विठ्ठलदास महाराजांची संकल्पना

गोविंदपुरम (तमिळनाडू) : महाराष्ट्रातील पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी हे साऱ्या देशाचे दैवत. अनेक घरांना, दुकानांना, संस्थांना विठ्ठल रुक्मिणीचं नाव दिलेलं दिसतं. अनेक मंदिरांमध्ये त्यांचा जयघोष भजन, कीर्तन सुरू असतं. पण समता, बंधुता, प्रेम आणि ज्ञानभक्तीचा संदेश देणाऱ्या या दैवतांच्या नावाने आता एक भव्य विद्यापीठ उभे राहते आहे. महाराष्ट्रात नव्हे, तर तमिळनाडूमध्ये!

तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी नुकतेच कुंभकोणमजवळील गोविंदपुरम येथे श्री विठ्ठल रुक्मिणी विद्यापीठाचे भूमिपूजन केले. या विद्यापीठात प्रामुख्याने वेदांचे उच्च शिक्षण दिले जाणार आहे. तसेच विविध धार्मिक विषयांवरील पदवी शिक्षण दिले जाणार आहे. देशातील २२ राज्यांमध्ये या विद्यापीठाची महाविद्यालये असणार आहेत.

तमिळनाडूतील प्रसिद्ध विठ्ठलभक्त श्री विठ्ठलदास महाराज यांच्या प्रयत्नातून हे विद्यापीठ आकाराला येत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या नावाने देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचे धार्मिक शिक्षण देणारे विद्यापीठ उभे राहत आहे.

या विद्यापीठाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना
राज्यपाल आर. एन. रवी म्हणाले, ‘वेद हे जगातील ज्ञानाचे सर्वात प्राचीन स्त्रोत आहेत. भारतीय संस्कृती घडविणाऱ्या या वेदांचे आधुनिक काळात पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे’. श्री विठ्ठलदास महाराज यांच्या विद्यापीठ उभारणीसाठीच्या प्रयत्नांचे राज्यपालांनी यावेळी कौतुक केले.

चेन्नई संस्कृत कॉलेजचे प्राध्यापक आर. मणी द्रविड यांनी
विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. वेदांच्या सर्व शाखा तसेच हिंदू धर्माचे मूलभूत आणि उच्च शिक्षण या विद्यापीठातून दिले जाईल. यात आधुनिक शिक्षणाचाही सामावेश केला जाईल, असे द्रविड यावेळी म्हणाले.

१२ एकरवर पसरलेल्या या विद्यापीठांतर्गत वेद महाविद्यालय, श्रुती महाविद्यालय, शास्त्र महाविद्यालय, आगम पाठशाळा, सर्वशाखा वेद विद्यालय, समर्थ प्रयोग पाठशाळा, मॉडर्न स्कूल आदी शैक्षणिक संस्था चालविण्यात येणार आहे.

कार्यक्रमापूर्वी राज्यपालांनी गोविंदापुरम येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रार्थना केली आणि तेथील गायींच्या आश्रयाला भेट दिली. विद्यापीठाचे संस्थापक ब्रह्मश्री विठ्ठलदास महाराज, तंजावरच्या रामकृष्ण मठाचे स्वामी विमूर्तानंद यावेळी त्यांच्यासोबत होते. राज्यपालांनी यानिमित्ताने तंजावरमधील दक्षिण विभागीय सांस्कृतिक केंद्राचीही पाहणी केली.

संत विचारांचा जागर करण्यासाठी १९९८ मध्ये कुंभकोणमपासून ६ किलोमीटरवरील गोविंदपुरम या ठिकाणी पंढरपूरच्या मंदिराप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी करण्यात आली. दक्षिण पंढरीपुरम म्हणूनही या ठिकाणाला ओळखले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *