दोन वर्षांनी १० लाख भाविकांची गर्दी

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : तब्बल दोन वर्षानंतर दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेसाठी आज (दि. १६) सुमारे १० लाख भाविक कोल्हापुरातील श्री जोतिबा डोंगरावर जमले आहेत. ढोल-ताशाचा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या गजराने परिसर दुमदुमून गेला आहे.

सासनकाठ्या नाचविण्याचा योग
दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबाच्या चैत्र यात्रेचा आज (दि. १६) मुख्य दिवस असून कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबाच्या चैत्र यात्रेला प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र कोरोना निर्बंध मुक्त झाल्यानंतर जोतिबाच्या चैत्र यात्रेत दोन वर्षांनंतर सासनकाठ्या नाचवण्याचा योग आला आहे.

डोंगरावर पाडळी (निनाम ) सातारा, विहे-पाटण, किवळ-कराड, कसबे डिग्रज,मिरज, कसबा सांगाव, दरवेश पाडळी, मनपाडळे, सांगलवाडी यांच्यासह इतर मानाच्या सर्व सासनकाठ्या मूळमाया यमाई मंदिर परिसरात दाखल झाल्या. यावेळी त्यांचे स्वागत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, अधिक्षक दीपक मेहतर तसेच देवस्थानचे कर्मचारी यांनी केले. त्यांना मानाचा विडा दिला. त्यानंतर या सासनकाठ्या शासकीय विश्रामगृह नवीन वसाहत पाणीटाकी मार्गे दक्षिण दरवाजातून मुख्य मंदिरात गेल्या. बिगर मानाच्या सासनकाठ्यांना मंदिरात प्रवेश दिला गेला नाही.

रस्ते गेले भाविकांनी फुलून
कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाट, वडणगे, निगवे, कुशीरे, पोहाळे, गिरोली, दाणेवाडी या भागातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. हलगी, सनई, पिपाणीच्या सुरांमध्ये सासनकाठ्या नाचत डोंगराकडे रवाना झाल्या. या भागातील ग्रामस्थांनी भाविकांना पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता तसेच प्रसादाची व्यवस्था केली.

खोबरेवाट्या, केमिकल गुलालावर बंदी
यात्रेत यंदाही खोबऱ्याच्या वाट्या फेकण्यास बंदी आहे. व्यापारी दुकानदार यांनी खोबरेवाटीचे तुकडे करून विकणे बंधनकारक आहे. यंदा प्रथमच केमिकलयुक्त गुलाल विक्रीवर बंदी आणली आहे. स्वच्छ आणि सुगंधी गुलाल विक्रीसाठी ठेवण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत.

शुद्ध पाणी आणि अन्नदान
भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा म्हणून गायमुख तलावात १ कोटी लिटर पाणीसाठा केला आहे. या पाण्याचे शुद्धीकरण केले आहे. कोल्हापुरातील आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डोंगरावर तीन दिवस मोफत अन्नछत्राचे आयोजन केले आहे.

कडक सुरक्षा व्यवस्था
यात्रेसाठी डोंगरावर कडक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. जलद कृती, दल व्हाईट आर्मी तसेच सेवाभावी संस्थांचे जवान यांची पथके डोंगरावर सज्ज आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी डोंगरावर यात्रेची पाहणी केली आहे. सलग चार दिवस शासकीय सुट्टी असल्यामुळे यंदाच्या यात्रेत गर्दीचा उच्चांक वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.