तुकोबारायांच्या मंदिराचे लोकार्पण 
देहू : श्री क्षेत्र देहू येथील शिळा मंदिर हे केवळ भक्ती आणि शक्तीचेच केंद्र नाही, तर ते भारताची संस्कृती घडविणारे आहे. तसेच, संत तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला अखंड उर्जा देणारे, मार्ग दाखवणारे आहेत, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १४) देहूत व्यक्त केल्या. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ वारकरी ह. भ. प. मारुती महाराज कुऱ्हेकर उपस्थित होते. याप्रसंगी देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी पंतप्रधान मोदी यांचा संत तुकाराम महाराज पगडी, उपरणे, चिपळ्या आणि तुकोबारायांची मूर्ती भेट देत सन्मान केला.

यंदा संत ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्त शतकोत्तर संजीवन समाधी सोहळा वर्ष असल्याने त्याचे औचित्य साधून आळंदी संस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई यांनी माऊलींची भव्य मूर्ती भेट देत पंतप्रधानांचा तमाम वारकऱ्यांच्या वतीने सन्मान केला. यावेळी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते.

दरम्यान, कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा तुकोबारायांचा पायी पालखी सोहळा येत्या आठवड्यात आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणार आहे. त्यापूर्वी शिळा मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.

धन्य देहूगाव
पंतप्रधान मोदी म्हणाले, भगवान श्री विठ्ठल आणि सर्व वारकऱ्यांच्या चरणांवर माझे वंदन. आज देहूच्या या पवित्र, तीर्थभूमीवर मला येण्याचे भाग्य लाभले. संतशिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मस्थळ देखील आहे.
धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव
तेथे नांदे देव पांडुरंग
धन्य क्षेत्रवासी लोक ते देवाचे
उच्चारिती वाचे नामघोष
या भावानेने मी देहूतील सर्व नागरिकांना माझ्या माता-भगिनींना आदरपूर्वक नमन करतो. काही महिन्यांपूर्वी मला पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली होती.

त्यापैकी श्री संत ज्ञानेश्वर ममहाराज पालखी मार्गाची निर्मिती पाच टप्प्यांमध्ये होईल आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाची निर्मिती तीन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाईल. या सर्व टप्प्यांमध्ये ३५० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे महामार्ग बनतील आणि त्यावर ११ हजार कोटींपेक्षाही जास्त रुपये खर्च केले जातील. यामुळे परिसर विकासालाही चालना मिळेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा

ते पुढे म्हणाले, आज नशिबाने मला पवित्र शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी देहूत येण्याची संधी मिळाली. ज्या शिळेवर स्वत: संत तुकारामांनी १३ दिवस तपस्या केलेली आहे, जी शिळा संत तुकारामांच्या बोध आणि वैराग्याची साक्ष बनलेली आहे, मी असे मानतो, की ती केवळ एक शिळा नाही, ती तर भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा आहे. या पवित्र ठिकाणाची पुर्ननिर्मिती केल्याबद्दल मी मंदिर विश्वस्त आणि सर्व भक्तांचे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो.

आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. प्राचीन काळापासून मानवतावादी विचारधारा जोपासणारा देश म्हणून आपली ओळख आहे, ती केवळ संत परंपरेमुळे आहे. आजदेखील आपला देश या सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जात आहे, असेही पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले.

देशात पर्यावरण, जलसंरक्षण, सेंद्रिय शेती आदींसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे आहे. आपल्या अध्यात्मिक परंपरांशी हे विषय जोडावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ओम श्रीश दत्तोपासक यांनी संपादीत केलेल्या संत चोखामेळा सार्थ अभंग गाथेचे प्रकाश करण्यात आले.

देहू शेजारील माळवाडी येथील लष्कराच्या मैदानावर आयोजित मोदी यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. त्यात वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *