संत कबीर यांची परंपरा

चालवणारे संत शेख महंमद

“ज्ञानियाचा एका, नामयाचा तुका आणि कबिराचा शेखा” अशी परंपरा वारकरी संप्रदायात सांगितली जाते. म्हणजे संत ज्ञानदेवांची ज्ञानाची परंपरा संत एकनाथांनी पुढे नेली, संत नामदेवांची प्रबोधनाची परंपरा संत तुकाराम महाराजांनी कळसाला नेली, तर संत कबिरांनी घातलेली बंधुभावाची वीण संत शेख महंमद यांनी घट्ट केली.

बालपणीच झाले ऐक्याचे संस्कार
वारकरी संप्रदायात अत्यंत पूजनीय स्थान असणारे संत शेख महंमद मूळचे बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा गावचे. त्यांच्या वडिलांचे नाव राज महंमद, तर आईचे नाव फुलाई होते. १५६० मध्ये शेख महंमद यांचा जन्म झाला. राज महंमद धारूरच्या किल्ल्यावर हवालदार म्हणून बादशहाचे पदरी नोकरीस होते. वारकरी संप्रदायाचा प्रचार, प्रसारासाठी पुढे आयुष्य वाहून घेतलेल्या संत शेख महंमद यांच्यावर त्यांच्यावर लहानपणी सुफी, दत्त, नाथ या संप्रदायाचे संस्कार झाले होते. संत एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दन स्वामी यांचे गुरू चाँद बोधले होते. हे चाँद बोधलेच संत शेख महंमद यांचे गुरू होते. म्हणजे जनार्दन स्वामी आणि शेख महंमद गुरुबंधू होत.
मालोजीराजे यांचे गुरू
श्रीगोंदे गाव पूर्वी चांभारगोंदे म्हणून ओळखले जायचे ते येथील चर्मकार समाजातील थोर संत गोविंद चांभार यांच्यामुळे. नगरच्या निजामशाहीत छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे हे कर्तबगार सरदार होते. मालोजीराजेंकडे मकासा म्हणून हा प्रदेश होता. त्यामुळे त्यांचा संत गोविंद यांच्याशी परिचय होता. त्यांच्यामुळे मालोजीराजांना प्रतिभावंत लेखक, प्रवचनकार शेख महंमद यांची महती कळली आणि ते शेख महंमद यांना १५९५मध्ये श्रीगोंद्यात घेऊन आले. त्यांनी शेख महंमद यांना गुरू मानले. त्यांना मठ बांधून दिला. मठासाठी जमीन इनाम दिली आणि त्यांच्या सान्निध्यात वर्षभर राहिले. मालोजी राजे यांनी शेख महंमद यांना दिलेल्या इनामपत्रात म्हटले आहे, “तुम्ही आमचे गुरू आहात व आपण तुमचे शिष्य आहो. म्हणून पाच चाहूर खरेदी जमिनीतून बारा बिघे इमान तुम्हास मुकर्रर दिला असे, यास जर कोणी दावा करील तर त्यास आपण वारू.” पुढे औरंगजेबही मराठ्यांच्या पाडावासाठी दक्षिणेत आला, तेव्हा त्याने वाहिरा येथे भेट देऊन बाबांच्या कार्याची माहिती घेतली. शेख महंमद महाराजांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन औरंगजेबाने तब्बल चारशे एकर जमीन बाबांच्या कार्यासाठी दिल्याचा उल्लेख ऐतिहासिक दस्तऐवजांत सापडतो.

नाही सोवळे ओवळे
त्या काळात शेख महंमद हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी, समतेसाठी प्रयत्न करत होते. त्यांनी भागवत धर्म आणि सूफी संतपरंपरा आपल्या विचारांतून आणि कार्यातून पुढे नेली.
सद्‌गुरू आणि पिराचे ऐक्‍य सांगताना ते म्हणतात,
सद्‌गुरू साचे पिरू। दो भाषांचा फेरू।।
नाही बिन्ना तारू। ज्ञान विवेकी।।
हिंदू आणि मुस्लिम धर्माचा त्यांनी चिकित्सक अभ्यास केला होता. सर्व धर्म, पंथ एक आहेत. त्यामुळे द्वैतभाव नसावा. याबाबत एका अभंगात ते म्हणतात,
जैसे एका झाडा। पत्रे फांद्या निवडा।।
तैसा भाषा पवडा। गुरू पिरांचा।।
देहूप्रमाणेच त्या काळी श्रीगोंदेनगरी अध्यात्माचे केंद्र बनली होती. अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून ते प्रबोधन करत. समाजातील भेदभाव नष्ट व्हावा, यासाठी ते प्रयत्न करत. त्याबाबत त्यांचा
ऐसे केले या गोपाळे। नाही सोवळे ओवळे।।
काटे केतकीच्या झाडा। आत जन्मला केवडा।।
हा अभंग प्रसिद्ध आहे.

शेख महंमद बाबांचे साहित्य
संत शेख महंमद यांनी विपुल साहित्य रचना केली. योगसंग्राम, पवन विजय, निष्कलंक प्रबोध, साठी संवत्सर, स्फुट रचना, अभंग, गायका, मदालसा, हिंदी कविता, ज्ञान गंगा आदी १० ग्रंथ ज्ञात आहेत. यामध्ये योगसंग्राम हा मुख्य ग्रंथ आहे. त्यात १८ अध्याय आहेत. या ग्रंथापैकी साठी संवत्सर आणि ज्ञानगंगा हे ग्रंथ अप्रकाशीत आहेत.

देहूतील मंडपाची आग विझविली श्रीगोंद्यातून
संत शेख महंमद बाबा आणि संत तुकाराम महाराज यांची मैत्री होती. देहू येथे संत तुकाराम महाराज यांचे कीर्तन सुरू होते. त्या वेळी मंडपास अचानक आग लागली. इकडे श्रीगोंद्यातही शेख महंमदबाबा यांचे प्रवचन सुरू होते. मात्र, अंतर्ज्ञानी बाबांना देहूतील ती आग दिसली. त्यांनी श्रीगोंद्यातूनच ती विझविली. त्या प्रयत्नात बाबांच्या हाताला जखम झाली, अशी आख्यायिका आहे. संत शेख महंमद महाराज हे पंढरपूरची वारी करीत असल्याचा दाखला आहे. शिवाय, संत तुकाराम महाराज हे शेख महंमद महाराजांना भेटण्यासाठी शहरातील गणपती मळा येथे आल्याचेही दाखले दिले जातात. तेथे त्यांनी संत शेख महंमदबाबा यांच्यासह राऊळबुवा, गोदडबुवा आणि प्रल्हाद महाराज यांच्याशी आध्यात्मिक चर्चा केली, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

श्रीगोंद्याचे ग्रामदैवत
संत शेख महंमद बाबा हे श्रीगोंदेकरांचे ग्रामदैवत आहे. श्रीगोंदे शहरात मध्यभागी शेख महंमद महाराजांचे समाधिस्थळ आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे येथेही शेख महंमद महाराज यांची संजीवन समाधी आहे. येथे दरवर्षी होणाऱ्या यात्रोत्सवात हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येत सण साजरा करतात. याच दरम्यान आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सात दिवस पारायण होते. या सप्ताहात राज्यातील प्रख्यात कीर्तनकार हजेरी लावतात. यावेळी शेख महंमद बाबांनी लिहिलेल्या योगसंग्राम ग्रंथाचे पारायण होते. शहरातील मुस्लिम महिला कुराणपठण करतात. कव्वालीचा कार्यक्रम होतो. महाराजांच्या समाधिस्थळी होणाऱ्या चंदनलेप कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम एकत्र असतात. त्याचा मान मोटे पाटील कुटुंबाला असतो. महाराजांचे वंशज शेख कुटुंब या यात्रोत्सवात सहभागी होतात. श्रीगोंद्यातील कोणत्याही शुभकार्याची सुरुवात बाबांच्या समाधीच्या दर्शनाने केली जाते. राजकीय प्रचाराची सुरुवातही बाबांना वंदन करूनच होते.

संत शेख महंमद महाराजांचा यंदा ३२४ वा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने १४ आणि १५ मार्च २०२२ अशी दोन दिवसांची यात्रा आयोजित करण्यात आली. पहिल्या दिवशी रात्री छबिना आणि शोभेच्या दारूची आतषबाजी, तर दुसऱ्या दिवशी दुपारी कुस्त्यांचा आखाडा पार पडला. त्यापूर्वी ११ तारखेला ३२ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. या सप्ताहादरम्यान श्री ज्ञानेश्वरी आणि संत शेख महंमद यांच्या योगसंग्राम ग्रंथाचे पारायण झाले. तसेच ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यावेळी गोल रिंगणाचाही कार्यक्रम उत्साहात पार पडला. हिंदू आणि मुस्लिम समाजातील भाविकांनी मिळून श्री संत शेख महंमद महाराजांच्या समाधीला चंदनलेप केला. यावेळी श्रीगोंदे शहरातील बँड पथकांनी आपली संगीतमय सेवा रुजू केली. काल्याच्या कीर्तनानंतर पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

श्रीगोंदे येथे पत्नीसह समाधी
संत शेख महंमद बाबांच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखांबद्दल अभ्यासकांमध्ये एकवाक्यता नाही. पण शेख महंमद महाराजांच्या अभंगांमध्ये अफझलखानाची स्वारी आणि पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती लपविल्याचा उल्लेख येतो. त्यामुळे महाराज १६५९ पर्यंत हयात होते, असे अनुमान काढले जाते. संशोधक डॉ. भीमा मोदळे यांनी शेख महंमद महाराजांचा कालखंड १५७५ ते १६७४ मानावा असे म्हटले आहे. आपल्याला संसार आणि परमार्थात साथ देणाऱ्या पत्नीसह शेख महंमद बाबांनी श्रीगोंदे येथे संजीवन समाधी घेतली. या ठिकाणीच बाबांचे गुरू चाँद बोधले महाराज यांची प्रतीकात्मक समाधी आहे. समाधी मंदिराबाहेरील बाजूला बाबांच्या नारायण नावाच्या घोड्याची समाधी आहे. बाबांच्या समाधिस्थळाच्या प्रवेशद्वारात मोदोकाकांची समाधी आहे.

संत शेख महंमद यांना कुणी महाराज म्हणते, तर कुणी बाबा संबोधते. त्यांच्या स्थानाला कुणी मंदिर म्हणते, कुणी मठ, कुणी दर्गा; मात्र सगळे जेव्हा एकत्र येतात, त्या वेळी ते केवळ भाविक असतात. वारकरी संप्रदायातील या मुस्लिम संतकवीने अनेकांना आपल्या प्रतिभेने भुरळ पाडली. श्रीगोंदा येथे त्यांचे येथील मंदिर आणि दर्गा एकत्र आहे. हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र येऊन यात्रोत्सवासह इतर पारंपरिक उत्सव साजरे करीत असतात. संत शेख महंमद महाराज यात्रोत्सव प्रतिष्ठान आणि शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट, असे दोन भाग या देवस्थानामध्ये आहेत.

फौजदार, तहसीलदारांचा मान
यात्रेच्या दिवशी भाविक बँड, वाद्ये यांसह वाजत गाजत श्रीगोंदा शहरातून मिरवणुकीने बाबांच्या दरबारात येतात. गुलाब पाणी,सुंगधी अत्तर, चादर (गलफ़), फुलांची चादर बाबांच्या समाधीवर अर्पण करून, सुवासीक अगरबत्ती, लोबान जाळले जातात. चादर चढविण्याचा पहिला मान श्रीगोंदा पोलीस स्थानकाचा आहे. श्रीगोंदा पोलीस स्थानक आणि तहसील कार्यालयाच्या वतीने तहसिलदार, फौजदार आणि त्यांचे सर्व कर्मचारी शहरातून मिरवणुकीने वाजत गाजत येवून बाबांना चादर अर्पण करतात. यात्रेच्या निमित्ताने नोकरी व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी गेलेले श्रीगोंदेकर गावी येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *