पालखी मार्गावर समूहशिल्प

आळंदी : महाराष्ट्रात १३ व्या शतकामध्ये वारकरी चळवळीने मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवली. या क्रांतीचे शिल्पकार होते, संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली. पंढरपूरचे नामदेव महाराज आळंदीत येऊन माऊलींनी भेटले आणि दोघांच्या विचार समन्वयातून समाजात समतेची चंद्रभागा वाहू लागली. त्यांची ही ऐतिहासिक भेट जिथे झाली त्या ठिकाणी त्यांच्या भेटीचे भव्य समूहशिल्प उभे राहत आहे.

आळंदीजवळच्या पालखी मार्गावर उभी राहत असलेली ही संतसृष्टी लाखो भाविक, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान ठरणार आहे.

आषाढी एकादशीसाठी संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची पालखी आळंदीतून पुण्याकडे निघते. आळंदीजवळच्या वडमुखवाडी येथे पालखीचा पहिला विसावा होतो. याच ठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पुढाकारातून ही भव्य संतसृष्टी उभारली जात आहे. यात प्रामुख्याने संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत श्री नामदेव महाराज यांच्या भेटीचे समूहशिल्प साकारले जात आहे.

गेल्या सात वर्षांपासून हे काम सुरू आहे. या समूहशिल्पात एकूण २५ मूर्तींचा समावेश असून संत नामदेव महाराज यांची मूर्ती सर्वांत उंच असेल. तीदेखील नुकतीच स्थानापन्न करण्यात आली आहे. ब्रॉंझ धातूपासून घडवण्यात आलेल्या या मूर्तीची उंची २१ फूट आहे.

…म्हणून समूहशिल्प उभारणीचा प्रयत्न
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने जातो. या मार्गावर निगडी येथे संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीवर आधारित भक्ती-शक्ती शिल्पसमूह महापालिकेने उभारले आहे. याच धर्तीवर आळंदी-पुणे पालखी मार्गावर वडमुखवाडी येथील पादुका मंदिर परिसरालगत संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित शिल्पसमूह उभारले जात आहे.

सहा मूर्तींची उंची वाढवली
माऊलींचा पालखी सोहळा आषाढीवारीला वडमुखवाडी येथील पादुका मंदिरात थांबतो. या मंदिरालगतच्या विस्तीर्ण जागेवर संतभेटीचे समूहशिल्प साकारण्यात येत आहे. अगदी दूर अंतरावरून मूर्ती दिसाव्यात, यासाठी सहा मूर्तींची उंची वाढवण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी सुचवले बदल
या शिल्पातील प्रत्येक मूर्तीचे वजन आणि उंचीची पडताळणी राज्य सरकारच्या कला संचालनालयाने केली आहे. सुरुवातीला समूह शिल्पासाठी महापालिकेने सव्वा कोटी रुपयांची तरतूद केली होती. तर, कला संचलनालय अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली. त्यात त्यांनी काही बदल सुचवले. दरम्यान, या प्रकल्पात मूर्तींसोबतच ऍम्फी थिएटर आणि गार्डनही साकारण्यात येत आहे.

पंढरीचा प्रेमा घरा आला
शके १२१२ च्या कार्तिक महिन्यात निर्जीव भिंतीस चालवून संत ज्ञानेश्वर योगी चांगदेवांना सामोरे गेले. त्याप्रसंगी चांगदेवांनी मुक्ताईचा अनुग्रह घेतला. या घटनेनंतर संत नामदेव-संत ज्ञानदेवांची भेट झाली. त्यावेळी नामदेवराय ज्ञानदेवांपेक्षा मोठे म्हणजे २० वर्षांचे असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे.

संत निवृत्तीनाथांनी नामदेवांना प्रेमभराने आलिंगन दिले आणि या सर्वांनी वैचारिक चर्चा केली. नाथ आणि वारकरी, वारकरी आणि लिंगायत अशा इतर पंथांच्या समन्वयाची नीती ठरविली गेली. त्यानंतर संत नामदेव औंढा नागनाथ येथे गेले आणि त्यांनी लिंगायत गुरू विसोबा खेचर यांचे शिष्यत्त्व पत्करले. पुढे तीर्थावळीच्या निमित्ताने संत नामदेव आणि ज्ञानेश्वर माऊलींनी देशभ्रमण केले. देशाला विठुरायाचा समता, बंधुता आणि प्रेमाचा संदेश सांगितला.

संत बहिणाबाईंनी “ज्ञानदेवे रचिला पाया” आणि “नामा तयाचा किंकर तेणे केला हा विस्तार”, अशी मानवतेसाठी या दोन्ही संतांनी केलेल्या कार्याची नोंद आपल्या “संतकृपा झाली इमारत फळा आली” या आपल्या अभंगात करून ठेवली आहे. या दोन महान संतांच्या या कालातीत कार्याची साक्ष आळंदीजवळील हे शिल्प देत राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *