लेक भागीरथीसाठी तुकोबाराय

आले वैकुंठामधून खाली

संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठाला जाण्याने त्यांचे कुटुंब प्रचंड शोकाकुल झाले.
त्याबाबत एक कथा सांगितली जाते –
त्यांची लाडकी कन्या देहूजवळच्याच येलवाडी नावाच्या गावी सासरी होती. तिला तुकोबांचे वैकुंठगमन, उशीरा समजल्याने तिने हृदयद्रावक शोक आरंभला. त्या शोकमय, व्याकुळ अवस्थेतच भागीरथीने इंद्रायणी नदीमधे उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु नदीमधील माशांनी तिला पुन्हा काठावर आणून सोडले. असे तीन वेळा घडले. तिची आर्तता पाहून तुकाराम महाराज तिला भेटण्यासाठी वैकुंठाहून परत आले. त्यावेळी भागीरथीने तुकाराम महाराजांना विनंती केली, ‘तुम्हीं माझ्या घरी येऊन माझ्या हातचे जेवल्याशिवाय ‘मी तुम्हाला जाऊ देणार नाही’ भागीरथीसाठी तुकाराम महाराज तिच्या सासरच्या म्हणजे येलवाडीच्या घरी गेले. घरी गेल्यावर भागीरथीच्या लक्षात आले की घरामधे खाण्यासाठी फक्त शेवया आहेत. त्यांची खीर करण्याकरिता घरात दूधही नाही. दूध आणण्यासाठी पैसेही नाहीत. त्यामुळे भागीरथीच्या डोळ्यांतील अश्रू पाहून संत तुकाराम महाराज म्हणाले, जा आणि येलेश्वराच्या समोर जो दगडी नंदी आहे त्याचे दूध काढून आण. भागीरथी अचंबित झाल्यावर महाराज स्वतः गेले आणि त्यांनी त्या दगडी नंदीचे दूध काढून आणले आणि भागीरथीला दिले.

त्यानंतर भागीरथीने दूध शेवयांची खीर बनविली आणि आपल्या हातांनी तुकाराम महाराजांना खाऊ घातली. संतुष्ट झालेल्या तुकाराम महाराजांनी भागीरथीचा जड अंतःकरणाने निरोप घेतला आणि ते पुन्हा वैकुंठी परतले. म्हणून या दिवशी देहू आणि परिसरात शेवयांच्या खिरीचा प्रसाद बनवतात. जिथून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्या नांदुरकीच्या झाडाजवळ ‘शेवयाचे कीर्तन’ सांगितले जाते आणि त्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी निघते. बापलेकीच्या भेटीचा हा हृद्य प्रसंग लोकप्रतिभेने चितारला आहे.
धन्य भागीरथी माता।
तुज लाडकी लेक तुकाराम संता॥१॥
तारीले भगवंता।
जळी इंद्राराणीसी बुडीता॥ध्रु॥
बाबा गेले कोणे गावा।
भागीरथी करी धावा॥२॥
ऐकुनी भागीरथीचा धावा।
तुका आले रोलवाडी गावा॥३॥
फाल्गुन वद्य पंचमीशी।
तुका आले भेटायाशी॥४॥
रोलेश्वरा ते पुजीले।
दूध नंदीचे काढीले॥५॥
जेवूनी दूध शेवयाशी।
तुका गेले वैकुंठाशी॥६॥
तसेच
बाबा गेले कोण्या गावा।
भागीरथी करी धावा।।
उडी डोहात टाकिली।
वरी मत्स्यांनी झेलिली।।
या चमत्काराचे वर्णनही लोकगीतांतून येते.

लोकांच्या या श्रध्दांची दखल ब्रिटिश सरकारनेही घेतली होती. ब्रिटिश काळापासून मुंबई पोलिस कायद्यानुसार देहूतीलइंद्रायणी नदीत मासेमारीला बंदी आहे. डोहाच्या खालीसुध्दा इंद्रायणी संगमापर्यंत हे माशांना अभयक्षेत्र आहे.
बापलेकीच्या या भेटी दिनाच्या निमित्ताने तुकोबाराय आणि त्यांची लेक भागीरथी चरणी
।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!🙏

(यानिमित्ताने देहू येथील कीर्तन, पालखी पाहा आणि
या दिवसाचे महत्त्व खालील युट्यूबच्या लिंकमधील व्हिडिओमध्ये…

कृपया, सबस्क्राईब करा…🙏)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *