||ज्ञानबातुकाराम|| न्यूज वेब पोर्टलचे
पुण्यात मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : पंढरपूरच्या आषाढी पायी वारी सोहळ्याचे वार्तांकन करून संत विचार जगभर पोहोचविणाऱ्या वारकरी पत्रकारांचा आज (दि. १६) पुण्यात गौरव होत आहे. ||ज्ञानबातुकाराम|| या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिकातर्फे पत्रकार भवन येथे सकाळी १० वाजता आयोजित कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान होत आहे.

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत डॉ. सदानंद मोरे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ॲड. विकास ढगे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह. भ. प. माणिक महाराज मोरे, देहू संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे, आळंदी संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. अभय टिळक, पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे ट्रस्टचे विश्वस्त ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, संत ज्ञानेश्वर माऊलींचे चोपदार राजाभाऊ आणि रामभाऊ रंधवे तसेच पुणे ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, महाराष्ट्र टाइम्सचे ऑनलाईन संपादक अभिजित कांबळे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या वारीचे वृत्तांकन करणारे गेल्या २५ वर्षांतील पत्रकार यानिमित्ताने एकत्र येत आहेत. यावेळी ||ज्ञानबातुकाराम|| वार्षिकाच्या न्यूज वेब पोर्टलचेही मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

पंढरपूरचा आषाढी पायी वारी सोहळ्याचे वार्तांकन करून संतांचे प्रेम, बंधुभावाचे विचार सर्वत्र पोहोचविणारे पत्रकार संतांचाच वारसा पुढे नेत आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याचा गौरव होणे आवश्यक आहे. यानिमित्ताने लोकार्पण होत असलेल्या ||ज्ञानबातुकाराम|| या वेब पोर्टलच्या माध्यमातून संतविचार, वारी आणि एकूणच धार्मिक क्षेत्रातील घडामोडींची दैनंदिन माहिती दिली जाणार आहे, असे संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी यानिमित्ताने सांगितले.
या सोहळ्याला पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसह वारकरी, नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *