पालखीचा सातारा जिल्हा प्रवेश;

आजपासून लोणंदमध्ये मुक्काम

नीरी भिवरा पडता दृष्टी।
स्नान करता शुद्ध सृष्टी।।
असे नीरा, भीमा नद्यांच्या दर्शनाचे आणि स्नानाच्या पुण्याचे वर्णन संत नामदेवरायांनी केले आहे. हीच पुण्यपर्वणी आज (दि. २८ जून) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने हजारो वारकऱ्यांच्या सोबत तब्बल दोन वर्षांनी साधली. वाल्हे मुक्कामाहून निघालेल्या माऊलींच्या पादुकांना आज नीरा नदीच्या दत्त घाटावर पवित्र सचैल स्नान घालण्यात आले.रिमझिम पाऊस आणि उत्साह

‘माऊली माऊली’च्या घोषात, रिमझिम पावसात पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे आणि आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी घाटावरून माऊलींच्या पादुका नदीत घाटावर नदीत नेल्या. टाळ-मृदंगाच्या गजरात माऊलींना नीरास्नान घालण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनीही नीरास्नानाचा आनंद लुटला.

सकाळी अकरा वाजता वाल्हे मुक्कामाहून निघालेल्या पालखी सोहळ्याचे नीरा येथे आगमन झाले. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालखी सोहळ्याचे मोठे स्वागत करण्यात आले. सरपंच तेजश्री काकडे,उपसरपंच राजेश काकडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पालखीसोहळा नदीकाठच्या विसाव्याच्या ठिकाणी विसावला. तळावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी यावेळी मोठी गर्दी केली.

पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात

दुपारचे भोजन आणि विसावा झाल्यानंतर दुपारी एक वाजता माऊलींच्या पालखी सोहळ्याने नीरा नदीपलिकडे म्हणजेच पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. पूर्वी कोळी समाज पालखीला नदी पार करण्यासाठी मदत करायचा. त्यामुळे त्यांनाही या नीरास्नानाच्या वेळी मान आहे. पूर्वी नीरा नदीवर पूल नव्हता. त्यामुळे माऊलींची पालखी शिरवळमार्गे लोणंदला जात असे. परंतु नीरा नदीवर वाल्ह्याचे अभियंता कृष्णराव मांडके यांनी त्याकाळी श्रद्धेपोटी पूल बांधला. अजूनही तो जुना पूल म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या मांडके घराण्याला पालखीला पंखा हलविण्याचा मान दिला गेला आहे. या वारीच्या काळात इंद्रायणी, नीरा आणि चंद्रभागा अशा तीन पवित्र नद्यांमध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घातले जाते.

नीरा या गावीच पालखीचा पुणे जिल्ह्यातील प्रवास संपतो. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी माऊलींच्या पालखीला निरोप देण्यासाठी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पलिकडील तीरावर नीरास्नान उरकून निघालेल्या माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पाडेगावच्या हद्दीत सातारा जिल्ह्याचे प्रशासन अधिकारी आणि नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात उत्साही स्वागत केले.

माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आजपासून अडीच दिवसांचा लोणंद या गावात मुक्काम असणार आहे.

(फोटो : शिवराज तलवार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *