स्वामी विवेकानंद यांचे गुरू

स्वामी रामकृष्ण परमहंस

थोर तत्त्वज्ञ, तपस्वी आणि गाढे अभ्यासक अशी स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण विश्‍वाला ओळख आहे. अशा महान व्यक्‍तीचे गुरू म्हणजे स्वामी रामकृष्ण परमहंस.

‘परमहंस’ ही रामकृष्णांना मिळालेली पदवी आहे. महान संत, आध्यात्मिक गुरू आणि विचारवंत अशी स्वामीरामकृष्ण परमहंस यांची मूळ ओळख. सर्वधर्म समभाव, सर्व समाजाचे ईश्‍वर आणि त्यांचे विचार सारखेच आहेत, अशी रामकृष्णांची शिकवण राहिली आहे. सर्व धर्मीयांसाठी त्यांचा ‘जतो मत, ततो पथ’ म्हणजेच ‘जितकी मतं, तितके पंथ’ हा उपदेश सहिष्णुतेचे प्रतीक मानला जातो.

काली मंदिराचे मुख्य पुजारी
स्वामी रामकृष्ण परमहंसांचा जन्म फाल्गुन शुद्ध द्वितीया अर्थात १८ फेब्रुवारी १८३६ रोजी पश्‍चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील कामरपुकूर गावी झाला. त्यांच्या बालपणीचे नाव गदाधर असे होते. वडिलांचे नाव खुदिराम तसेच आईचे नाव चंद्रादेवी असे होते. सतत प्रयत्न करूनही रामकृष्ण यांचे मन अभ्यास आणि अध्यापनात गुंतू शकले नसे. त्यांचे मोठे बंधू रामकुमार १८५५ मध्ये दक्षिणेश्‍वर काली मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून नियुक्त करण्यात आले. रामकृष्ण आणि त्यांचा भाचा मिळून रामकुमार यांना मंदिरात मदत करू लागले. रामकृष्ण यांना काली मंदिरात देवीचा पुतळा सजवण्याची जबाबदारी होती. १८५६ मध्ये रामकुमार यांच्या मृत्यूनंतर रामकृष्ण यांना काली मंदिराचे पुजारी म्हणून नेमले गेले. रामकुमार यांच्या निधनानंतर रामकृष्ण परमहंस हे अधिक ध्यानधारित झाले.

जात्याभिमान दूर करण्याचे प्रयत्न
रामकृष्णांना विवाहबंधनात अडकवावे अशी त्यांची आई व भाऊ रामेश्‍वर यांची इच्छा होती. त्यांचा विवाह शारदामणी यांच्याशी झालेला असला, तरी लौकिक अर्थाने रामकृष्णांनी वैवाहिक जीवन स्वीकारले नाही. विवाहानंतर पुन्हा त्यांनी मंदिराचे कामकाज पाहायला सुरुवात केली. या काळात त्यांची अध्यात्माचे सखोल ज्ञान घेण्याची इच्छा वाढली. खोटा जात्याभिमान दूर करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. मंदिरात सेवेकरी म्हणून सामान्य व्यक्‍तींची नेमणूक केली. सोन्या-चांदीची नाणी ते मातीत मिसळत असत. जवळचे पैसे नदीत फेकत असत. त्यांचे हे वर्तन काही लोकांना वेडसरपणाचे वाटे.

वैष्णव भक्‍तिपंथाचा अभ्यास
वैष्णव भक्तिपंथात ईश्वराबद्दलच्या प्रेमाविषयी पाच भावांचा उल्लेख आहे. यात शांत, दास्य, सख्य, वात्सल्य आणि मधुर श्रीरामकृष्णांनी या भावांचा अभ्यास केला. कालीदर्शन आणि विवाहाच्या दरम्यानच्या काळात रामकृष्णांनी दास्यभावनेने साधना केली होती. स्वतःस हनुमान मानून प्रभू रामचंद्राची त्यांनी आराधना केली.

इस्लाम आणि ख्रिश्‍चन धर्माचाही अभ्यास
रामकृष्ण यांच्या ‘परमहंस’ या पदवीबाबत अनेक तर्क लावले जातात. जी व्यक्‍ती आपल्या इंद्रियांवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवते, ज्या व्यक्तीकडे ज्ञानाचे अमाप भांडार आहे, त्यांना ही पदवी दिली जाते, असे सांगितले जाते. रामकृष्णांकडे दोन्ही गोष्टी होत्या. त्यामुळे त्यांना परमहंस ही उपाधी देण्यात आली. गुरू तोतापुरी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून रामकृष्ण हे ‘परमहंस’ पदाला प्राप्त झाले. रामकृष्णांनी हिंदू धर्मासोबतच इस्लाम तसेच ख्रिश्‍चन धर्म जगाच्या कल्याणासाठीच असल्याचे मत मांडले होते. काही दिवस त्यांनी त्या धर्मांचे आचरण केल्याचीही नोंद आहे. त्यांनी बायबल या ग्रंथाचाही अभ्यास केल्याचे सांगितले जाते.

समाजाला अनेक उपदेश
स्वामीरामकृष्ण परमहंस हे एक सिद्धहस्त व्यक्तिमत्त्व होते. त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. इंद्रियांवर विजय मिळवल्यानंतर एक महान तत्त्वज्ञ आणि विचारवंतांप्रमाणे त्यांनी समाजाला अनेक उपदेश केले. रामकृष्णांच्या ज्ञानाच्या प्रभावामुळेच सामान्य असलेल्या नरेंद्र नावाचा युवक पुढे स्वामी विवेकानंद नावाने जगविख्यात झाला. आपल्या गुरुंच्या स्मरणार्थ विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. बेलूर येथील मठाद्वारे याचे संचालन केले जाते. विवेकानंद रामकृष्णांना ठाकूर असे संबोधायचे. विवेकानंदांप्रमाणे अनेक शिष्य रामकृष्णांनी घडवले. या शिष्यांनी समाजासाठी मोठे कार्य केले. इसवीसन १८८६ मध्ये त्यांनी श्रावणी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे प्रतिपदेवर आपला प्राण सोडला.

रामकृष्णांचा समाजाला संदेश
‘माझा धर्म बरोबर, दुसऱ्यांचा धर्म चूक’ हे मत योग्य नाही. ईश्वर एकच आहे, त्याला वेगवेगळे लोक वेगवेगळ्या नावाने पुकारतात. कोणी म्हणते गॉड, कोणी अल्लाह, कोणी म्हणते कृष्ण, कोणी म्हणते शिव, कोणी म्हणते ब्रह्म. एक-एका धर्माचे एक-एक मत असते, एक-एक पंथ असतो, परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी; जशी नदी नाना दिशांहून येऊन एकाच सागरात विलीन होते.’ असा संदेश रामकृष्णांनी त्याकाळी दिला, जो आजही आपल्याला प्रकाशवाटेकडे घेऊन जातो. रामकृष्णांच्या जीवनकार्यास आणि त्यांच्या विचारांना ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन…🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *