सहजसुलभ हरिनाम रुजवणारे

बंगालमधील श्री चैतन्य महाप्रभू

पंधराव्या शतकात आपल्या देशात अनेक महान संत होऊन गेले. खरं तर तो काळ अत्यंत मोठ्या राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेचा. याच काळात समाजाला शांतता, प्रेम आणि एकोप्याची गरज होती. जातीभेदात पोखरलेल्या समाजाला एकत्रित आणण्यासाठी भक्तिमार्गाची आवड निर्माण करणारे थोर संत म्हणून श्री चैतन्य महाप्रभू यांनी मोठे कार्य केले. आज त्यांची जयंती.

चैतन्य महाप्रभूंचा जन्म पश्चिम बंगालमधील नवद्वीप धाम (आजच्या नादिया) या गावी फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच १८ फेब्रुवारी १४८६ रोजी झाला. चैतन्य महाप्रभू यांच्या जन्माविषयीची माहिती ‘चैतन्य चरितामृत’ ग्रंथात आढळून येते.

वृंदावन पुन्हा वसवणारे चैतन्य
चैतन्य यांना त्यांच्या वर्णामुळे गौरांग, गौर हरी, गौर सुंदर अशा अनेक नावांनी त्यांना ओळखले जायचे. चैतन्य महाप्रभूंनी गायन-भजनाच्या नव्या शैली प्रसूत केल्या. सामाजिक एकोपा- एकता, जातपात, उच्च-नीचतेची भावना दूर सारण्याची प्रेरणा चैतन्य महाप्रभूंनी समाजाला दिली. राजकीय संघर्षात जवळपास लुप्त झालेले भगवान श्रीकृष्णाचे ‘वृंदावन’ पुन्हा वसवले.
सप्तदेवालयांचे संस्थापक
चैतन्य यांनी नीलाचल येथे जाऊन जगन्नाथांच्या भक्ती आणि उपासना केली. वयाच्या २४ व्या वर्षी गृहस्थाश्रम सोडून केशव भारतींकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. संन्यास घेतल्यानंतर ‘श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू’असे नाव त्यांनी धारण केले व याच नावाने ते प्रख्यात झाले. गोविंददेव मंदिर, गोपीनाथ मंदिर, मदन मोहन मंदिर, राधा रमण मंदिर, राधा दामोदर मंदिर, राधा श्यामसुंदर मंदिर आणि गोकुलानंद मंदिर, अशा सात वैष्णव मंदिरांची चैतन्य यांनी वृंदावनमध्ये स्थापना केली. या मंदिरांना ‘सप्तदेवालय’, असेही म्हटले जाते.

अनेकांनी स्वीकारले शिष्यत्व
समाजाच्या तळागाळात भक्तिमार्ग रुजवणारे थोर पुरुष श्री ईश्वरपुरी यांनी चैत्यन्य यांना गुरुमंत्र देत अनुग्रह दिला. ते निरंतर श्रीहरीचे ध्यान व स्मरण करत असत. ‘माझा कृष्ण मला भेटवा’, असे म्हणत ते गावोगावी फिरू लागले. कृष्ण दर्शनाची त्यांना आत्यंतिक आस लागली होती. हळूहळू त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढू लागला. चैतन्यांच्या या संकीर्तनाला खूपच गर्दी लोटू लागल्याने चैतन्य आणखी काही मंडळींसह आपला शिष्य श्रीवास पंडित यांच्या घरी रात्री संकीर्तन करू लागले. हळूहळू त्यांना माधवाचार्य, शुक्लांबर, पुंडरीक, हरिदास, नित्यानंद ही मंडळीही मिळाली आणि त्यांचे शिष्य बनली.

सहजसुलभ भक्तिमार्ग
बंगाल आणि लगतच्या प्रदेशावर चैतन्य महाप्रभूंचा विलक्षण प्रभाव पडला. भागवत भक्तीचा प्रचार, प्रसार महाराष्ट्रासह अन्य प्रांतांत चैतन्यांच्या पूर्वीच झालेला होता. मात्र, बंगाल, ओडिसा यांसारख्या पूर्वाचल प्रदेशांत पूर्वापार चालत आलेला सनातन धर्मच रूढ होता. चैतन्य महाप्रभूंनी ब्रह्मज्ञानापेक्षा भागवत भक्तीचे सामर्थ्य लक्षात घेऊन तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यापेक्षा सहजसुलभ असा भक्तिमार्ग समाजाच्या तळागाळापर्यंत रुजवला. हरिनाम संकीर्तनाचा प्रसार सुरू केला. कृष्णाला आपले उपास्य दैवत समजून शुद्ध, निर्मळ आणि पवित्र आचरणाने व अढळ श्रद्धेने त्यांनी केवळ बंगाल-ओडिसात नव्हे, तर मथुरा-काशीपर्यंत ‘हरिनामा’चे महात्म्य प्रस्थापित केले. त्यांचे शिष्य कृष्णदास कविराज यांनी ‘चैतन्य चरितामृत’ हा ग्रंथ लिहून बंगाली काव्यरचनेस सुरुवात केली. वृंदावनदासाने ‘चैतन्य भागवत’ रचले. लोचनदास कवीने ‘चैतन्य मंगलची’ रचना केली.

समाजावर मोठा प्रभाव
चैतन्य महाप्रभू यांनी संस्कृत भाषेत आठ श्लोकांची रचना केली. जे आजही ‘शिक्षाष्टक’ म्हणून परिचित आहेत. यात त्यांनी हरिनामाची माहिती कथन केली आहे. लाखो वैष्णव आजही चैतन्यांनी दाखवलेल्या हरीमार्गावर मार्गाक्रमण करत आहेत. जीवनातील अंतिम काळ त्यांनी वृंदावनातच घालवला. चैतन्य स्वामींच्या नामसंकीर्तनाचा व्यापक आणि सकारात्मक प्रभाव आजही बंगालमध्ये समाजावर दिसून येतो. चैतन्य महाप्रभूंवर अनेक ग्रंथ लिहिले गेले. यामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी विरचित चैतन्य चरितामृत, वृंदावनदास ठाकूर विरचित चैतन्य भागवत व लोचनदास ठाकुरांचा चैतन्य मंगल या ग्रंथांचा प्रामुख्याने समावेश होतो.

एकूणच, भगवत्‌भक्तीचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्र आणि अन्य प्रांतांत चैतन्यांच्या पूर्वीच झालेला होता. पण बंगाल, ओरिसा, पूर्वाचल प्रदेश कर्मकांडात बुडाला होता. चैतन्य महाप्रभूंनी भगवत्‌भक्तीचे सामर्थ्य लक्षात घेऊन तत्त्वज्ञानापेक्षा सर्वांना सहजसुलभ असा भक्तिमार्ग उपलब्ध करून दिला. हरिनाम संकीर्तनाचा प्रसार सुरू केला. कृष्णाला आपले दैवत समजून ‘हरिनामा’चे महात्म्य प्रस्थापित केले. त्यांच्या या कार्य आणि शिकवणीला ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *