देहू नगरपंचायतीच्या पहिल्याच

सर्वसाधारण सभेत झाला ठराव

देहू : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे गाव असलेल्या देहूमध्ये मांस आणि मासे विक्री करण्यास पुन्हा एकदा बंदी घालण्यात आली आहे. १ एप्रिल २०२२ पासून या बंदीची अंमलबजावणी होणार आहे. याबाबतचा ठराव नव्याने अस्तित्वात आलेल्या देहू नगरपंचायतीच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत करण्यात आला आहे.

राज्यातून तसेच इतर राज्यांतून संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी वारकरी देहूत येतात. वारकर्‍यांना मांस-मासे वर्ज्य असतात. त्यामुळे देहूत आल्यावर त्यांच्यात वेगळा संदेश जाऊ नये म्हणून यापूर्वीच मांस आणि मासे विक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच्या अंमलबजावणीचा ठराव नगरपंचायतीने नुकताच केला. वारकर्‍यांच्या आलेल्या तोंडी तक्रारीनंतर हा ठराव घेण्याचे ठरवले. त्यानुसार देहूमध्ये शुक्रवारपासून (दि. १) मांस-मासे विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. या ठरावानुसार मांस, मासे विक्री करताना कोणी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देहू नगरपंचायतीने दिला आहे. सध्याच्या देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांच्या सासू म्हणजेच सुमन चव्हाण देहू ग्रामपंचायतीच्या सरपंच असताना त्यांनीही १९९९मध्ये अशाच प्रकारे मांस-मासे विक्रीवर बंदी घातली होती.

याबाबत बोलताना स्मिता चव्हाण म्हणाल्या, “श्री क्षेत्र देहू हे संत तुकोबारायांचे गाव आहे. देहूत होणारी मांस, मासे विक्री ही गोष्ट जे वारकरी येतात, त्यांना खटकणारी गोष्ट होती. त्यामुळे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत मांस-मासे विक्रीसाठी बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला. परंतु घरी कोण खातेय किंवा बाहेर जाऊन कोण खात आहे, यावर बंदी घालणे शक्य नाही. किमान बाहेरून येणार्‍या वारकर्‍यांना तरी देहूत मांस, मासे विक्री करताना आढळू नये, ही त्यामागची भूमिका आहे. गावकुसाजवळ तसेच काही जणांनी गावातही मांस-मासे विक्री करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे नगरपंचायतीने विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *