माघ शुद्ध दशमी अर्थात

संत तुकाराम महाराज अनुग्रह दिन

मानवतेचा विचार सांगणारा वारकरी संप्रदाय म्हणजे इतर समविचारी पक्षांचा समन्वय. नाथ, दत्त आणि चैतन्य हे त्यातील प्रमुख संप्रदाय. संत ज्ञानेश्वर माऊलींनी नाथ परंपरा वारकरी विचारांशी जोडली. त्यानंतर संत एकनाथ महाराजांनी दत्त संप्रदायाचा समन्वय वारकरी परंपरेशी घातला. तर, वारकरी संप्रदायाचा कळस ठरलेल्या संत तुकाराम महाराजांना चैतन्य संप्रदायाचे बाबाजी चैतन्य यांचा अनुग्रह झाला, असे सांगितले जाते. त्यासाठी वारकरी तुकाराम महाराजांच्या खालील अभंगाचा दाखला देतात.

सत्य गुरुराये कृपा केली मज।
परी नाही घडली सेवा काही॥धृ॥
सापडविले वाटे जाता गंगास्नाना।
मस्तकी तो जाणा ठेविला कर॥१॥
भोजना मागती तूप पावशेर।
पडला विसर स्वप्नामाजी॥२॥
राघवचैतन्य केशवचैतन्य।
सांगितली खूण मालिकेची॥३॥
बाबाजी आपुले सांगितले नाम।
मंत्र दिला रामकृष्णहरी॥४॥
माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार।
केला अंगीकार तुका म्हणे॥५॥
या अभंगात सांगितलेल्या माघ शुद्ध दशमीला तुकोबारायांना गुरूंचा अनुग्रह झाल्याने हा दिवस वारकरी ‘अनुग्रह दिन’ म्हणून साजरा करतात. या दिवशी भजन, कीर्तन, प्रवचन, पारायण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

अभंगातील उल्लेख असलेली गंगा नदी म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील मांडवी नदी होय, असेही सांगितले जाते. कारण श्री बाबाजी चैतन्य यांचे या ठिकाणी वास्तव्य होते. मांडवी नदीच्या किनारी बाबाजी चैतन्य यांची समाधी पाहायला मिळते. याच ठिकाणी तुकाराम महाराजांना अनुग्रह झाला, असेही सांगितले जाते. शिवाय तुकाराम महाराज ओतूर गावात जानू तेली यांच्याकडे मुक्कामाला असत. तिथे मुक्कामाला असतानाच बाबाजी चैतन्य तुकोबारायांच्या स्वप्नात आले आणि त्यांना ‘राम कृष्ण हरी’ हा मंत्र दिला. या ठिकाणी सध्या तुकाराम महाराजांचे मंदिर आहे. दुसरीकडे देहू-आळंदीतून वाहणारी ज्ञानगंगा इंद्रायणी नदीकाठीच तुकोबारायांना अनुग्रह झाला, असाही मतप्रवाह आहे. देहूपासून जवळच असणाऱ्या भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराज चिंतनासाठी जात. याच ठिकाणी त्यांना अनेक अभंग स्फुरले. तुकोबारायांच्या या तपोभूमीत त्यांचा हा ‘अनुग्रह दिन’ उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सप्ताह आणि अन्नदानाचे आयोजन केले जाते. कार्यक्रमासाठी हजारो भाविक जमतात.

संत तुकारामांना भाकरी घेऊन आलेल्या जिजाईंच्या पायात या डोंगरावर काटा मोडला. प्रत्यक्ष भगवंताने तो आपल्या हाताने काढला, अशी आख्यायिका सांगितली जाते. याशिवाय भंडारा डोंगराच्या नावाबाबत एक आख्यायिका आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज एकदा मावळ प्रांतातून जात असताना भंडारा डोंगराच्या पायथ्याला आले होते. संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी ते डोंगरावर गेले. त्यांच्यासोबत शेकडो मावळे होते. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. छत्रपतींना समोर पाहताच संत तुकाराम महाराजांनी त्यांना जेवणाचा आग्रह केला. संत तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाबाई यांनी दोघांना पुरेल एवढीच शिदोरी आणली होती; परंतु चमत्कार असा झाला की, त्या शिदोरीतील भाकरी छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्व मावळ्यांनी घेऊनही शिदोरी संपली नाही. मावळे खाऊन तृप्त झाले. तेव्हांपासून या डोंगराला ‘भंडारा डोंगर’ असे नाव पडले, अशीही एक कथा सांगितली जाते.

या डोंगराशी संबंधित तुकोबारायांची आणखी एक कथा आहे. छत्रपती शिवरायांनी तुकोबारायांना सोने-मोती, दागदागिन्यांचा नजराणा पाठवला होता; पण महाराजांनी तो नाकारला. ते साधनेसाठी भंडारा डोंगरावर निघाले होते. त्यांनी डोंगराकडे बोट दाखवले. म्हणाले, “तो पाहा माझ्याकडे सोन्याचा संपूर्ण डोंगरच आहे. मला सोने-नाण्याची काय कमी?” तुकोबारायांनी दाखवल्याप्रमाणे मावळ्यांना खरोखरच ‘झळझळीत सोनसळा’ असलेल्या भंडाऱ्याचे दर्शन झाले. अर्थात या कथेतील भावार्थ ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ म्हणणाऱ्या तुकोबांच्या अभंगाशीही वारकरी जोडतात.

या भंडारा डोंगरावर ‘अनुग्रह दिना’च्या निमित्ताने गेली ५० वर्षे सप्ताहाचे आयोजन केले जाते. कुठल्याही प्रकारचे निमंत्रण नसताना हजारो वारकरी या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, असे भंडारा डोंगरावरील मंदिर देवस्थानचे विश्वस्त ह. भ. प. रविंद्र महाराज ढोरे यांनी सांगितले. या ठिकाणी सध्या संत तुकाराम महाराजांचे सुमारे १०० कोटींचे भव्य मंदिर उभे राहत आहे. भाविकांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

लवकरच आपल्या सेवेत येत आहे – www.dnyanbatukaram.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *