शांतिब्रह्म श्री संत एकनाथ
यांची षष्ठी अर्थात पुण्यतिथी
नाथबाबा आणि आणि त्यांचे पणजोबा भानुदास महाराज यांचे आपल्यावर मोठे उपकार आहेत. त्यातील महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे, विजयनगरचा राजा कृष्णदेवरायाने नेलेली श्री विठ्ठलाची मूर्ती भानुदास महाराजांनी पुन्हा पंढरपुरात आणली आणि काळाच्या ओघात श्री ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रक्षेप झाले होते. ते दूर करून एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीतील शुद्ध ज्ञानगंगा पुन्हा बहुजन समाजासाठी वाहती केली. सामाजिक ऐक्य, जातिभेद निवारण याबाबत केवळ जनजागरण करूनच ते थांबले नाहीत, तर त्याबाबत आपल्या कृतीतूनही त्यांनी समाजाला आदर्श घालून दिला. म्हणून तर ‘भानुदास-एकनाथ’ असे भजन करत पंढरपूर खालोखाल लाखोंच्या संख्येने नाथषष्ठीसाठी वारकरी पैठणमध्ये गर्दी करतात.
श्री एकनाथ षष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर श्री एकनाथ महाराज जलसमाधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विशेषत: पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक ह्या सोहळ्यास उपस्थित असतात. पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी आहे. विविध ठिकाणांहून आलेल्या जवळपास ६०० दिंड्या, ‘भानुदास-एकनाथ’चा गजर यामुळे संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो. फाल्गुन वद्य षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी (मार्च महिना) ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथ मंदिरातील रांजणाच्या पूजेने उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यंत श्री केशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते. पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते.
षष्ठी –
षष्ठीच्या दिवशी पहाटे दोन वाजता श्री विजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात येतो. नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गावातील मंदिरातून श्री एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. मंदिरात नाथ वंशजांच्या वतीने वारकरी आणि हरिदासी कीर्तनं करण्यात येतात. गावातील मंदिरात परतल्यानंतर आरती होते. सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंड्या नगर प्रदक्षिणा करून गोदाकाठी आपापल्या फडात/मठात विसावतात.
सप्तमी –
सप्तमीच्या दिवशी रात्री १२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. त्यास छबिना असे म्हणतात. पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदास्नान घालण्यात येते. भारुडे सादर केली जातात. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते. वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. वाळवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते.
अष्टमी –
अष्टमीच्या दिवशी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास गावातील नाथमंदिरातून काला दिंडी निघते. उदासी मठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळण्यात येतात. हे दृश्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी हजारोंचा समुदाय येथे उपस्थित असतो. समाधी मंदिरात पोचल्यानंतर मंदिराच्या समोरील पटांगणावर टाळमृदुंगाच्या गजरात शेकडो भाविक पावल्या खेळण्यात तल्लिन होऊन जातात. मंदिराच्या बाजूस उंच ठिकाणी गुळ आणि लाह्या यांचे मोठेमोठे लाडू आकर्षकरित्या बांधण्यात येतात. त्याच्या मध्यभागी काला भरलेली हंडी लटकविलेली असते. सूर्यास्तासमयी ’दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ’च्या जयघोषात नाथ वंशजांकडून काठीने ती हंडी फोडण्यात येते. प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. परंपरेचे अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो. या तीनही दिवसांमध्ये श्री एकनाथ महाराजांच्या पैठणकर फडातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होत असतात. शिवाय इतरही दिंड्या आपआपल्या पध्दतीने सोहळ्याचा आनंद लुटतात.
पैठण येथे या सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच कोकण, मुंबई, कर्नाटक आदी परिसरातून दिंड्यांची आणि वारकऱ्यांची नव्याने भर पडत आहे. नाथषष्ठी हा उत्सव विदेशी लोकांच्याही आकर्षणाचा विषय बनला असून अनेक विदेशी पर्यटक सोहळा पाहण्यासाठी पैठणास येतात.
फाल्गुन वद्य षष्ठीला पाच घटना घडल्याने या दिवसाला पंचपर्वश्रेणी असेही म्हणतात. त्या पाच घटना म्हणजे,
१. नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म
२. स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह
३. नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह
४. श्री जनार्दनस्वामी पुण्यतिथी
५. श्री एकनाथ महाराज जलसमाधी
श्री दत्तभक्त नाथ
एकनाथ महाराजांचा जन्म १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. एकनाथांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा-आजी होत. एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगिरी येथे दरबारी अधिपती होते. ते दत्तोपासक होते. नाथांनी परिश्रम करून गुरूसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले. द्वारपाल म्हणून श्री दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील गिरिजाबाई यांच्याशी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी आणि गंगा या दोन मुली तसेच हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा पंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.
साहित्य संपदा
संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ या लोककलांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ महाराज हे संत, पंत आणि तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन, प्रबोधन केले. त्यामुळे त्यांनी ‘जन खेळकर केला’ असे म्हणतात. ते ’एका जनार्दनी’ म्हणून आपल्या साहित्यात नाममुद्रा वापरतात.
’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांनी लिहिली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते आणि देवीभक्तही होते. केवळ साहित्यातूनच ऐक्याची, समतेची भूमिका मांडून ते थांबले नाहीत, तर वैयक्तिक, सामाजिक जीवनात त्यांनी तसे आचरण केले. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी १५९९) या दिवशी संत एकनाथांनी जलसमाधी घेतली. त्यामुळे हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांना ।।ज्ञानबातुकाराम।। परिवारातर्फे त्रिवार वंदन!