अन्नदानाची शिकवण देणारे

श्री रामानंद बीडकर महाराज

निस्सीम दत्तभक्‍त, स्वामी समर्थांचे शिष्य आणि ईश्‍वरसाधक अशी श्री रामानंद महाराज बीडकर यांची ओळख आहे. पुणे शहरात शनिवार पेठेतून ओंकारेश्‍वरकडे जाताना डाव्या बाजूला रामानंद बीडकर महाराज मठ असे लिहिलेली इमारत दिसते. तीच बीडकर महाराज यांची समाधी. आज महाराजांची पुण्यतिथी.

“अत्तराचे व्यापारी, झाले संत अधिकारी
कथा बीडकर महाराजांची, ऐका सारे तुम्ही न्यारी…”
असेही काव्य श्री रामानंद महाराज यांची महती सांगण्यासाठी गायले जाते.

लहान वयातच पंढरपूर पायी वारी
अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तप्रभूंचे तिसरे अवतार मानले जातात. त्यांच्या काही प्रमुख शिष्यांच्या पंक्‍तीत आणखी सत्पुरूष म्हणजे श्री रामानंद बीडकर महाराज. यांचा जन्म १८३९ मध्ये झाला. वडील बळवंतराव हे ब्रिटिश आमदनीत अधिकारी होते. पण, रामानंद महाराज यांच्या बालवयातच वडिलांचे निधन झाले. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होतीच. आई गंगुताई या पुढाकार घेऊन रामानंद यांना घडवत होत्या. दरम्यान, रामानंद हे लहान वयातच पायी वारी करत पंढरपूरच्या यात्रेसाठी रवाना झाले. परंतु, त्यावेळेस पांडुरंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली. तेथील पुजाऱ्यांनी रामानंद यांना गर्दीबाहेर खेचले आणि थेट गर्भगृहात नेऊन पांडुरंगाचे दर्शन त्यांना घडविले.

धन-संपत्तीचा वीट
वडिलांच्या निधनामुळे कुटुंबापुढे आर्थिक संकट उभे होते. त्यावर उपाय म्हणून शालेय शिक्षण संपल्याबरोबर त्यांनी जवाहिर आणि सुगंधी द्रव्याचा व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांना चांगले यश मिळत होते. पुरेशी संपत्ती पदरी होती. पण, कालांतराने त्यांना धन-संपत्ती-ऐश्‍वर्याचा वीट आला. त्यानंतर ते आध्यात्मकडे वळले आणि हनुमानाची उपासना सुरू केली. त्यावेळी झालेल्या दृष्टान्तानुसार ते थेट अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांच्याकडे शिष्यत्त्व पत्करण्यासाठी गेले. तेथे स्वामींनी त्यांची कठोर परीक्षा घेतली. त्यात बीडकर महाराज उत्तीर्ण झाले.

नर्मदा परिक्रमा पूर्ण केली
पुढे श्री स्वामी समर्थांनी रामानंद बिडकर यांना नर्मदा परिक्रमा करा, पण सोबत दोन पंचांव्यतिरिक्त अन्य काहीही साहित्य न्यायचे नाही, असा आदेश दिला. त्या काळी नर्मदा परिक्रमा अत्यंत कठीण होती. त्यात वारा, ऊन, पाऊस, थंडी यांना तोंड देत, तसेच अनवाणी राहून परिक्रमा पूर्ण केली. प्रवासात कधी अन्न मिळत असे, तर कधी नाही. परिक्रमेत अनेक हिंस्त्र पशूंनाही ते सामोरे गेले. परिक्रमेमध्ये त्यांना अनेक यात्रेकरूंची भेट झाली. शेवटी खडतर अशी अडीच वर्षांची परिक्रमा पूर्ण झाली.

भुकेलेल्यांना अन्न द्यावे
अतिशय उच्च पातळीवरचे अनुभव त्यांनी आपल्या शिष्यांना दिले. शिष्यांच्या आध्यात्मिक आणि भौतिक पुनरुत्थानाचे कार्य केले. भुकेलेल्यांना अन्न द्यावे अशी त्यांची शिकवण होती. त्यांचे अनेक चमत्कारही सांगितले जातात.

पुण्यात मठाची स्थापना
नर्मदा परिक्रमा झाल्यानंतर बीडकर महाराज हे पुणे येथे परत आले. पुढे बरीच वर्षे महाराज पुण्यातच राहिले. श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेवरून त्यांनी पुणे येथे मठ स्थापन केला. ईश्‍वरभक्‍तीच्या कार्यास त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. असे हे महान दत्तभक्त, सिद्धयोगी रामानंद महाराज हे आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे. तिथीनुसार फाल्गुन कृष्ण दशमी, १ एप्रिल १९१३ रोजी समाधिस्त झाले. महाराजांची समाधी शनिवार पेठ, पुणे येथे आहे. नुकताच समाधी स्थानाचा जीर्णोद्धार करण्यात आला. दत्तमंदिराच्या स्वरूपात नाशिकलाही बीडकर महाराजांचे स्मारक आहे. रामानंद बीडकर महाराज यांच्या पवित्र पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन.🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *