पुणे : बदलत्या काळाशी अनुरूप असे बदल आपल्या साहित्य, संस्कृतीमध्ये, रोजच्या जगण्यात व्हावेत. याच विचारांनुसार तयार झालेला ‘बा तुकोबा’ हा संत तुकाराम महाराजांवरील विशेषांक तुकोबांची नव्या पिढीला नव्याने ओळख करून देईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी येथे केले.

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी संपादीत केलेल्या ।।ज्ञानबातुकाराम।। या वार्षिक अंकाच्या ‘बा तुकोबा’ या संत तुकाराम महाराज विशेषांकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. देहूजवळील भामचंद्र डोंगर या संत तुकारामांच्या तपोभूमीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे, पत्रकार, वारकरी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘पाश्चात्य कालगणनेसारख्या गोष्टी आपण स्वीकारल्या. पोर्तुगिजांनी आपल्याकडे पाव आणला. आपण त्याचा ‘वडापाव’ केला. ‘मिराशी’ हा तुकोबारायांनी अभंगात वापरलेला शब्द पर्शियन आहे. म्हणजेच देशी संस्कृती सांभाळून किंवा तिचा पाश्चात्य चांगल्या गोष्टींशी मिलाफ करून आपण आपले जगणे समृध्द करू शकतो’, असे डॉ. मोरे म्हणाले. नव्या काळात नव्या पिढीसमोर संत तुकाराम महाराज आणि सर्वच संतांचे दिशादर्शक विचार पोहोचणे गरजेचे आहे.

ते काम ।।ज्ञानबातुकाराम।। सारख्या वार्षिकातून होईल. त्यामुळे अशा उपक्रमांना आपण पाठींबा द्यावा, असे आवाहनही डॉ. मोरे यांनी यावेळी केले.

पाश्चात्य गोष्टीही आपण आपल्या पद्धतीने बदल करून स्वीकारल्या. उदा.  वारकरी परंपरेत ज्ञानेश्वर माउलींच्या ज्ञानेश्वरीवर प्रवचन केले जाते. आता तुकाराम महाराजांच्या गाथेवरही प्रवचन होण्यास हरकत नसावी. ते पुढे म्हणाले, वैकुंठवासी निवृत्ती महाराजांनी निस्वार्थपणाने संतसेवा केली. त्यांचीच परंपरा डॉ. श्रीरंग गायकवाड आणि कुटुंबीयांनी पुढे चालविली आहे. यावेळी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रकाशनापूर्वी उपस्थितांनी भामचंद्र डोंगरावर जाऊन तुकोबारायांच्या ध्यान स्थानाचे दर्शन घेतले. या ठिकाणी महेश म्हात्रे यांनी तुकाराम महाराजांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. तर, डॉ. श्रीरंग गायकवाड आणि ह. भ. प. दत्तात्रय महाराज ढोणे यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे गायन केले. प्रकाशनानंतर भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी आईनाना प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
दर १ जानेवारीला नवे वर्षे तुकाराम महाराजांच्या सान्निध्यात सुरू करण्याचा निश्चय यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. आभार प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.