‘कलगीतुरा’ भजनाचे जनक

संत श्री पहाडसिंग महाराज

‘जो करील याची यात्रा, तो तारेल सकळही गोत्रा…’ अशी ज्यांच्याबद्दल नितांत श्रद्धा आहे, ते विदर्भातील आणखी एक महान संत म्हणजे श्री पहाडसिंग महाराज! गावोगावच्या साध्याभोळ्या, कष्टकरी माणसाला हरिनामाचे महत्त्व अत्यंत साध्यासोप्या भाषेत पहाडसिंग महाराजांनी सांगितले.

बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील पारखेड येथे पहाडसिंग महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याची आज सांगता होत आहे. ३० मार्च २०२२ पासून श्री पहाडसिंग महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव पारखेडमध्ये सुरू आहे. त्यानिमित्त ह. भ. प. श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात पार पडले.

भजन स्पर्धांची परंपरा

श्री विठ्ठलाचे भक्त आणि पश्चिमोत्तर विदर्भाचे गुरू असलेले संत श्री पहाडसिंग महाराज ‘कलगीतुरा’ या भजन प्रकाराचे जनक आहेत. तसेच त्यांनी ‘छंद’ हा काव्यप्रकारही रूढ केला. त्यांच्या या कर्तृत्त्वाचे स्मरण म्हणून त्यांच्या पुण्यतिथी महोत्सवात भजन स्पर्धा आणि कलगीतुऱ्याच्या भव्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. या भजनस्पर्धांसाठीच पहाडसिंग महाराजांची ही यात्रा ओळखली जाते. या यात्रेसाठी विदर्भ, मराठवाड्यातूनच नाही, तर राज्याच्या अन्य भागांतूनही मोठ्या संख्येने भजनी मंडळ आणि दिंड्या दाखल होतात. इथे होणाऱ्या भागवतकथा, हरिनाम कीर्तन, विष्णू सहस्रनाम पठण कार्यक्रमांत ते सहभागी होतात.

गावकरी मंडळींचा सहभाग

श्री पहाडसिंग महाराजांचा हा यात्रोत्स सगळे गावकरी एकत्र येऊन साजरा करतात. ही एकोप्याची परंपरा पारखेड ग्रामस्थांनी आवर्जून गेली अनेक वर्षे जपली आहे. पुण्यतिथी उत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या भजनी मंडळे आणि भाविकांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था मोठ्या आनंदाने दरवर्षी केली जाते. शिवाय, येथून जवळच असलेल्या काँग्रेसभवन परिसरातून येणाऱ्या भक्तांसाठी मोफत ऑटोरिक्षा उपलब्ध करून दिल्या जातात.

संत पहाडसिंग महाराजांची शिकवण

पारखेडच्या मंदिरात खंजिरी वाजविणारी, पिळदार मिशांची, चेहऱ्यावर सात्विक भाव असलेली मूर्ती पाहायला मिळते. महाराजांनी आयुष्यभर ईश्वरसाधनेचा, शांततेचा आणि एकोप्याचा संदेश दिला. संत श्री पहाडसिंग महाराज यांनी सदैव पांडुरंग, प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री गजानन महाराज यांचा आदर्श, त्यांचा संदेश भक्तांपर्यंत पोचवला. सामान्य माणसाच्या मनावर हरिनामाचे महत्त्व ठसविले.
पाटील पहाडसिंग म्हणे नाम घ्या रे नाम।
नगदी पैसा हरिनामाचा सोडा विषय काम।।
अशी त्यांनी शिकवण समाजात रुजवली. पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या या कार्यास ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *