धार्मिक सलोखा जपणारे 

श्री सद्गुरू जंगली महाराज

सामाजिक, धार्मिक ऐक्य जपून अंधश्रद्धा दूर करत समाजात बंधुभाव निर्माण करण्याची संतांची परंपरा पुढे नेणारे संत म्हणजे श्री सद्गुरू जंगली महाराज. महाराजांची आज १३२वी पुण्यतिथी आहे.

बालपणापासूनच समतेचे संस्कार

पुण्यातील भांबुर्डा अर्थात शिवाजीनगर येथे जंगली महाराजांचे समाधी मंदिर आहे. सोलापूरजवळील होनमुर्गी हे त्यांचे जन्मगाव. होनमुर्गी गावाचे कुलदैवत बसवेश्वर हे आहे. तिथे जसे बसवेश्वराचे मंदिर आहे त्याचप्रमाणे मेहबूब सुसानी या पीरांचा दर्गाही आहे. या दोन्हीही सत्पुरुषांच्या विचारांचे संस्कार त्यांच्यावर बाळपणीच झाले होते. लहानपणापासूनच त्यांनी कन्नड, उर्दू, संस्कृत आणि फार्सी या भाषा आणि मल्लविद्येचा अभ्यास केला होता. याशिवाय, वेगवेगळ्या धर्मांचाही अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोण अतिशय व्यापक आणि उदार झाला होता. ते स्वतः शेतात कष्ट करत. तरुणपणीच त्यांनी समवयस्क तरुणांना धार्मिक शिक्षण देण्यास सुरुवात केली होती.

माऊलींच्या सहवासात साधना

जंगली महाराजांनी १८५७ च्या लढाईत भाग घेतला होता, असे सांगतात. त्यानंतर त्यांनी देशभ्रमण केले. हिमालयात त्यांना नाथपंथाची दीक्षा मिळाली आणि योगमुद्रा कृपेसाठी आळंदीला श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सान्निध्यात जाण्यास त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार एका सहयोग्यासोबत ते आळंदीत साधनेसाठी अनेक दिवस येऊन राहिले. तिथेच त्यांना ज्ञानोबा-तुकोबा अनुबंध लक्षात आला. या संतांच्या विचारधारेचा समाजात प्रसार करण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यातूनच मग त्यांनी १८६८मध्ये श्री क्षेत्र देहू येथे तुकाराम महाराजांच्या घरापासून ते त्यांच्या वैकुंठगमनाच्या स्थळापर्यंतचा रस्ता बांधवून घेतला आणि कडेला झाडेही लावली. तसेच तेथे भक्तांसाठी एक धर्मशाळा आणि पुंडलिकाचे मंदिरही बांधले. त्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी भ्रमंती केली. ठिकठिकाणी मठ उभारले. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरहद्दीवरील कारदगा या गावात त्यांनी आणि तेथील बंगाली बाबा यांनी मिळून धार्मिक सलोखा निर्माण केला. कुडची, जामखंडी, नरसोबाची वाडी, कुरुंदवाड, वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले. रेठरे हरणाक्ष येथील श्रीधरपंत कुलकर्णी उर्फ प्रसिद्ध शाहीर पठ्ठे बापूराव यांना जंगली महाराजांनी १८६५मध्ये अनुग्रह दिला. महाराजांच्या सहवासात आल्यावर पठ्ठे बापूराव यांचे काव्य शृंगाराकडून भक्तिमार्गाकडे वळले.

श्री सद्गुरू जंगली महाराजकुस्तीच्या प्रसारासाठी कार्य

महाराष्ट्रातील शाहूंच्या कारकीर्दीत बहरली गेलेली कुस्ती पश्चिम महाराष्ट्रात वाढवली पाहिजे आणि बलोपासना आणि अध्यात्म यांचा समन्वय साधून राष्ट्रोन्नत्ती केली पाहिजे ही जिद्द धरून जंगली महाराजांनी जिथे जिथे आश्रम आहेत तिथे तिथे कुस्ती सक्तीची केली. ध्यान धारणा आणि समाधी या अवस्थेत जाताना समाजाला बलोपासनेचा संदेश मिळावा यासाठी त्यानी त्यांच्या सर्व शिष्याना मल्लविद्या आत्मसात करायला शिकवले. महाराज स्वतःही उत्तम मल्ल होते.

अंधश्रद्धा दूर करण्यात पुढाकार
त्यानंतर सद्गुरू जंगली महाराज साधारणपणे १८८६ मध्ये पुण्यात आले. पुण्यातील त्या काळचे भांबुर्डे म्हणजे आजचे शिवाजीनगर याठिकाणी ते वास्तव्य करून राहिले. महाराजांचे पुण्यातल्या भांबुर्डे गावठाणातील रोकडोबा मारुती मंदिरात वास्तव्य असे. रोकडोबाचे त्या काळचे स्वरूप भैरवाचे असल्याने त्या मंदिरात पशू बळी देणे, विंचू-दंश झाल्यास देवासमोर वाद्यांचा गजर करून साकडे घालणे, नवसपूर्तीसाठी माणसाला बगाडाला अडकवणे वगैरे अघोरी प्रकार चालत. याबरोबर रेड्यांच्या झुंजी आणि तमाशेही चालत. जंगली महाराजांनी अनिष्ट गोष्टींना पायबंद घातला. त्यासाठी त्यांनी केलेला पहिला बदल म्हणजे, रोकडोबाचे भैरव हे स्वरूप बदलून त्याला मारुतीचे रूप दिले. बगाड या अघोरी प्रकाराऐवजी महाराजांनी गळ्यात वीणा घेऊन देवापुढे अखंड हरिनामाचा पहारा सुरू केला. रेड्यांच्या झुंजींऐवजी मल्लांच्या कुस्त्या सुरू केल्या. या मंदिरात आजही हा वीणा पहारा सुरू आहे. तसेच जवळपासच्या तालमींमध्ये बलोपासना सुरू आहे. सत्यशोधक विचारांचे महात्मा जोतिराव फुले आणि कृष्णराव भालेकर हे महाराजांच्या मठात येत. त्यांच्याशी समाजसुधारणेबात चर्चा करत. महाराजांशी झालेल्या चर्चेचा त्यांना सामाजिक चळवळ पुढे नेण्यासाठी उपयोग झाला.

वारकरी भजनांना प्रोत्साहन

सद्गुरू जंगली महाराज स्वतः राजयोग, हटयोग आणि अष्टांगयोगात फार निष्णांत होते. तथापि त्यांच्यावर वारकरी संतांचा प्रभाव असल्याने सर्वसामान्यांच्या आत्मिक उन्नतीसाठी त्यांनी भजनामार्फत भक्तीमार्गाचा प्रचार आणि प्रसार केला. देहू, आळंदीहून सांप्रदायिक भजनकरी आणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रासादिक भजनी मंडळ सुरू केले. निवडक अभंग, उत्तम भजनाची मांडणी, प्रत्येक भजनात त्याचा अर्थ आणि रस यांना साजेशा चाली लावण्यात आल्या. भजनातील नाचकाम, चाली, पखवाज वादन, संवाद यांना एक अभ्यासपूर्ण चालीबद्ध करून एका नव्या सांप्रदायाची निर्मिती केली. सद्गुरूंनी १८८१ च्या दरम्यान स्थापन केलेले भजनी मंडळ पुढे सुप्रसिद्ध असे श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ म्हणून ओळखले जाऊ लागले. हे भजनी मंडळ पुण्याहून भक्त पुंडलिकाची पालखी घेऊन आजही देहूला जाते. अनेक घराण्यातील पुरुष, स्रिया, मुले सद्गुरू महाराजांचे कृपांकित झाले होते. त्या सर्वांचे वंशज आजही महाराजांनी घालून दिलेल्या प्रथेप्रमाणे श्रींची सेवा करीत आहेत. शिलेदार शिरोळे (पाटील) घराणे हे पुण्याचे पाटील आणि छत्रपतींच्या स्वराज्याचे शिलेदार. हे घराणे जंगली महाराज यांचे प्रमुख शिष्य म्हणून मानले जाते. सदगुरू जंगली महाराज आणि ग्रामदैवत रोकडोबा महाराज यांचा मान शिरोळे घराण्याचा आहे.

पुण्यतिथीचा सोहळा १५ दिवस

१८९० च्या प्रारंभी महाराजांची प्रकृती खालावत चालली. त्या काळातही ते योगसाधना करीत असत. आपल्या आयुष्याच्या सायंकाळीची चाहूल लागली असल्यानेच जणू भांबुरड्याच्‍या टेकडीवर आपल्या समाधीची/कबरीची जागा त्यांनी निश्चित करून ठेवली होती. ४ एप्रिल १८९० रोजी महाराजांनी आपली इहलोकींची यात्रा संपविली. जंगली महाराजांचे येथील मंदिर आज सर्वधर्म सलोखा सांगणारे मानवतेचे मंदिर बनले आहे. महाराजांनी समाधी घेतल्यापासून प्रतिवर्षी त्यांच्या पुण्यतिथीचा १५ दिवस भव्य सोहळा करण्यात येतो. त्यात नित्य पूजाअर्चा व्यतिरिक्त अखंड वीणा, प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, गायन, भजन असे विविध प्रकारचे कार्यक्रम होतात.

ज्या दिवशी सद्गुरूंनी समाधी घेतली त्याच्या अगोदरच्या रात्री मंदिरात फार मोठा जनसमुदाय उपस्थित राहतो. त्याच दिवशी खिरीचा प्रसाद वाटण्यात येतो. या प्रसादासाठी दूरदूरचे भक्त मुद्दाम आलेले असतात. यंदा गुढीपाडव्यापासून (दि. २ एप्रिल) सद्गुरू श्री जंगली महाराज यांचा १३२ वा पुण्यतिथी उत्सव सुरू झाला आहे. तो १५ एप्रिलपर्यंत चालणार आहे. संतांचे विचार खऱ्या अर्थाने आचरणात आणणाऱ्या आणि या विचारांच्या प्रचार, प्रसारासाठी आयुष्य वेचणाऱ्या श्री सद्गुरू जंगली महाराज यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *