हा विचार आवर्जून सांगत. एकदा एका मित्राने काशीला जाऊन आल्यावर दादांचे कीर्तन ठेवले. तर दादांनी
सांडूनि पंढरी जासी आणिक तीर्था।
लाज तुझ्या चित्ता कैसी न ये।।
याच अभंगावर कीर्तन केले.
एवढेच नाही तर स्वतःचा मुलगा काशीयात्रेला गेला म्हणून दादांनी आयुष्यभर त्याचे तोंड पाहिले नाही!
अन्नदान हे श्रेष्ठदान
दादांनी अन्नदानाला आयुष्यात फार महत्त्व दिले. भजनाएवढेच भोजनही श्रेष्ठ आहे, असे ते मानत. त्यामुळे वारकऱ्यांच्या भोजनासाठी दादांनी प्रसंगी घरदार, शेतीही गहाण टाकली. अगदी घरातील स्वयंपाकाची तांब्या पितळेची भांडी, टाळही गहाण टाकले, विकले.
दादांच्या पश्चात धोंडोपंत दादा संस्थानने दादांनी वारकरी भोजनापायी गहाण टाकलेला वाडा सावकाराकडून सोडविला. आज तेथे मोठे बांधकाम झाले आहे. त्या इमारतीत दादांनी सुरू केलेल्या भोजनावळी होतात. अशाच प्रकारे घोटी येथील दादांची शेती सोडविण्यात आली. तिथे आज गोशाळा उभारण्यात आली आहे.
संत सोपानकाका पालखी सोहळा
वैकुंठवासी धोंडोपंत दादांचे एक मोठे कार्य म्हणजे त्यांनी सासवड या संत सोपानदेवांच्या समाधी स्थळावरून सुमारे १२५ वर्षांपूर्वी पंढरीला जाणारा सोपानकाकांचा पालखी सोहळा सुरू केला. सोपानकाकांचे त्यावेळचे पूजाधिकारी ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज गोसावी यांचे दादांना यासाठी सहकार्य मिळाले. संत सोपानकाकांचा पालखी सोहळा सुरू केला, त्यावेळी २०० वारकरी या सोहळ्यासोबत जात असत. आता या सोहळ्याचे स्वरूप भव्य झाले आहे. सुमारे १ लाख वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी असताना सोपानकाकांचे पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रस्थान होते. धोंडोपंत दादा अत्रे, खरवडकर महाराज, देशमुख महाराज यांच्या दिंड्या या पालखी सोहळ्यात चालतात.

भक्त पुंडलिकाशेजारी समाधी
दादा रोजच्या पंगतीला विठोबाचे प्रतिनिधी म्हणून बडवे, रूक्मिणीचे उत्पात, नामदेवरायांचे म्हणून नामदास आणि पुंडलिकरायांचे प्रतिनिधी म्हणून कोळी बांधवांना सवे घेऊन बसत. ज्यांनी विठोबाला भक्तांसाठी पंढरीत विटेवर उभे केले, त्या पुंडलिकरायाचे सेवक म्हणून दादांचे कोळी समाजावर विशेष प्रेम होते. १९४६च्या चैत्र वद्य तृतीयेला दादा वैकुंठवासी झाले. पंढरपुरातील कोळी समाजाने दादांचे अंत्यसंस्कार आग्रहाने पुंडलिक मंदिराच्या शेजारी केले. या ठिकाणी दादांची समाधी आहे. समस्त गावकरी आणि वारकरी आणि दिंड्या नगरपरिक्रमा करताना दादांच्या समाधीला थांबून आवर्जून वंदन करतात.

दादांच्या अस्थींवर त्यांच्या मठात सुंदर समाधी बांधण्यात आली आहे. दादांच्या पश्चात वै. दत्तात्रय काशिनाथ बडवे यांनी दादांच्या कार्याची धुरा समर्थपणे चालविली. त्यांनी आळंदीत मोठी जागा घेवून दादांच्या कार्याचा लौकीक वाढविला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशात सर्वदूर फिरून कीर्तने केली. आज धोंडोपंत दादा संस्थानचे अधिपती प्रसाद महाराज बडवे आणि अन्य विश्वस्थ हे वारकरी पंगतीचे दादांचे कार्य पुढे नेत आहेत. फडाचे भजन, कीर्तनादी सेवांही दादांनी घालून दिलेल्या दंडकानुसार अविरत चालविल्या जात आहेत.
अशा या निष्ठावंत वारकरी सत्पुरुषास पुण्यतिथी निमित्ताने ।।ज्ञानबातुकाराम।। परिवारातर्फे त्रिवार वंदन!

(लेखन संदर्भ : आशुतोष अनिलराव बडवे पाटील, पंढरपूर.)

1 thought on “धोंडोपंत दादा अत्रे पुण्यतिथी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *