।।ज्ञानबातुकाराम।। वार्षिकाची

वर्गणी स्विकारण्यास प्रारंभ

पुणे : ।।ज्ञानबातुकाराम।। या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिक अंकातर्फे यंदा ‘संत तुकाराम महाराजांचे टाळकरी’ या विषयावरचा विशेषांक प्रकाशित होणार आहे. त्यासाठीची वार्षिक वर्गणी स्विकारणे सुरू केले आहे, अशी माहिती या वार्षिकाचे संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी दिली आहे.

सूर्ये आधिष्ठीली प्राची। जगा जाणिव दे प्रकाशाची।।
तैसी श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।। अशी ‘ज्ञानाची दिवाळी’ साजरी करण्याचं आवाहन संत ज्ञानेश्वर माऊली आणि सर्वच संतांनी केले आहे. संतांचा हाच ज्ञानवारसा आपण सर्वजण पुढे नेत आहोत. ।।ज्ञानबातुकाराम।। या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिकाची सुरुवात हा त्याचाच एक भाग असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. गेली दोन वर्षे अंकाचे वार्षिक सभासद होण्याबाबत वाचकांकडून विचारणा होत होती. त्याला प्रतिसाद देत यंदापासून वार्षिक वर्गणी स्विकारणे सुरू केल्याचे डॉ. गायकवाड यांनी नमूद केले.

याबाबत ते पुढे म्हणाले, भामचंद्र डोंगराच्या वारीचे यंदाचे चौथे वर्ष आहे. संत तुकोबारायांना देहूजवळच्या याच डोंगरावर आत्मसाक्षात्कार झाला. आपल्याजवळची गहाणखते इंद्रायणीत सोडून देऊन त्यांनी पहिली शेतकरी कर्जमाफी केली. त्यानंतर आपल्या हृदयात उत्पन्न झालेली करुणा, मानवता ते आपल्या लेखणी-वाणीतून पेरत राहिले. माणुसकीची हीच बीजे आपल्यातही रुजावीत, म्हणून नव्या वर्षाची सुरुवात तुकोबारायांच्या डोंगरावर, त्यांच्या सहवासात सुरू करण्याचा उपक्रम आम्ही सुरू केला. संत विचारांचे हे पीक सर्वत्र बहरून यावे म्हणून ।।ज्ञानबातुकाराम।। हा वार्षिक अंकही सुरू केला.

या वार्षिकातर्फे संत तुकाराम महाराजांवर पहिला विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला. त्याचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष, तुकोबारायांचे थेट वंशज आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. तर, या वार्षिकाचा दुसरा अंक तुकोबारायांच्या शिष्या संत बहिणाबाई यांच्यावर प्रसिद्ध करण्यात आला. त्याचे प्रकाशन देहू, आळंदी, सासवड, मुक्ताईनगर, भंडारा डोंगर, टाळगाव चिखली, शनी शिंगणापूर येथील देवस्थान विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सदानंद मोरे आणि माजी आमदार उल्हासदादा पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

संत तुकाराम महाराजांना त्यांच्या १४ टाळकऱ्यांनी आयुष्यभर साथसंगत केली. त्यांच्यामुळेच तर खऱ्या अर्थाने इंद्रायणीत बुडालेली तुकोबांची अभंगगाथा तरली. लोकांनी स्मृतीत ठेवलेले तुकोबांचे अभंग या त्यांच्या सोबत्यांनी पुन्हा लिहून काढले. जनमानसांत नव्याने पोहचवले. या टाळकऱ्यांसोबतच तुकोबांचे कुटुंबीय, समकालीन मित्र, उत्तरकालीन अनुयायी, तुकोबांवर लिहिले गेलेले साहित्य, त्यांच्या नावे सुरू असणारे विविध उपक्रम असा विविधांगी आणि संशोधन मूल्य असलेला मजकूर यंदाच्या अंकात वाचायला मिळेल. या अंकाचे प्रकाशन १ जानेवारी २०२४ रोजी तुकोबारायांच्या तपोभूमीत घोराडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी, टाळकऱ्यांच्या वंशजांच्या हस्ते होणार आहे, असेही डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

मुळात सर्व वारकरी संतांनी समूहभक्ती सांगितली आहे. ‘एकमेकां सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ।।’ असे तुकोबारायांनी याबाबत सांगितले आहे. त्यामुळे वार्षिक वर्गणीतून अंकाच्या छपाईला मदत होईलच; परंतु १ जानेवारीला डोंगरावर जाणे, तिथले चहापाणी, नाश्ता, जेवण आणि कार्यक्रमासाठीही हातभार लागेल. त्यामुळे सर्वांनी या अंकाचे वार्षिक सभासद व्हावे, तसेच १ जानेवारीला तुकोबाराय ज्या डोंगरावर साधना करत असत, त्या घोराडेश्वर डोंगरावर यंदा यावे, असे आवाहनही डॉ. गायकवाड यांनी केले आहे.

या सर्व उपक्रमांबाबत सोशल मीडियावरून वारंवार अपडेट देण्यात येणार आहे. आपण 9833661443 या नंबरवर गूगल पे, फोन पे वगैरे करू शकता. अथवा सोबत दिलेला क्यूआर कोडही स्कॅन करू शकता. कृपया वर्गणी दिल्यानंतर सोबत आपले नाव, नंबर, पत्ताही पाठवावा. आपल्या प्रियजनांच्या स्मरणार्थ हजारांच्या पटीत देणगी दिल्यास, त्यांचे फोटोही अंकात छापण्यात येतील, असेही टीम
।।ज्ञानबातुकाराम।।तर्फे यानिमित्ताने स्पष्ट करण्यात आले आहे.

(छायाचित्रे : ज्ञानेश्वर वैद्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *